सजल आणि निर्जल मोरचूद

मोरचूद हे तांब्याचे महत्त्वाचे संयुग असून याचे रासायनिक सूत्र CuSO4. ५ H2O असे आहे. यालाच कॉपर सल्फेट किंवा ब्लू व्हिट्रिऑल असेही म्हणतात.

आढळ : निसर्गात हे कॅल्कॅन्थाइट (Chalcanthite) या खनिजाच्या रूपात आढळते.

भौतिक गुणधर्म : सजल मोरचुदाचे स्फटिक त्रिनताक्ष समूहातील व निळे असून त्यांच्यातील [Cu(H2O)4]++ या आयनामुळे निळा रंग येतो. निर्जल मोरचुदाचा रंग पांढरा असतो.

मोरचूद पाण्यात सहजपणे, तर ग्लिसरीनमध्ये सावकाश व एथिल अल्कोहॉलात अल्प प्रमाणात विरघळते. याचे वि. गु. २·२८४ इतके आहे. याची चव मळमळ उत्पन्न करणारी असते.

साठवण : मोरचूद विषारी असून पोटात गेल्यास धोकादायक ठरू शकते. हवेत उघडे राहिल्यास तिच्यातील बाष्प शोषून घेऊन हा ओलसर बनते. त्यामुळे हेे अनेक पदरी कागदी पिशव्यांत साठवतात.

रासायनिक गुणधर्म : सजल मोरचूद तापविल्यास त्याचे पुढीलप्रमाणे अपघटन (रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) होते. अशा प्रकारे निळ्या कॉपर सल्फेटातील पाण्याचे चार रेणू निघून गेल्याने १०० से. ला निळसर पांढरे मोनोहायड्रेट, २५० से. ला पांढरे निर्जल कॉपर सल्फेट आणि ७५०° से. ला कॉपर ऑक्साइड तयार होते.

निर्जल मोरचुदाचे जलीय विच्छेदन (hydrolysis) अत्यल्प प्रमाणात होते व त्याच्यावर सौम्य हायड्रोक्लोरिक अम्लाची विक्रिया केल्यास क्युप्रिक क्लोराइड (CuCI2) मिळते.

उत्पादन : कॉपर सल्फेटाचे मोठ्या व छोट्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी पुढील पद्धती वापरतात.

(१) परिवर्तक भट्टीत तांब्याची मोड गंधकाबरोबर तापवून प्रथम क्युप्रस सल्फाइड (Cu2S) बनते. नंतर भट्टीत हवा घेऊन या सल्फाइडाच्या ऑक्सिडीकरणाने कॉपर सल्फेट मिळते. हे अशुद्ध सल्फेट विरल सल्फ्युरिक अम्लात विरघळवितात. त्यामुळे अविद्राव्य (न विरघळणारी) अशुद्ध द्रव्ये खाली बसतात. ती काढून टाकून स्फटिकीकरणाने शुद्ध कॉपर सल्फेट मिळवितात.

(२) शिशाचे अस्तर असणाऱ्या मनोऱ्यामध्ये तांब्याची मोड टाकून वरून विरल सल्फ्युरिक अम्लाची फवारणी करतात व खालून हवेचा झोत सोडतात. या पद्धतीत पुढीलप्रमाणे विक्रिया होऊन कॉपर सल्फेट तयार होते व त्याचे स्फटिकीकरणाने त्याचे शुद्धीकरण करतात.

2 Cu + 2 H2 SO4 + O2 → 2 CuSO4 + 2 H2 O

(३) तांब्याचे सल्फाइडी खनिज भाजून कॉपर ऑक्साइड मिळते. हे ऑक्साइड किंवा मॅलॅकाइट व ॲझुराइटासारखी तांब्याची खनिजे यांच्यावर सल्फ्युरिक अम्लाची विक्रिया करूनही कॉपर सल्फेट मिळते.

(४) प्रयोगशाळेत शुद्ध कॉपर ऑक्साइड (किंवा कार्बोनेट) शुद्ध विरल सल्फ्युरिक अम्लात विरघळवून शुद्ध कॉपर सल्फेट बनवितात.

उपयोग : (अ) शेतीविषयक : तांब्याची इतर संयुगे, कीटकनाशके, कवकनाशके (उदा., बोर्डो मिश्रण), पीडकनाशके, पशुखाद्ये, खते इ. बनविण्यासाठी आणि लाकूड व लगदा यांच्या परिरक्षणासाठी कॉपर सल्फेट वापरतात.

(ब) औद्योगिक : मोरचूद हे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे संयुग असून कापड (रंग बंधक म्हणून), खनिज तेल, रंगद्रव्ये, कृत्रिम रबर, चर्म (कातडी कमावणे) इ. उद्योगांत हे वापरतात. विद्युत्‌ विलेपनाने तांब्याचा मुलामा देण्यासाठी विद्युत्‌ घटमालांत याचा वापर करतात.

(क) रासायनिक : वैश्लेषिक रसायनशास्त्रात विक्रियाकारक (उदा., बेनिडिक्ट विक्रियाकारक) बनविण्यासाठी याचा उपयोग होतो. निर्जल कॉपर सल्फेट अल्कोहॉलातील पाणी ओळखण्यासाठी आणि निर्जलीकारक म्हणून वापरतात.

(ड) संकीर्ण : रंगद्रव्य उद्योगातील ॲनिलीन ब्लॅक आणि डायाझो रंगनिर्मितीसाठी; मुद्रण शाईनिर्मितीमध्ये; तांबे परिष्करण (refining), तांबे विद्युत विलेपन, क्युप्रस संयुग निर्मिती यांमध्ये विद्युत विच्छेद्य म्हणून देखील कॉपर सल्फेट मोठ्या प्रमाणात वापरतात.

पहा : बेनिडिक्ट विक्रियाकारक, बोर्डो मिश्रण.