बर्गमन, इंगमार : (१४ जुलै १९१८—३० जुलै २००७). स्वीडिश रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील एक श्रेष्ठ निर्माता, दिग्दर्शक व पटकथालेखक. इंगमार बर्गमन यांचा जन्म स्वीडनमधील अप्साला येथे झाला. त्यांचे वडील धर्मोपदेशक (pastor) होते. इंगमार यांनी स्टॉकहोम विद्यापीठात कला, साहित्य व इतिहासाचा अभ्यास केला. तेथेच ते नाट्यक्षेत्रात गुंतले आणि विद्यार्थीदशेत त्यांना नाट्यदिग्दर्शक म्हणून प्रसिद्धी मिळाली. १९४१ मध्ये त्यांनी स्वीडिश नाटककार ऑगस्ट स्ट्रिंडबर्गच्या ‘द घोस्ट सोनाटा’ या नाटकाची निर्मिती केली. १९४४ मध्ये त्यांना हेलसिंगबर्गच्या म्युनिसिपल थिएटरमध्ये दिग्दर्शक म्हणून पूर्णवेळ काम मिळाले. स्वेन्स्क फिल्मइंडस्ट्रीचे प्रमुख कार्ल-अँडर्स डायमलिंग यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांना Hets (इं.शी., फ्रेन्झी, १९४४) हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक आणि पटकथा-लेखक म्हणून त्यांनी स्वीडिश चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. Kris (इं.शी., क्रायसिस, १९४६) हा त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला व त्यांचीच पटकथा असलेला पहिला चित्रपट होय. १९४७ ते १९५२ या काळात स्वीडिश रंगभूमीवरील कलावंतांच्या साहाय्याने त्यांनी ‘पोर्ट ऑफ कॉल’ (इं.शी., १९४९), ‘सिक्रेट्स ऑफ वूमेन’ (इं.शी., १९५२), ‘समर विथ मोनिका’ (इं.शी., १९५३) इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

‘स्माईल्स ऑफ ए समर नाईट’ (इं.शी., १९५५) या विनोदी शैलीच्या चित्रपटामुळे इंगमार यांना प्रथमच व्यावसायिक यश मिळाले. हा चित्रपट त्यांच्या दिग्दर्शन शैलीच्या विपरीत होता. या चित्रपटानंतर ते पुन्हा आपल्या गंभीर शैलीकडे वळले. ‘द सेव्हन्थ सील’ (इं.शी., १९५६) हा त्याचा तत्त्वचिंतनात्मक चित्रपट गाजला. मध्ययुगीन धर्मयुद्धातून परतलेला योद्धा व मृत्यू यांच्यातील बुद्धिबळाच्या खेळाचे अर्थपूर्ण चित्रण या रूपकात्मक चित्रपटातून केलेले आहे. धर्मव्यवस्थेचे संहारक स्वरूप आणि मानवता यातील द्वंद चितारणाऱ्या या चित्रपटाने त्यांचे नाव जागतिक पटलावर नेले. त्या पाठोपाठ आलेल्या ‘वाइल्ड स्ट्रॉबेरी’ (इं.शी., १९५७) या त्यांच्या चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण रचनेने इतर दिग्दर्शकांना प्रभावित केले. स्वप्न, सत्य आणि भूतकाळ यांचे चक्रावून टाकणारे मिश्रण या चित्रपटामधील डॉक्टर बोर्ग या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून बर्गमन यांनी मांडले. त्यानंतर आलेले ‘द मॅजिशियन’ (इं.शी.,१९५८) आणि ‘द व्हर्जिन स्प्रिंग’ (इं.शी., १९६०) हे त्यांचे चित्रपट उल्लेखनीय होते. स्टॉकहोममधील रॉयल डॅमॅट्रिक थिएटरचा दिग्दर्शक म्हणून १९५९ मध्ये त्यांची नेमणूक केली गेली आणि पुढे या संस्थेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कामगिरी बजावली (१९६३–६६).

