अमेरिकेचा अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट याने अंमलात आणलेल्या अंतर्गत कार्यक्रमाचे नाव. अध्यक्षीय निवडणुकीसाठी रूझवेल्टला उमेदवार म्हणून १९३२ मध्ये मान्यता मिळाली. तेव्हा त्याने सुरुवातीच्या भाषणात मंदीच्या लाटेमुळे हवालदील झालेल्या देशास निवारण्यासाठी नियोजित कार्यक्रम तयार केला. त्यास ‘न्यू डील’ म्हणतात. सामान्य नागरिकांच्या सुखसमृद्धीचा नवा मार्ग असे त्याचे वर्णन केले गेले.

फ्रँकलिन रूझवेल्ट – न्यू डील या क्रांतिकारक कार्यक्रमाचा उद्गाता.

शासनाने लोककल्याणासाठी अधिक जबाबदारी पेलावी, या तत्त्वावर न्यू डीलचे अधिष्ठान होते व त्यात दुःखपरिहार किंवा गाऱ्हाण्यांची दाद, पुनर्लाभ व सुधारणा ह्या गोष्टींचा समावेश होता. त्याकरिता रूझवेल्टने अनेक अभिकरणे नियुक्त केली आणि न्यू डीलच्या कार्यवाहीस चालना दिली. मार्च १९३३ ते एप्रिल १९३९ ह्या रूझवेल्टच्या कालखंडाला अमेरिकेच्या इतिहासातील ‘न्यू डील युग’ म्हणतात. १९३३–३४ व १९३४–३९ असे या कालखंडाचे दोन स्पष्ट भाग पडतात. पहिल्यात, मंदीमुळे जीवन उद्‍ध्वस्त झालेल्या लाखो नागरिकांना मदत करण्यासाठी प्राज्ञ मंडळाच्या (ब्रेन ट्रस्ट) साहाय्याने केलेल्या शिफारशी आहेत. त्यांत शासकीय खर्चात कपात, बेकारी निवारणासाठी घटक राज्यांना साहाय्य व सार्वजनिक कामाच्या योजना, बँकांचे नियंत्रण, चलनविषयक सुधारणा व निर्बंध, उद्योगधंद्यांतील मालक, मजूर इ. घटकांत सामंजस्य, किमान वेतन, कामाचे तास, नियंत्रित कृषी उत्पादन, गरजेच्या वस्तूंची किंमतवाढ आणि भावांची स्थिरता अशा विविध आर्थिक योजनांचा अंतर्भाव होतो. त्यासंबंधीचे कायदे विधिमंडळाच्या खास अधिवेशनात संमत करण्यात आले. त्यांच्या अंमलबजावणीसाठी नॅशनल रिकव्हरी ॲडमिनिस्ट्रेशन, ॲग्रिकल्चरल ॲड्जस्ट्मेंट् ॲडमिनिस्ट्रेशन, सिव्हिलियन कॉन्झर्व्हेशन कोअर, पब्लिक वर्क्स ॲडमिनिस्ट्रेशन इ. यंत्रणा झपाट्याने उभारण्यात आल्या. ‘भयाइतकी भयप्रद गोष्ट दुसरी कोणतीच नाही, तेव्हा निर्भयपणे व आत्मविश्वासाने कामाला लागा’, ह्या रूझवेल्टच्या संदेशाने अमेरिकेत नवचैतन्य संचारले. कृषिउत्पादनाचे नियंत्रण व किंमतींची स्थिरता, बँकांवरील निर्बंध व रोख्यांच्या खरेदी-विक्रीची व्यवस्था, श्रमिकांना किमान वेतन, औद्योगिक उत्पादनात वाढ इ. योजनांत रूझवेल्ट-शासनाला बरेच यश मिळाले व मंदीची तीव्रता कमी होऊन सामान्य अमेरिकन नागरिकाला दिलासा मिळाला. सुरुवातीला शासकीय खर्चात सु. १५% कपातही झाली. त्यानंतर मात्र खर्चात सतत वाढ होत गेली. त्यामुळे करवाढ व राष्ट्रीय कर्जात वाढ अपरिहार्य झाली. याच काळात टेनेसी नदी खोरे प्रकल्प, जलसिंचन योजना, पूरनियंत्रण, वीज उत्पादन इ. योजना आखण्यात येऊन टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी ह्या यंत्रणेमार्फत तिची कार्यवाही सुरू झाली. अधिकारग्रहणाच्या वेळी असलेल्या मंदीला अशा रीतीने थोपवून धरल्यावर १९३४ नंतर वरील कायदा, योजना व यंत्रणा यांत आवश्यक त्या सुधारणा करण्यास व विकासाच्या दीर्घकालीन योजनांची आखणी करण्यास रूझवेल्टने सुरुवात केली. त्यासाठी रोखे व परकीय चलनव्यवहारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या संघटना स्थापन केल्या; तसेच चलनविषयक कायदा, आयात-निर्यात व्यापार, नीतिविषयक कायदा, गृहनिर्माण, दुरुस्ती व गहाणवटीसंबंधीचा कायदा असे अनेक कायदे करण्यात आले. सामाजिक सुरक्षिततेच्या पुरस्कारार्थ बेकारी निर्मूलन, आजार, वार्धक्याची विमायोजना इ. स्वीकृत झाल्या व नॅशनल यूथ ॲडमिनिस्ट्रेशन, वर्क्स प्रोजेक्ट ॲडमिनिस्ट्रेशन इ. यंत्रणा उभारण्यात आल्या.

रूझवेल्टच्या योजनांचे स्वरूप, त्यामुळे खाजगी संपत्तीच्या मूलभूत हक्कांवर होणारा आघात, केंद्र सरकारच्या अधिकारांत होणारी वाढ, विधिमंडळाच्या अधिकारांचा संकोच व अध्यक्षाचे अधिकार यांमुळे त्याच्याच पक्षातून त्याला विरोध होऊ लागला. पुढे न्यू डीलचे कायदे व यंत्रणा यांवर खटले झाले आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने काही अधिकार घटनाबाह्य ठरविले. साहजिकच अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयात संघर्ष उत्पन्न होऊन घटनात्मक पेच निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालयातील स्वमतानुकूल न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करून न्यायालयीन विरोध मोडून काढण्याच्या रूझवेल्टच्या प्रयत्नांना कसून विरोध झाला.

नव्या योजनांचा व सुधारणांचा वेग १९३७ नंतर मंदावला. थोड्याशा आर्थिक स्थैर्यानंतर आंतरराष्ट्रीय समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक झाले व पुढे दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. मात्र युद्धोत्तर काळातही न्यू डीलपुरस्कृत योजना, धोरणे व तत्कालीन कायदे, यंत्रणा आणि संघटना यांचे कार्य चालूच राहिले. ट्रूमन यांचे फेअर डील काहीसे न्यू डील तत्त्वांवर आधारितच होते. मंदीच्या भयानक संकटाचे निवारण करून अमेरिकेच्या प्रगतीचा व उत्कर्षाचा पाया न्यू डीलने घातला, असे अनेक विरोधकांनाही अखेर मान्य करावे लागले.

संदर्भ :

  • Keller, Morton, Ed. The New Deal: What was It?, London, 1963.
  • Schlesinger, Arthur, The Coming of the New deal: The Politics of upheaval, 3 Vols., New York, 1960.