पश्चिम भारतातील एक महत्त्वाचा हीनयान (थेरवाद) व महायान लेणी-समूह. या लेणी नाशिक शहरापासून पश्चिमेला सुमारे ८ किमी. अंतरावर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत आहेत. येथे तीन टेकड्या असून त्यांपैकी त्रिकोणी आकाराच्या ‘त्रिरश्मी’ टेकडीवर लेणी खोदल्या आहेत. लेणींतील शिलालेखांमध्येही ‘त्रिरश्मी’ या नावाची प्राकृत रूपे ‘तेकिरसी’ व ‘तिरन्हु’ अशी आली आहेत. स्थानिक लोक या लेणींना ‘पांडव (पांडू) लेणी’ या नावाने ओळखतात.

पांडव लेणींचा अभ्यास जे. विल्सन (१८४७-४८), जे. स्टीव्हन्सन (१८५३), एडवर्ड वेस्ट व ऑर्थर वेस्ट (१८६७-६८), फर्ग्युसन व बर्जेस (१८८०), भगवानलाल इंद्रजी (१८८३), वॉल्टर स्पिंक (१९५४), ट्राबोल्ड (१९७०), दहेजिया (१९७२), ढवळीकर (१९७४, १९८४ व १९८६), वीनर (१९७७), जाधव (१९८०), एस. नागराजू (१९८०-८१), अलोने (१९८८), अ. जामखेडकर (२००२), मंजिरी भालेराव (२००९) इ. संशोधकांनी केला आहे.

पांडव लेणी प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या हीनयान व महायान पंथांच्या कालखंडात खोदण्यात आली. येथे एकूण २७ ब्राह्मी शिलालेख कोरले असून त्यातून सातवाहन व पश्चिमी क्षत्रप (क्षहरात) यांच्या इतिहासाविषयी उपयुक्त माहिती मिळते. या लेणी-समूहात एक चैत्यगृह असून बाकीचे सर्व विहार आहेत. साधारणपणे येथील विहारांची ओसरी, मंडप व सभोवताली खोल्या अशी स्थापत्य-रचना आढळून येते. येथील स्तंभांचा घटकक्रम साधारणपणे अष्टकोनी स्तंभ, घंटाशीर्ष, आमलकयुक्त चौरसाकृती घटक, त्यावर स्वारशिल्प आणि कठडा असा आहे. साधारणपणे इ. स. पू. पहिल्या शतकापासून ते इ. स. सातव्या शतकापर्यंत येथे लेणी संबंधित कार्य सुरू होते. मूळच्या हीनयान लेण्यांत नंतर सुमारे सहाव्या शतकात महायान परंपरेसाठी आवश्यक असे बदल करण्यात आले. बऱ्याचशा लेण्यांत बौद्ध शिल्पे कोरण्यात आली आहेत. यातील गौतम बुद्ध यांची शिल्पे स्थानक, प्रलंबपादासन, पद्मासन, सिंहासन तसेच ध्यानमुद्रा, धर्मचक्रप्रवर्तनमुद्रा, वरदमुद्रा व महापरिनिर्वाणमुद्रेत कोरण्यात आली आहेत. सोबत बोधिसत्त्वांची (पद्मपाणी, वज्रपाणी, मैत्रेय इ.) शिल्पेही पाहावयास मिळतात. येथे एकंदरीत २४ लेणी असून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने या उत्तराभिमुख लेणींना पूर्वेकडून पश्चिमेकडे अनुक्रमांक दिले आहेत.

लेणी समूहातील क्र. १ हे विशाल परंतु अर्धवट खोदलेले लेणे आहे. यास ओसरी व मंडप आहे. ओसरीत चार स्तंभ व दोन अर्धस्तंभ आहेत. या लेण्याच्या मुखभागावरील नक्षीकाम हे लेणे क्र. ३ सारखे आहे.

लेणे क्र. २ हे मूळतः वासिष्ठीपुत्र पुळुमावी याच्या राज्यरोहणाच्या सहाव्या वर्षी खोदले गेले असल्याचे येथील एका खंडित शिलालेखातून समजते. या लेण्यात गौतम बुद्ध व बोधिसत्त्वांची काही शिल्पे कोरली आहेत.

