भारतातील अंदमान व निकोबार या बेटांवरील एक आदिवासी जमात. त्यांची गणना नेग्रिटो/आफ्रिकन या समुहात होत असुन ते या बेटावरील मूळ रहिवासी म्हणून गणले जातात. इ. स. १८५८ – ५९ मध्ये ग्रेट अंदमानी जमातीची लोकसंख्या सुमारे १०,००० होती; मात्र मद्यपान, विविध रोग, वसाहतीमधील आपापसांतील शत्रुत्व इत्यादी कारणांमुळे त्यांची लोकसंख्या कमी कमी होऊन सुमारे ५९ एवढीच आहे (२०२१).

ग्रेट अंदमानी जमातीचे ओंगी, जारवा आणि जंगील हे तीन वेगळे समूह असून त्यांना ग्रेट अंदमानीज तसेच बर्मीज असेही म्हटले जाते. ही जमात कारी, बो, जेरू, केडे, पुचिकवार, बाले, बी, कॉट, जुऑई आणि कोरा या दहा आदिवासी गटांत अथवा कुळांत विभागला होता; मात्र त्यांपैकी सध्या अंदमान बेटांवर त्यांचे जेरू, कारी आणि बो हे तीनच समूह वास्तव्यास आहेत.

ग्रेट अंदमानी जमातीचे लोक बुटके असून रंगाने काळे व तुकतुकीत आहे. त्यांचे डोके मोठे व रुंद, केस छोटे व मिरीच्या दाण्याप्रमाणे कुरळे असतात. स्त्रिया शरीराने थोड्या जाड आहेत. त्यांची घरे मातीची, उतरत्या छपराची, छपरावर गवत टाकलेली असतात. पूर्वी पुरुष सिंहाची कातडी व स्त्रिया गवती झगे वस्त्र म्हणून परिधान करीत; मात्र आता ते कापडी वस्त्रे वापरतात. तारेमध्ये नाणी ओवून, तसेच मृत व्यक्तीच्या हाडापासून दागिने बनवून ते घालतात. हे लोक आपापसांत अंदमानीज भाषा बोलतात; मात्र त्यांना हिंदी भाषाही अवगत आहे.

ग्रेट अंदमानी लोक पूर्वी अन्न मिळविण्यासाठी शिकार करीत; मात्र कमी लोकसंख्येमुळे आता ते शिकारीला जाणे शक्यतो टाळतात. त्यांचा जंगलातील वस्तूंपासून टोपल्या, चटया, बास्केट बनविणे हा पारंपरिक व्यवसाय होता. पैकी आता त्यांनी केवळ बास्केट तयार करण्याची कलाच टिकवून ठेवल्याचे दिसून येते. मासेमारी हासुद्धा त्यांचा व्यवसाय आहे. मासे व वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस, मटण हे त्यांचे मुख्य अन्न आहे; मात्र गोमांस, बैल आणि म्हशीचे मांस हे लोक खाण्याचे टाळतात. पारंपरिक घरांमध्ये त्यांचे वास्तव्य असते. ही जमात पारंपरिक पद्धती पाळतात.

कमी लोकसंख्या व विस्थापित समूह या समस्यांमुळे त्यांची पारंपरिक गाणी, आणि सण-समारंभ आता लोप पावल्याचे दिसून येते. त्यांच्यात स्त्रियांचा दर्जा पुरुषांपेक्षा कमी समजला जातो. त्यांच्यामध्ये आपल्या जमातीबरोबरच पोटजमातीबरोबरही रोटीबेटी व्यवहार होतो. एक पत्नीकत्व, एक पतित्व ही चाल आहे; मात्र पती अथवा पत्नीचा मृत्यू झाल्यास पुनर्विवाह करता येतो. घटस्फोटाचे प्रमाण त्यांच्यात दिसून येत नाही.

ग्रेट अंदमानी लोक पुलुगा या देवाला मानतात. पुलुगा दैवत संपूर्ण जग व्यापले आहे, असे त्यांचे मत आहे. समूहप्रमुख त्यांच्यात न्यायनिवाडा करीत असतो. नाच व गाणे त्यांच्या आवडीचे आहे. मृतांना हे लोक पुरतात. त्यांचा भूतांवर विश्वास आहे.

ग्रेट अंदमानी समूहातील जारवा जमातीची परंपरा कडक असल्याचे दिसून येते. या जमातीमधील विधवा स्त्रीचे बाहेरील पुरुषाशी संबंध येऊन तीला संतान झाली, तर जमातीतील लोक त्या संतानाला मारून टाकतात. तसेच एखाद्याची संतान त्यांच्यासारखी दिसत नसेल अथवा ती रंगाने गोरी दिसत असेल, तरीही हे लोक त्या संतानला मारून टाकतात. या परंपरेत प्रशासन कोणताही हस्तक्षेप करीत नसल्याचे दिसून येते.

ग्रेट अंदमानी जमात वाढत्या पर्यटकांमुळे व अभ्यासू मानवशास्त्रज्ञांमुळे बाहेरील लोकाशी संपर्कात येत आहे; परंतु त्यांच्या राहणीमानात फारसा बदल दिसून येत नाही.

समिक्षक : लता छत्रे