जस्ताची ऑक्सिडीकरण अवस्था +२ असलेली संयुगे जास्त प्रमाणात आढळतात, तर +१ ही ऑक्सिडीकरण अवस्था असलेली संयुगे कमी प्रमाणात आहेत. जस्ताची महत्त्वाची संयुगे पुढीलप्रमाणे आहेत.
झिंक ऑक्साइड : ZnO. निसर्गात हे झिंकाइट या धातुकाच्या रूपात आढळते. जस्त हवेत जाळल्यास आणि झिंक कार्बोनेट, झिंक सल्फाइड किंवा झिंक हायड्रॉक्साइड ही संयुगे तापविल्यास झिंक ऑक्साइड बनते.
गुणधर्म व उपयोग : हे एक पांढरे व पाण्यात अविद्राव्य संयुग आहे. तापविले असता ते पिवळे होते व थंड केल्यावर पुन्हा पांढरे बनते. हे उभयधर्मी आहे. अम्लांच्या विक्रियेने यापासून जस्ताची लवणे व क्षारांच्या विक्रियेने झिंकेटे बनतात. बाष्परूपातील जस्त जाळून बनविलेल्या झिंक ऑक्साइडाला ‘झिंक व्हाइट’ किंवा ‘चायनीज व्हाइट’ असे म्हणतात. हे एक महत्त्वाचा पांढरा रंगलेप (paint) आहे. हायड्रोजन सल्फाइडाने ते काळे पडत नाही.
झिंक ऑक्साइडाचा वापर रबराच्या धंद्यात, त्याचप्रमाणे कापड छपाईत, दंतवैद्यकात, औषधांत, चिनी मातीच्या भांड्यांना देण्याच्या चकचकीत लेपमिश्रणात इत्यादींमध्ये केला जातो. मलमे, मलमपट्ट्या सौंदर्यप्रसाधने यांत तसेच रेयॉन निर्मिती, छपाईची पांढरी शाई, मेणबत्त्या इत्यादींमध्येही ते वापरतात.
झिंक ऑक्साइडाचे अब्जांश कण (nanoparticles) सौरदाहप्रतिबंधक क्रीम (sunscreen) बनविण्यासाठी वापरतात.
झिंक हायड्रॉक्साइड : Zn(OH)2. जस्ताच्या लवणाच्या विद्रावांत मर्यादित प्रमाणात क्षार विद्राव मिसळल्यास या संयुगाचा जिलेटिनासारखा अवक्षेप (precipitate) मिळतो. क्षार विद्राव जास्त घातल्यास तो विरघळतो.
गुणधर्म : शुष्क स्वरूपात हे पांढरे चूर्णरूप व पाण्यात अविद्राव्य असून जस्ताप्रमाणेच उभयधर्मी असल्यामुळे अम्लाच्या विक्रियेने ऑक्साइडाप्रमाणेच यापासून झिंक लवणे व क्षाराच्या विक्रियेने झिंकेटे बनतात.
झिंक पेरॉक्साइड : ZnO2. यांचे संघटन अनिश्चित असून त्यात पेरॉक्साइडाबरोबरच हायड्रॉक्साइडही असते. विद्रावात लोंबकळत्या स्थितीत असलेल्या झिंक हायड्रॉक्साइडात हायड्रोजन पेरॉक्साइड घातल्यास झिंक पेरॉक्साइड तयार होते.
गुणधर्म व उपयोग : हे गंधरहित असून क्षोभकारक नसल्यामुळे आणि त्याच्या पूतिरोधक (antiseptic) गुणधर्मामुळे त्वचारोगांवर बऱ्याच प्रमाणात वापरतात.
झिंक क्लोराइड : ZnCl2. जस्त, झिंक ऑक्साइड, झिंक सल्फाइड, झिंक कार्बोनेट किंवा झिंक हायड्रॉक्साइड यांवर हायड्रोक्लोरिक अम्लाची विक्रिया केल्याने सजल झिंक क्लोराइडाचा विद्राव बनतो. हा तापवून संहत केला आणि त्यात थोडे हायड्रोक्लोरिक अम्ल मिसळले, तर ZnCl2·H2O याचे स्फटिक वेगळे होतात परंतु विद्राव आटवून कोरडा केला, तर Zn(OH)Cl व Zn2OCl2 ही संयुगे बनतात. तापविलेल्या जस्तावरून क्लोरिन किंवा हायड्रोक्लोरिक अम्ल प्रवाहित केले, तर निर्जल झिंक क्लोराइड मिळते. औद्योगिक प्रमाणावर त्याचे उत्पादन झिंक सल्फाइडावर क्लोरिनाची विक्रिया करून करतात.
