नेपिअर, सर चार्ल्स जेम्स : (१० ऑगस्ट १७८२ – २९ ऑगस्ट १८५३). प्रसिद्ध ब्रिटिश सेनापती. याचा जन्म लंडन येथे झाला. कर्नल जॉर्ज नेपिअरचा हा ज्येष्ठ मुलगा. बाराव्या वर्षीच त्याला सैन्यात घेण्यात आले. १७९७ मध्ये त्याला सर जेम्स डफचा स्वीय सहायक म्हणून नेमण्यात आले. तीन वर्षांनी त्याला लेफ्टनंटची जागा मिळाली.
सर जॉन मुरच्या देखरेखीखाली त्याला उत्कृष्ट सैनिकी शिक्षण मिळाले. नेपिअरच्या अंगच्या गुणांचा मुर यास अनुभव आला व त्याला ‘रायफल्स’मध्ये घेण्यात आले. तथापि लेफ्टनंट कर्नल विल्यम स्ट्यूअर्टबरोबर त्याचे भांडण होऊन त्याने ती पलटण सोडली व १८०३ मध्ये जनरल फॉक्सचा स्वीय सहायक म्हणून तो आयर्लंडला गेला. कॉरन येथे सर जॉन मुर धारातीर्थी पडण्यापूर्वी त्याची पलटण नेपिअरच्या हाताखाली लढण्यास गेली. नेपिअरचा तेथेच शेवट व्हावयाचा; पण गीबेअर या फ्रेंच व्यक्तीने त्याचा जीव वाचविला. पुढे त्यास त्याच्या आईकडे जाऊ दिले. फ्वेन्तेस द ओन्योरो येथील लढाईनंतर त्यास लेफ्टनंट कर्नल करण्यात आले. १८१२ मध्ये नेपोलियनच्या विरोधी युद्धात त्याने भाग घेतला. १८१३ मध्ये अमेरिकेविरुद्ध झालेल्या लढाईत तो हजर होता. पुढे तो अर्धपगारी रजेवर गेला. १८१९ मध्ये त्याला कॉर्फ्यू येथे इंस्पेक्टिंग फील्ड ऑफिसर म्हणून पाठविण्यात आले. पुढील वर्षी अली पाशा आयोगाबरोबर तो आयोनियन बेटांवर गेला. पुढे १८२१ साली तो ग्रीसला गेला. नंतर त्याची सेफालोनिया येथे नेमणूक झाली. तेथे आठ वर्षे गव्हर्नर आणि मिलिटरी रेसिडेंट म्हणून तो राहिला. तेव्हा त्याची शासनविषयक कर्तबगारी प्रत्ययास आली. बायरनची आणि त्याची भेट झाली, तेव्हा बायरनने नेपिअरला कमांडर-इन-चीफ करावे, अशी लंडन येथील ग्रीक कमिटीस विनंती केली, पण ती व्यर्थ गेली. नंतर नेपिअरचे सर फ्रेडरिक ॲडॅम्झशी भांडण होऊन तो सेवानिवृत्त झाला. त्याने कॉलनीज व विल्यम द काँकरर ही दोन पुस्तके लिहिली. १८३४ साली ऑस्ट्रियाला गव्हर्नर म्हणून जाण्यास त्याने नकार दिला. १८३७ मध्ये त्यास मेजर-जनरल करण्यात आल्यावर तो इंग्लंडला परतला. १८३९–४० मध्ये त्याने चार्टिस्टना उत्तर इंग्लंडमध्ये काबूत ठेवण्याची यशस्वी कामगिरी बजावली.
नंतर नेपिअरला हिंदुस्थानात पाठविण्यात आले. १८४२ साली त्याची सिंधमध्ये रवानगी झाली. तेथे गेल्यापासून सिंध जिंकण्याचे त्याच्या मनाने घेतले. सिंधमध्ये जेम्स उट्रमशी त्याची मैत्री जमली. नेपिअरने अमिरांचा म्यानी व दाबो येथे संपूर्ण पराभव केला. पुढील महिन्यात हैदराबाद (सिंध) येथे अमिरांचा त्याने नायनाट केला. त्याच्या यशाबद्दल लॉर्ड एलेनबरोने त्याचे कौतुक केले व त्यास जी. सी. बी. केले. त्यास सिंधचा गव्हर्नर केल्यावर तेथे त्याने आदर्श पोलीस दल उभारले आणि कालवे खणले. त्याने सिंधमध्ये शांतता प्रस्थापित करून प्रशासनाची नीट घडी बसविली. सिंध बळकावणे अनैतिक होते, असे तो म्हणे तरीही कर्तव्य म्हणून त्याने तसे केले. भत्त्याच्या बाबतीतही सैनिक बंड करतील असे भवितव्य त्याने वर्तविले होते. त्याचे १८५१ मध्ये डलहौसीशी भांडण झाले आणि तो इंग्लंडला परत गेला.
तो पोर्ट्स्मथ येथे मरण पावला.
संदर्भ :
- Lambrick, H.T. Sir Charles Napier and Sind, London, 1953.