राशोमोन चित्रपटातील एक दृश्य

प्रसिद्ध जपानी अभिजात चित्रपट. विख्यात जपानी दिग्दर्शक आकिरा कुरोसावा (Akira Kurosawa) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मानवी जीवनावर आणि वर्तनावर मूलभूत चिंतन करणारा हा चित्रपट कलात्मकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे जागतिक अभिजात चित्रपटांमध्ये गणला जातो. सत्य म्हणजे नक्की काय, जगात एकच एक असे सत्य असते, की ते व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असू शकते? एकाच गोष्टीकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते; पण नेमकी खरी गोष्ट कोणती? कुरोसावा यांनी राशोमोन या चित्रपटामध्ये अशा काही अगदी मूलभूत प्रश्नांना हात घातला आहे.

राशोमोन या चित्रपटाची निर्मिती मिनोरू जिंगो (Minoru Jingo) यांची आहे. लेखक रायुनोसुक अकुतागावा ( Ryūnosuke Akutagawa) यांच्या ‘राशोमोन’ याच नावाच्या लघुकथेवरून या चित्रपटाचे शीर्षक घेण्यात आलेले असले, तरी प्रत्यक्षात अकुतागावा यांच्या ‘इन ए ग्रोव्ह’ या लघुकथेवर आधारित या चित्रपटाचे कथानक रचण्यात आलेले आहे. या चित्रपटाची पटकथा दिग्दर्शक आकिरा कुरोसावा आणि शिनोबू हाशिमोटो (Shinobu Hashimoto) यांनी लिहिलेली आहे.

जपानमधील ग्रामीण भागात असलेल्या ‘राशोमोन’ या भग्नावस्थेत असलेल्या, भव्य लाकडी प्रवेशद्वाराच्या दृश्याने चित्रपटाची सुरुवात होते. प्रवेशद्वारापाशी एक लाकूडतोड्या (ताकाशी शिमुरा – Takashi Shimura) आणि एक तरुण धर्मगुरू (मिनोरी चिआकी – Minoru Chiaki) बसलेला आहे. त्या दोघांनीही तीन दिवसांपूर्वी एक भयानक घटना बघितलेली असते. प्रचंड पाऊस कोसळत असताना आणखी एक माणूस तिथे आश्रयाला येतो. हे दोघे मग त्या माणसाला त्या घटनेविषयी सांगतात. त्या लाकूडतोड्याने एका माणसाच्या मृतदेहाचे हात बघितलेले असतात. त्यानंतर तो घाबरून तिथून पळून आलेला असतो. नंतर जेव्हा त्या खुनाचा खटला सुरू होतो, तेव्हा न्यायालयासमोर सगळी हकीकत आपल्यासमोर उलगडत जाते. त्या दिवशी जंगलात घोड्यावरून एक सुंदर तरुणी (माचिको क्यो – Machico kyo) आणि सोबत तिचा सामुराई पती (मासायुकी मोरी – Masayuki Mori) चालत जात असताना ताजोमारू नावाचा त्या भागातला कुख्यात दरोडेखोर त्यांना पाहतो. त्यावेळी तिच्या सौंदर्याचे दर्शन त्या दरोडेखोराला होते आणि त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न होते. त्यानंतर जी घटना घडते, ती तीन वेगवेगळ्या प्रकारे त्या तीन व्यक्तींकडून न्यायालयात आपल्याला ऐकायला मिळते. न्यायालयात दरोडेखोर, ती तरुणी आणि मृत सामुराईचा आत्मा हे तिघेही आपला जबाब देत असतात. या तिघांचेही म्हणणे ऐकल्यावर लाकूडतोड्या स्वत:चे चौथे (आणि आधीच्या तीन जबाबांपेक्षा वेगळेच) म्हणणे सांगतो. हे पाहिल्यावर नक्की काय घडले, याविषयी आपल्याही मनात संभ्रम उत्पन्न होतो. सत्य नक्की काय, याविषयी आपणही विचार करू लागतो. चित्रपटाच्या शेवटाकडे दिग्दर्शक याचे सकारात्मक उत्तर देतो.