लेणे क्र. ३, पांडव लेणी, नाशिक.

लेणे क्र. ३ हा एक सुंदर विहार असून त्यात दोन खोल्या असलेली ओसरी व १८ खोल्या असणारा मंडप आहे. हे लेणे गौतमीपुत्र सातकर्णीची आई गौतमी बलश्री व मुलगा वासिष्ठीपुत्र पुळुमावी यांनी खोदवले. ओसरीत ब्राह्मी लिपीतील व प्राकृत भाषेतील चार शिलालेख असून सातवाहन व पश्चिमी क्षत्रपांच्या ऐतिहासिक साधनांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओसरीतील दरवाजाच्या दोन्ही बाजूंस दोन मनुष्याकृती व शिल्पपट आहेत. ओसरीत सहा अष्टकोनी स्तंभ आहेत. स्तंभशीर्षांवर मनुष्याकृती व काही प्राण्यांच्या मिश्रणातून बनलेली शिल्पे आहेत. ओसरीचा दर्शनी भाग सहा विशाल कीचक पेलत आहेत, असे दर्शविले आहे. मंडपात (१२.५ मी. x १४ मी. x ३.२ मी.) तिन्ही बाजूंना सलग छोटेखानी बाक कोरण्यात आलेला आहे. मंडपात समोरील भिंतीत तीन व चार क्रमांकाच्या खोल्यांच्या मध्ये एक अर्धउठावात पूजावस्तू असलेला स्तूप कोरण्यात आला आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना भक्तजन स्तूपाची पूजा करीत असल्याची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या व्यतिरिक्त या लेण्यात इतरही काही शिल्पपट कोरण्यात आलेले आहेत.

लेणे क्र. ४ हा एक लहान विहार असून यास दोन स्तंभ व दोन अर्धस्तंभयुक्त ओसरी आहे. स्तंभशीर्षांवर स्वार व हत्ती कोरलेले आहेत. लेण्यातील मंडप ६ मी. चौकोनाकृती असून २.७ मी. उंच आहे. मंडपाची जमीन खोल खोदून एक मोठे पोढे तयार करण्यात आले होते; परंतु आता ते बुजवून जमीन सपाट केली आहे.

लेणे क्र. ५ ते ९ साधारण असून उंचवट्यावर खोदली आहेत. लेणे क्र. ५ व ६ ही नंतरच्या काळात पोढीप्रमाणे उपयोगात आणल्याची दिसून येतात. लेणे क्र. ६ मध्ये एक शिलालेखही कोरण्यात आलेला आहे. लेणे क्र. ७ मध्ये एका भिक्षुणीचा दानलेख, तर लेणे क्र. ८ मध्ये  बौद्ध उपासकांचे दोन दानलेख आहेत. लेणे क्र. ८ मधील एका लेखातील दानकर्ता ‘मुगुदास’ हा कोळी असून तो ‘चेतिक’ (चैत्यिक) पंथाचा उपासक असल्याचे समजते. लेणे क्र. ९ मध्ये एक ओसरी व तीन खोल्या असून स्तंभशीर्षांवर प्राण्यांची शिल्पे आहेत.

लेणे क्र. १० हा एक मोठा विहार असून लेणे क्र. ३ सारखा आहे. हा विहार जुन्नर येथील गणेश विहारानंतर सर्वांत मोठा विहार समजला जातो. या लेण्यात स्तंभ व दोन खोल्या असलेली ओसरी, तसेच तिन्ही बाजूंनी १६ खोल्या असलेला मंडप (१३.९ मी x १३.६ मी x ३ मी) आहे. मागच्या भिंतीत एक मोठा स्तूप होता. तो यादव काळात भैरवमूर्तीत रूपांतरित केल्याचे दिसून येते. या लेण्यात एकूण सहा शिलालेख असून त्यातील एक लेख आभीर राजाचा आहे. हे लेणे नहपानाचा जावई उषवदात (ऋषभदत्त) याने खोदवले असल्याचे याच लेण्यातील शिलालेखांवरून समजते. या लेण्यातील शिलालेख प्राचीन भारतीय इतिहासाच्या राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. ओसरीतील स्तंभशीर्षांवर विविध प्राण्यांचे अंकन असून त्यात ‘स्फिंक्स’ देखील कोरले आहेत.