‘थ्रू ए ग्लास डार्कली’ (इं.शी.,१९६१), ‘विंटर लाइट’ (इं.शी.,१९६२), ‘द सायलेन्स’ (इं.शी.,१९६३) ही इंगमार यांनी दिग्दर्शित केलेली चित्रपटत्रयी (Faith triology) कलात्मक दृष्टीने यशस्वी मानली जाते. त्यांनी कर्मठ धार्मिक वातावरणात व्यतीत केलेले बालपण, त्याबद्दलचे त्यांचे कडवट अनुभव यांचे प्रतिबिंब या चित्रपटांच्या आशयावर पडलेले दिसते. दैववाद, श्रद्धा आणि देवाच्या अस्तित्वाविषयी त्यांना पडलेले प्रश्न त्यांनी या चित्रपटातून अधोरेखित केले. या चित्रत्रयीनंतर मर्यादित व्यक्तिरेखा, त्यांचा व्यक्तिगत अवकाश आणि त्यांची व्यामिश्र मानसिकता या घटकांना बर्गमन यांच्या चित्रपटांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आले.

बर्गमन यांच्या १९५५ पर्यंतच्या चित्रपटांतून रंगभूमीच्या संकेतांचा प्रभाव दिसतो; तथापि मनोविश्लेषणाचे तंत्र वापरून पात्रांचे मानसिक संघर्ष चित्रित करण्याचे वैशिष्ट्य त्यांत आढळते. चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यात असलेल्या अनुबंधांना त्यांनी निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे मानले. त्यामुळेच आपल्या चित्रपटांचा प्रेक्षकांच्या सहभागाशिवाय विचार करण्यास त्यांचा नकार होता. चित्रपटांच्या सांकेतिक नियमांना झुगारून त्यांनी आपल्या चित्रपटांच्या रचना केल्या. ‘समर विथ मोनिका’मधील स्खलनशील नायिका मोनिका ( हॅरीएट अँडरसन) शेवटच्या एका प्रसंगात, कॅफेमध्ये बसलेली असताना अचानक प्रेक्षकांकडे वळून थेट कॅमेऱ्यात, परिणामी प्रेक्षकांकडे बघते, हे एक दृश्य बर्गमन यांची ही अनवट शैली विशद करण्यास पुरेसे आहे. नंतरच्या अनेक चित्रपटांत त्यांनी छायाचित्रणाचे कोन आणि गतिमानता, संकलन, रंगसंगती यांसारख्या तंत्राचा कौशल्याने उपयोग करून चित्रपटाचा आशय संपन्न करण्यात यश मिळविले.

पटकथालेखन आणि पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक चौकटीतील कलात्मकता व सूचकता ही बर्गमन यांच्या चित्रपटशैलीची वैशिष्ट्ये उल्लेखनीय आहेत. ‘पर्सोना’ (इं.शी., १९६६), ‘अवर ऑफ द वुल्फ’ (इं.शी., १९६८), ‘पॅशन ऑफ ॲन’ (इं.शी., १९६९), ‘क्राईज अँड विस्पर’ (इं.शी., १९७३), ‘सीन फ्रॉम द मॅरेज’ (इं.शी., १९७४), ‘ऑटम सोनाटा’ (इं.शी., १९८०) इत्यादी चित्रपटांतून त्यांनी स्त्री-मनाचे तसेच वृद्धापकालीन समस्यांचे हृदयस्पर्शी चित्रण केलेले आढळते. लिव्ह उलमन, बिबी अँडरसन, इन्प्रिड टुलिन यांसारख्या नायिकांचा असामान्य अभिनय बर्गमन यांच्या चित्रपटांतून दिसून आला. ‘फॅनी अँड अलेक्झांडर’ (इं.शी., १९८२) हा इंगमार बर्गमन यांचा चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट मानला जातो. त्यांना बालपणी आलेल्या अनुभवांवर आधारित असलेला हा चित्रपट होता. या चित्रपटानंतर बर्गमन यांनी चित्रपट दिग्दर्शनातून संन्यास घेतला; मात्र त्यानंतर ते रंगभूमी आणि दूरचित्रवाणी या माध्यमातून कार्यरत राहिले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी दूरचित्रवाणीसाठी ‘साराबंद’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले (२००३).

बर्गमन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द व्हर्जिन स्प्रिंग’,  ‘थ्रू ए ग्लास डार्कली’, ’फॅनी अँड अलेक्झांडर’ या तीन चित्रपटांना ऑस्कर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तर ‘वाइल्ड स्ट्रॉबेरी’ या चित्रपटाला बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन बेअर हे पारितोषिक मिळाले आहे.

जागतिक दर्जाचे एक महान दिग्दर्शक असलेले इंगमार बर्गमन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी स्वीडनच्या फारॉ या बेटावर निधन झाले.

समीक्षक : गणेश मतकरी