ब्रेथलेस हा १९६० साली प्रदर्शित झालेला एक फ्रेंच चित्रपट आहे. या चित्रपटाचे मूळ फ्रेंच नाव À bout de souffle हे आहे. जाँ-ल्यूक गोदार ( Jean-Luc Godard) यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट होता. फ्रेंच न्यू वेव्ह या नावाने पुढे गाजलेल्या चित्रपट चळवळीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील एक पथदर्शी चित्रपट म्हणून त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. प्रतिष्ठेच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.
भुरटा चोर मिशेल (जाँ-पोल बेलमोंदो – Jean-Paul Belmondo) आणि त्याची अमेरिकन मैत्रीण पॅट्रिशिया (जीन सेबर्ग – Jean Seberg) या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. त्या काळी सुमार कलात्मक दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकप्रिय अमेरिकन चित्रपटांप्रमाणे याचे कथानक होते. तरीही त्याच्या अनोख्या शैलीमुळे आणि तत्त्वचिंतनात्मक आशयामुळे जागतिक चित्रपटाच्या इतिहासात या चित्रपटास अन्यन्य स्थान प्राप्त झाले.
तत्कालीन चित्रपटांत रूढ असलेले संकेत प्रयोगशीलता आणि नवोन्मेषी अभिव्यक्तिक्षमता यांच्या उत्कर्षासाठी मारक ठरत आहेत असे गोदार यांना वाटे. त्यामुळे ब्रेथलेसमध्ये त्यांनी असे अनेक संकेत मोडले. व्यक्तिरेखांची मानसिकता आणि कथेतील त्यांचा प्रवास यांना एक स्पष्ट आलेख असणे तत्कालीन चित्रपटांत अपेक्षित असे. त्यानुसार प्रसंग आणि संवाद आधी लिहिले जात; मग अभिनेत्यांसमवेत त्यांची तालीम होत असे आणि अखेर चित्रीकरण केले जाई. त्याउलट, ब्रेथलेसचे चित्रीकरण सुरू होताना कथानकाचा एक साचा फक्त तयार होता. प्रत्यक्ष चित्रीकरणाआधी आयत्या वेळी लिहिलेले संवाद गोदार यांनी अभिनेत्यांकडून तालमीशिवाय म्हणून घेतले. यामुळे व्यक्तिरेखांचा प्रवास तत्कालीन प्रेक्षकांना अनपेक्षित अन अनोख्या रीतीने झाला. पल्लेदार आणि साहित्यिक शैलीत संवाद लिहिण्याची त्या काळी रीत होती. ब्रेथलेसमधील संवाद समकालीन तरुणांच्या वास्तवातल्या भाषेत होते. यामुळे चित्रपटाला वेगळा ताजेपणा प्राप्त झाला. तसेच, चित्रीकरणाआधीचे नियोजन आणि इतर बाबींची काटछाट झाल्यामुळे चित्रपट केवळ चार आठवड्यांत आणि कमी खर्चात पूर्ण झाला.
चित्रपटीय तंत्रामध्येही गोदार यांनी अनेक क्रांतिकारक प्रयोग केले. उदाहरणार्थ, सेट उभारून कृत्रिम प्रकाशात चित्रण करण्याची पद्धत तेव्हा रूढ होती. मात्र, ब्रेथलेसचे बरेचसे चित्रण कॅमेरा हातात घेऊन प्रत्यक्ष स्थळी नैसर्गिक प्रकाशात झाले. पॅरिसच्या मध्यवर्ती भागात गर्दीच्या वेळी लोकांच्या नकळत काही दृश्ये चित्रित करण्यासाठी छायाचित्रकार राऊल (Raoul Coutard) यांना एका ट्रॉलीच्या आत लपवून चित्रण केले गेले. राऊल यांनी यापूर्वी युद्धग्रस्त भागातील वृत्तांकनासाठीचे छायाचित्रण केले होते. त्याची छाप ब्रेथलेसवर पडली असे मानले जाते. कॅमेऱ्याची हालचाल कशी असावी किंवा दृश्य कुठे कापावे अशा बाबतींत तत्कालीन चित्रपटनिर्मितीतील पारंपरिक संकेत गोदार यांनी झुगारले. उदाहरणार्थ, स्थळ-काळ एकात्मता (Unity of Space and Time) असलेल्या प्रसंगात दृश्य कुठे कापावे याचे काही नियम त्या काळी रूढ होते. त्यानुसार, पडद्यावर एकच दृश्य एकाच कोनातून दिसत असताना आणि संवादात व ध्वनीतही सलगता असताना दृश्य कापले जात नसे. गोदार यांनी ब्रेथलेसमध्ये अशा प्रसंगात दृश्य कापले. हे तंत्र पुढे ‘जंप कट’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
ज्या अमेरिकन गुन्हेपटांची प्रेरणा ब्रेथलेसच्या मागे होती त्यांपेक्षा अनेक वेगळे गुणधर्म त्यात दिसतात. उदाहरणार्थ, गुन्हेपटांमध्ये सतत उत्कंठावर्धक घटना घडत राहाव्यात असा संकेत असे. ब्रेथलेस मात्र याला अपवाद ठरतो. नायिका राहते त्या हॉटेलच्या खोलीत नायक आणि नायिका परस्परांशी बोलत आहेत असा एक प्रदीर्घ प्रसंग (सुमारे तीस मिनिटे) चित्रपटात आहे. दीड तासांच्या चित्रपटातील एक-तृतीयांश भाग अशा, म्हणजे कोणत्याही विशेष उत्कंठावर्धक घटनेशिवायच्या संथ प्रसंगात घालवणे, हे गुन्हेपटांत अनोखे होते. शिवाय, मानवी नातेसंबंध, कला, साहित्य, तत्त्वज्ञान, राजकारण अशा अनेक विषयांवर गहन चिंतनात्मक आणि काव्यात्म भाष्य करणारे संवाद चित्रपटात आहेत. याउलट, नायकाकडून एका पोलीस अधिकाऱ्याचा खून होणे अशासारख्या, म्हणजे कथानकातील कृतिप्रधान घटनांचे चित्रण त्यामागचे कार्यकारणभाव अनिश्चित ठेवून आणि त्यातील नाट्यमयता टाळून केलेले आहे. अशा दिग्दर्शकीय निर्णयांमुळे ब्रेथलेसची शैली त्या काळात प्रयोगशील ठरली. कथन, तंत्र आणि आशय अशा अनेकविध पातळ्यांवर सिनेमात एक ताजेपणा आणि चैतन्य ब्रेथलेसमुळे आले. चित्रपटाला फ्रान्समध्ये चांगले व्यावसायिक यशही मिळाले (चार आठवड्यांत सुमारे दोन लाख साठ हजार प्रेक्षक). अनेक नव्या दिग्दर्शकांनी त्यापासून प्रेरणा घेतली. त्यामुळे ब्रेथलेस जागतिक सिनेमाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
संदर्भ :
- कझिन्स, मार्क, द स्टोरी ऑफ फिल्म, पॅव्हिलिऑन प्रकाशन, २००४.
समीक्षक : संतोष पाठारे