लेणे क्र. ११ मध्ये एक दानलेख असून मागील भिंतीवर नंतरच्या काळात ऋषभदेव, अंबिका व मातंग किंवा सर्वानुभूती ही जैनशिल्पे कोरण्यात आली आहेत. लेणे क्र. १२, १३ व १४ साधारण आहेत. लेणे क्र. १२ मध्ये भिक्षुसंघास लेणे दान दिल्याविषयी ६ ओळींचा एक लेख आहे.

लेणे क्र. १५ व १६ मध्ये सर्वसाधारणपणे लेणे क्र. २ प्रमाणेच गौतम बुद्ध व बोधिसत्त्वांची शिल्पे कोरण्यात आली आहेत. याशिवाय लेणे क्र. १६ हे लेणे क्र. १५ च्या वरती खोदले असून काही विद्वानांच्या मते मूळचे हीनयान पंथी असावे. या लेण्यात वज्रपाणी, बुद्ध व मैत्रेय यांची त्रिकूट शिल्पेही कोरण्यात आली आहेत.

लेणे क्र. १७ हे यवन व्यापारी ‘इंद्राग्नीदत्त’ याने खोदवले. या आशयाचा एक शिलालेख या लेण्याच्या ओसरीत कोरला आहे. हे लेणे चैत्यगृहाच्या डाव्या बाजूला असून ओसरीत चार स्तंभ व दोन अर्धस्तंभ आहेत. ओसरीतील स्तंभशीर्षांवर विभिन्न प्राण्यांची शिल्पे आहेत. यातील काही शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जसे एका प्राण्याला चोच असून त्याचे शरीर वाघाचे आहे. प्राण्यांवर स्वार झालेल्यांमध्ये काही व्यक्ती व मुले दर्शविण्यात आली आहेत.

चैत्यगृह, लेणे क्र. १८, पांडव लेणी, नाशिक.

लेणे क्र. १८ हे या टेकडीवरील एकमेव चैत्यगृह असून ते १२ मी. लांब व ६.५ मी. रुंद आहे. याचा तलविन्यास चापाकृती असून छत गजपृष्ठाकार आहे. लेण्यातील स्तूप १७ स्तंभांनी वेढलेला आहे. लेण्यातील दानलेख व वास्तुघटक पाहता सदर लेणे वेगेवेगळ्या टप्प्यांत पूर्ण झाले असावे, असे दिसते. या चैत्यगृहाचे मुख दगडी असल्याने लेणी विकासक्रमामध्ये ते दुसरी अवस्था सूचित करते. अजिंठा लेणे क्र. ९ व नाशिक येथे दगडी चैत्यगृहे खोदण्यास सुरुवात साधारणपणे एकाचवेळी व सर्वप्रथम झाल्याचे दिसून येते. या लेण्यातील तीन शिलालेखांपैकी एकात सदर लेणे भटपालिकेने पूर्ण केल्याचे म्हटले आहे. या लेण्याच्या कमानीवर दोन्ही बाजूला नाग कोरले आहेत. चैत्यगवाक्षाच्या भोवती कोरलेली त्रिदलाची नक्षी (triskelion) ही मूळतः ग्रीक असून ती फक्त जुन्नर येथील गणेश लेणी-समूहाच्या पूर्वेकडील चैत्यगृह व नाशिक चैत्यगृहावर आढळून येते. लयन स्थापत्यविकासक्रमाचा विचार करता हे लेणे अजिंठा लेणे क्र. ९ व बेडसे चैत्यगृह यांमध्ये ठेवता येईल. त्यामुळे नाशिक चैत्यगृह इ. स. पू. पहिल्या शतकाच्या शेवटी व इ. स. पहिल्या शतकाच्या सुरुवातीला खोदले असावे, असे दिसते. चैत्यगृहाच्या दरवाजावरील कमानीवर घोडे, हत्ती, बैल, वाघ, श्रीवत्स व एक लेख इत्यादी कोरले आहेत. स्तंभशीर्षांवरतीही प्राणी कोरले आहेत.