गुणधर्म व उपयोग : झिंक क्लोराइड आर्द्रविद्राव्य (deliquescent) असून त्याचा उपयोग लाकडास कीड लागू नये म्हणून संरक्षक, त्याप्रमाणे चर्मपत्र (एक प्रकारचा टिकाऊ कागद) तयार करण्यासाठी, सक्रियित (activated) कार्बन, रंग, वस्त्र उद्योग व डाखकाम यांमध्ये आणि रासायनिक विक्रियांमध्ये निर्जलीकारक (dehydrating agent) किंवा संघननकारक (condensing agent) म्हणून होतो. जंतुनाशक, पूतिरोधक आणि दुर्गंधीनाशक म्हणून, विद्युत विलेपनात, खनिज तेल शुद्धीकरणात, औषधे, मेणबत्त्या इत्यादींमध्येही त्याचा उपयोग करतात.
झिंक ब्रोमाइड : ZnBr2. झिंक ऑक्साइड किंवा जस्त धातूची हायड्रोब्रोमिक अम्लासोबत विक्रिया झाली असता झिंक ब्रोमाइड तयार होते.
गुणधर्म व उपयोग : हे रंगहीन असून जलग्राही (hygroscopic) आहे (ZnBr2. 2H2O). झिंक ब्रोमाइड बॅटरीमध्ये विद्युत विच्छेद्य (electrolyte) म्हणून वापरतात.
झिंक सल्फेट : ZnSO4. जस्त, झिंक, ऑक्साइड, कार्बोनेट किंवा सल्फाइड यांवर विरल सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया करून स्फटिकीकरण केले म्हणजे सजल झिंक सल्फेट ZnSO4·7H2O या लवणाचे स्फटिक मिळतात. यालाच ‘व्हाइट व्हिट्रिऑल’ असेही म्हणतात.
गुणधर्म व उपयोग : हे पाण्यात विद्राव्य असून त्याचा उपयोग कापड छपाईत, कापड रंगविण्यासाठी व लिथोपोन (झिंक सल्फाइड व सल्फेट यांचे मिश्रण) बनविण्यासाठी मुख्यतः होतो. वनस्पतीच्या पोषणात जस्त सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असते म्हणून त्याचा पुरवठा करण्याकरिताही झिंक सल्फेट वापरले जाते. रेयॉन निर्मितीमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. लिंबू (सिट्रस ) वंशातील झाडांवरील रोगांचा नाश करण्यासाठी, लाकडाच्या संरक्षणासाठी, रबर व रंगलेप उद्योग इत्यादींमध्ये त्याचा उपयोग करतात.
झिंक सल्फाइड : ZnS. निसर्गात ह्याची दोन भिन्न स्फटिकी खनिजे आहेत. व्ह्यूर्टझाइट हे षट्कोणी व स्फॅलेराइट किंवा झिंकब्लेंड हे घनीय आहे.
गुणधर्म व उपयोग : याचा प्रणमनांक (refractive index) उच्च असल्यामुळे वस्तूवर लावण्याच्या रंगलेपात याचा फार उपयोग होतो.
अत्यंत शुद्ध झिंक सल्फाइडात तांबे, चांदी व मँगॅनीज अत्यंत सूक्ष्म प्रमाणात मिसळल्याने त्यास अनुस्फुरणाचा (fluorescence) गुण येतो, म्हणून त्याचा उपयोग घड्याळाच्या तबकडीवरील दीप्तिमान आकडे व दूरचित्रवाणी आणि क्ष-किरण उपकरणांत वापरण्याचे पडदे बनविण्यासाठी होतो.
लिथोपोन : झिंक सल्फाइड आणि बेरियम सल्फेट यांच्या मिश्रणास लिथोपोन म्हणतात. हे एक महत्त्वाचे रंगद्रव्य आहे. गंधकाबरोबर जस्त तापवून याची निर्मिती करतात. हे पाण्यात अविद्राव्य असून अम्लांच्या क्रियेने त्यापासून हायड्रोजन सल्फाइड वायू बाहेर पडतो व त्या त्या अम्लाची लवणे निर्माण होतात.
झिंक कार्बोनेट : ZnCO3. निसर्गात हे कॅलॅमाइन रूपात आढळते. झिंक सल्फेटाच्या विद्रावात सोडियम कार्बोनेट मिसळल्यास झिंक कार्बोनेट अवक्षेपित होते.
झिंक ऑक्साइडाचा राळा (पातळ चिखलासारखे मिश्रण) करून त्यातून कार्बन डायऑक्साइड प्रवाहित केल्यासही झिंक कार्बोनेट बनते.
उपयोग : रंगद्रव्य म्हणून आणि चिनी मातीची भांडी बनविण्याच्या धंद्यात याचा उपयोग होतो. जस्ताची इतर लवणे बनविण्यासही ते उपयोगी पडते. अग्निप्रतिरोधी पदार्थ म्हणून, तसेच सौंदर्यप्रसाधनांत व औषधांतही त्याचा वापर करतात.