कुरोसावा यांनी या चित्रपटाची मांडणी वेधक केलेली आहे. चित्रपट माध्यमाची ताकद त्यातून लक्षात येते. या संपूर्ण चित्रपटात पार्श्वसंगीताने एखाद्या पात्रासारखी भूमिका बजावली आहे. या चित्रपटास संगीत फुमिओ हायासाका (Fumio Hayasaka) यांनी दिलेले आहे. चित्रपट जुन्या काळातला आणि कृष्णधवल असला, तरी ‘राशोमोन’ प्रवेशद्वारावर कोसळणारा पाऊस आणि तिथे बसलेली तीन माणसे हे दृश्य प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणते. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यात भरून आलेले आभाळ आणि कोसळणारा पाऊस, तर शेवटच्या दृश्यात मोकळे झालेले आकाश आणि स्वच्छ पडलेले ऊन ही प्रतीकात्मकता दिग्दर्शकाने चित्रपटाच्या कथेशी साधलेली आहे.

या चित्रपटात तोशिरो मिफुने (Toshiro Mifune) या प्रख्यात जपानी अभिनेत्याने ताजोमारू या दरोडेखोराची भूमिका केली आहे. मिफुने यांनी कुरोसावा यांच्या एकूण १६ चित्रपटांत भूमिका केल्या. त्यापैकी ही दरोडेखोराची भूमिका खास समजली जाते. याशिवाय इतरही सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख केलेल्या आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना यांपैकी कोणत्याही कलाकाराला चित्रपटाचा शेवट काय आहे, हे माहिती नव्हते. चित्रपट तयार झाल्यानंतर याची माहिती सर्वांना मिळाली. कुरोसावा यांना एकच एक असे सत्य सांगायचे नव्हते; तर सत्य नावाची गोष्ट मुळात अस्तित्वात आहे काॽ की ती व्यक्तिपरत्वे बदलते याच मुद्द्यावर लक्ष वेधायचे होते, हेही कलाकारांच्या लक्षात आले. हा चित्रपट २४ ऑगस्ट १९५० मध्ये जपानमधील चित्रपटगृहांमध्ये पहिल्यांदा झळकला.

राशोमोन या चित्रपटामुळे जपानी चित्रपट जागतिक स्तरावर पोचला. या चित्रपटाने व्हेनिस चित्रपट महोत्सवात (१९५१) प्रतिष्ठेचा गोल्डन लायन पुरस्कार पटकावला. याशिवाय १९५२ च्या ऑस्कर सोहळ्यात या चित्रपटाला अकॅडमी ऑनररी पुरस्काराने गौरविण्यात आले. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा जपानमध्ये त्याचे फार काही जोरदार स्वागत झालेले नव्हते. किंबहुना काही टीकाकारांनी या चित्रपटावर टीकाच केली होती. मात्र, अमेरिकेत व पाश्चात्त्य जगात या चित्रपटाचे कौतुक झाल्यावर जपानमधील समीक्षकही गोंधळले होते. हा चित्रपट म्हणजे दुसऱ्या महायुद्धात जपानच्या झालेला पराभवाचे समर्थन करण्याच्या मानसिकतेतून आलेली कलाकृती आहे, असाही काही समीक्षकांनी या चित्रपटाचा अर्थ लावला होता. अर्थात सत्याचा शाश्वत शोध हाच हा सिनेमाचा मूलाधार असल्याने तो जगभरातल्या प्रेक्षकांना आवडला आणि आजही तो जगातील काही सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटानंतर या पठडीतील अनेक चित्रपट तयार झाले. त्यांना ‘राशोमोन इफेक्ट’ अशी संज्ञा मिळाली. या चित्रपटाचे इंग्रजी भाषेतील रूपांतर आउटरेज (The Outrage) हा चित्रपट १९६४ मध्ये पडद्यावर आला.

समीक्षक : अभिजित देशपांडे