गौतम बुद्ध आणि बोधिसत्त्व, लेणे क्र. २०, पांडव लेणी, नाशिक.

लेणे क्र. १९ हे लेणे क्र. १८ च्या बाजूला व लेणे क्र. २० च्या खाली आहे. हे लेणे कण्ह सातवाहनाच्या काळात खोदले असून आकाराने लहान आहे. यात सातवाहनकालीन प्राचीनतम शिलालेख आहे (इ. स. पू. सुमारे ३०-१२). या लेखात नासिकचा उल्लेखही आढळून येतो. लेणे क्र. २० मध्ये लेणे क्र. १८ समोरील जिन्याने जावे लागते. हे एक विशाल लेणे असून यात ओसरी व मंडप आहेत. मंडपाला आठ खोल्या आहेत. हे लेणे गौतमीपुत्र यज्ञश्री सातकर्णी याच्या सातव्या वर्षी भिक्षूंना उपयोगात आणण्यास दिले, असा येथील शिलालेखात उल्लेख आहे. मागच्या भागात (गर्भगृहात) विशाल बुद्धमूर्ती व बोधिसत्त्वांची शिल्पे आहेत. परंतु या लेण्यातले गर्भगृह आणि इतर मूर्ती या दुसऱ्या टप्प्यात कोरल्या असल्याच्या स्पष्ट खुणा या लेण्याच्या छतावर आणि बाजूच्या भिंतीत दिसून येतात.

लेणे क्र. २१ व २२ साधारण आहेत. लेणे क्र. २३ हे एक विशाल लेणे असून सहा ते सात लहान खोल्यांपासून बनले आहे. या लहान खोल्या काही प्रमाणात तोडून एक भव्य आवार तयार केले आहे. या लेण्यात गौतम बुद्ध, अमिताभ बुद्ध, बोधिसत्त्व, नागराज इ. शिल्पे, खंडित स्तूप व दोन ब्राह्मी शिलालेख आहेत. लेणे क्र. २४ हे दोन खोल्या असलेले एक लहान लेणे आहे. या लेण्यात वाघ, बैल, दोन कुबडे असलेला उंट, मेंढी, डुकरे, हरीण, स्त्रीचे मुख असलेला घोडा, घुबड, उंदीर आणि लहान मुले इ. शिल्पे व दोन शिलालेख आहेत.

एकंदरीत, पांडव लेणीत सांस्कृतिक विकासाचे तीन टप्पे दिसून येतात. पहिला टप्पा इ. स. पू. सु. पहिले शतक ते इ. स. तिसरे शतक असा आहे. या टप्प्यात सुरुवातीला लेणे क्र. १९ व १८ (चैत्यगृह) खोदले गेले. या लेण्यातील स्तंभ हे अजिंठा येथील लेणे क्र. ९, कोंडाणे विहार लेणे क्र. २ यांच्याशी साधर्म्य स्थापित असल्याने समकालीन वाटतात. दुसरा टप्पा सु. पाचव्या-सहाव्या शतकानंतर सुरू होतो. या काळात गौतम बुद्ध व बोधिसत्त्वांची शिल्पे मूळतः हीनयान पंथाशी निगडीत असणाऱ्या लेण्यांत कोरली गेली. या प्रक्रियेची सुरुवात संभवतः लेणे क्र. २ पासून झाल्याचे दिसून येते. सातव्या शतकानंतर हळूहळू ही लेणी जैन व हिंदू धर्मांच्या प्रभावाखाली आली असावीत, असे येथील काही शिल्पांवरून दिसून येते.

संदर्भ :

  • Dhavalikar, M. K. Late Hinayana Caves of Western India, Pune, 1984.
  • Fergusson, J. & Burgess, J. The Cave Temples of India, London, 1880.
  • Nagraju, S. Buddhist Architecture of Western India, Delhi, 1981.
  • Thuse, Manjiri, Buddhist Caves at Nasik- An Analytical Study, Ph.D. Thesis submitted to the Deccan college PGRI, Pune, 2009.
  • जामखेडकर, अ. प्र. संपा., महाराष्ट्र :इतिहास-प्राचीन काळ (खंड-१, भाग-२), स्थापत्य व कला, दर्शनिका विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.

समीक्षक : मंजिरी भालेराव