झिंक बोरेट : 3 ZnO·2 B2O3. हे स्फटिकी व अस्फटिकी अशा दोन्ही रूपांत आढळते. स्फटिकी प्रकार पाण्यात व अम्लात अविद्राव्य आहे. अस्फटिकी प्रकार मात्र किंचित विरघळतो.
गुणधर्म व उपयोग : अग्निरोधी कापड व रंगलेप बनविण्यासाठी आणि मृत्तिका उद्योगात हे वापरतात. ते पूतिरोधक व कवकरोधक (fungicide) असल्यामुळे औषधांतही उपयोगी पडते.
झिंक ऑर्थोसिलिकेट : Zn2SiO4. हे निसर्गात विलेमाइट या खनिजाच्या रूपात असते. शुद्ध झिंक ऑक्साइड व सिलिका योग्य प्रमाणात घेऊन मिश्रण पुरेसे (१,२००० से.) तापविल्यास तयार होते.
गुणधर्म व उपयोग : शुद्ध झिंक ऑर्थोसिलिकेटच्या अंगी अनुस्फुरणाचा गुण असल्यामुळे हा गुण उपयोगी पडेल अशा कामासाठी ते वापरतात.
झिंक पोटॅशियम क्रोमेट : K2O·4ZnO·4CrO3·3H2O. झिंक ऑक्साइड, क्रोमिक आयन आणि पोटॅशियम डायक्रोमेट यांपासून झिंक पोटॅशियम क्रोमेट किंवा ‘झिंक यलो’ हे संयुग बनते.
गुणधर्म व उपयोग : हे गंधहीन व पिवळ्या रंगाचे असते. पाण्यात अविद्राव्य असते. पोलादाला क्षरणरोधी (corrosion resistant) रंगलेप देण्यासाठी व रंगलेपाचा प्राथमिक हात म्हणून याचा उपयोग होतो.
झिंक फॉर्मेट : Zn(CHO2)2·2H2O. झिंक हायड्रॉक्साइड आणि फॉर्मिक अम्ल यांपासून झिंक फॉर्मेट बनते.
गुणधर्म व उपयोग : याचे पांढऱ्या रंगाचे स्फटिक असतात. हे जलविद्राव्य आहे. याचा उपयोग लाकूड संरक्षक, जलरोधी (waterproofing agent) आणि उत्प्रेरक म्हणून होतो.
झिंक ॲसिटेट : Zn(C2H3O2)2·2H2O. झिंक ऑक्साइडावर ॲसिटिक अम्लाची विक्रिया करून हे बनविता येते.
गुणधर्म व उपयोग : हे पाण्यात व अल्कोहॉलात विद्राव्य आहे. हे रंगबंधक (कापडावर रंग पक्का बसविणारे) व लाकूड संरक्षक म्हणून उपयोगी पडते. झिंक ॲसिटेटाचा वापर औषधांमध्ये देखील केला जातो. उदा., गॅल्झिन.
झिंक स्टिअरेट : Zn(C13H35O2)2. झिंक सल्फेटावर सोडियम स्टिअरेटांची विक्रिया करून हे बनविता येते.
उपयोग : याचा उपयोग सौंदर्यप्रसाधने, औषधे व रबर उद्योग यांमध्ये होतो.
झिंक २, ४, ५ – ट्रायक्लोरो फेनेट : (C6H2Cl3·O)2Zn. या संयुगाचा उपयोग कपाशीच्या बियांवर संस्कार करण्यासाठी होतो.
झिंक हायड्रोसल्फाइट : (झिंक डायथायोनाइट). ZnS2O4. अंशत: तापलेल्या जस्ताच्या जलयुक्त मळीमधून (slurry of zinc dust) सल्फर डायऑक्साइड वायू जाऊ दिला असता झिंक हायड्रोसल्फाइट तयार होते.
उपयोग : लाकडाचा लगदा, कापड, वनस्पतिज तेले, अंबाडी, सरस इत्यादींच्या विरंजनासाठी (bleaching) हे वापरतात.
झिंक-डायएथिल किंवा डायएथिल झिंक : Zn(C2H5)2. जस्त व एथिल आयोडाइड यांच्या रासायनिक विक्रियेने हे संयुग बनते.
गुणधर्म व उपयोग : हे वर्णहीन द्रव असून हवेशी संपर्क होताच पेट घेते. काही प्लॅस्टिकांच्या उत्पादनात उत्प्रेरक म्हणून आणि काहींच्या संश्लेषणात (synthesis) याचा उपयोग होतो.
सोडियम झिंकेट : Na2ZnO2. झिंक हायड्रॉक्साइडाची संहत सोडियम हायड्रॉक्साइडाबरोबर विक्रिया होऊन हे संयुग बनते.
गुणधर्म : हे पाण्यात विद्राव्य आहे.
पहा : जस्त, जस्त निष्कर्षण, जस्त मिश्रधातू.
संदर्भ :
• https://www.medicinenet.com/zinc_acetate-oral/article.htm
• https://www.merriam-webster.com/dictionary/zinc%20hydrosulfite