भारतातील मणिपूर राज्यातील एक जमात. मुख्यत: ती चंदेल, इंफाळ, कबावदरी व चुराचंदपूर या जिल्ह्यांत वास्तव्यास असून बांगलादेश व म्यानमार या देशांतही ती आढळून येते.

पारंपारिक वेशात अनल स्त्री व पुरुष

२०११ च्या जनगणनेनुसार यांची लोकसंख्या २३,५०९ होती. तिबेटो-बर्मन ही अनल लोकांची मूळ भाषा आहे. आपापसांत ते अनल भाषेत बोलतात व बाहेरच्या लोकांशी ते मैतेई या मणिपुरी भाषेत बोलतात.

अनल पुरुष व स्त्री हे बुटके, चेहरा थोपटल्यासारखा, नाक थोडे पसरट, डोळे बारीक आणि रंगाने गोरे असतात. १९६२ मध्ये चक्रवर्ती व मुखर्जी यांनी केलेल्या संशोधनातून कळले की, ३४.४% अनल लोकांच्या बोटावर चक्र, ६३.३% लोकांच्या बोटांवर शंख आणि २.२% लोकांच्या बोटांवर कमानी आहेत. अनल पुरुष काळी लुंगी (लुंगविन), सदरा (पाकन लुंगम), धोतर (दिलफूव्म) इत्यादी परिधान करतात; तर महिला लांब झगा, चोळी, महिलेची लुंगी (अनल्नु लुंगविन) इत्यादी वस्त्रे घालतात. सोबतच महिलांच्या अंगावर शाल असते. महिला हातात हल, कुहचो, कुह-पल व कोलेंचो नामक कडे (बांगळ्या); गळ्यात माळा; कानात नाचो, नाहरू, परी इत्यादी दागिने घालतात आणि लुखूम, सामथो नामक केशभूषा करतात.

अनल जमात मंगोलियन वंशातील तिबेटो-बर्मन या कुटुंबातील आहे. पाकन या जमातीपासून त्यांची निर्मिती झाली असून त्यांच्या स्थलांतरामुळे ती अनल, लामकांग, मोयोन व मोनसांग या ४ समूहांत विखुरली गेली आहे. त्यांची चानांग व कोरी ही २ मुख्य कुळे असून सुमारे ४० उपकुळे आहेत.

अनल लोक शूर शिकारी होते. शिकार करणे हा त्यांचा आवडता छंद होता. मासेमारी, सुतारकाम व बांबुच्या वस्तू बनविणे इत्यादी अनल लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. ते स्थलांतरित शेती करतात. त्यांची घरे बहुदा लाकडी व विनाखिडक्यांची असतात.

अनल लोक शाकाहारी व मांसाहारी आहेत. भात हे त्यांचे प्रमुख अन्न असून त्यासोबत ते अंडी, मासे, सर्व प्रकारचे मांस, फळे व भाज्या खातात. अनल लोक पूर्वीपासून दूध पित नाहीत; मात्र काही अनल दुधाचा चहा बनवितात. ते तांदुळ व मक्यापासून बनवलेली ‘झू’नामक दारू पितात.

पारंपरिक वेशात चव्हन कुम्हरी उत्सव साजरा करताना अनल लोक

अनल जमातीत अनेक पारंपरिक उत्सव होते; मात्र कालांतराने बरेच उत्सव लोप पावले असून थोडेच उत्सव शिल्लक आहेत. पैकी ‘चव्हन कुम्हरी’ हा अन्नधान्य कापणीचा उत्सव त्यांचा सर्वांत महत्त्वाचा उत्सव होय. याला ‘हेसू’ असेही म्हणतात. हा उत्सव दरवर्षी २३ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. या वेळी अनल लोक आपले धान्य एकत्र आणतात. आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात. तसेच सर्वांना सुदृढ आरोग्य मिळावे, भरपूर धनधान्य पिकावे इत्यादींबद्दल प्रार्थना केली जाते. उत्सवांच्या दिवशी अनल लोक कमदम किंवा रीदम (सांस्कृतिक नृत्य), लुदम (विजय नृत्य), जकादम (जोडप्यांचे नृत्य) इत्यादी नृत्य करतात व पारंपरिक गाणी म्हणतात.

अनल जमातीमध्ये वेगवेगळ्या कुळांमध्ये लग्न करण्याची पद्धत आहे; परंतु एकाच कुळात लग्न झाले, तर वधु-वरांना वाळीत टाकले जाते. लग्न ठरवून केली जातात. तसेच मुलीला पळवून नेऊनही लग्न करण्याची प्रथा आहे. मुलाकडून ‘हुंडा’ (मिहा) घेतला जातो. जमातीत घटस्फोट मान्य असून घटस्फोट घेणाऱ्याला दंड भरावा लागतो. अनल लोक मृताला पुरतात.

शिक्षण आणि शहरांशी व तेथील विविध जाती-धर्मांतील लोकांशी अनल लोकांचा येत असलेल्या संपर्कामुळे त्यांचे राहणीमान, सण-उत्सव, घरे, व्यवसाय, लग्नविधी इत्यादींमध्ये काळानुरूप बदल होतांना दिसून येत आहे.

संदर्भ : Singh, K. S., People Of India : Anthropological Survey of India, 1998.

समिक्षक : प्रकाश एस. जोशी