महाराष्ट्र राज्यातील, मुख्यत: गडचिरोली, यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांतील, एक जमात. त्यांची वस्ती आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतही आहे. २०११ च्या

नाईकपोड महिला व पुरुष

जनगणनेनुसार यांची लोकसंख्या ३८,६२,००० इतकी होती. त्यांची उत्पत्ती महाभारतातील भीम आणि हिडिंबा यांच्यापासून झाली असल्याचे ते मानतात. तेलुगु ही त्यांची मातृभाषा असून राज्यांनुसार ते कन्नड, मराठी या भाषाही बोलतात.

नाईकपोड जमातीतील स्त्री, पुरुष मध्यम बांध्याचे असून वर्ण काळ-सावळा असतो. ते काटक, चपळ, बुजरे असतात. पुरुष गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात सदरा व डोक्यावर फेटा बांधतात; तर स्त्रिया लुगडे व चोळी परिधान करतात. काळानुसार त्यांच्या पेहरावात बदल होऊन आधुनिक वस्त्रेही ते परिधान करीत आहेत. दागिन्यांची त्यांना आवड असून मुख्यत: चांदिचे दागिने ते घालतात. ग्रामीण भागातील त्यांची घरे मातीच्या भिंतींची, ताडाची पाने, बांबू-वेताची असतात. घरांमध्ये ऐपतीनुसार वीज आणि पाण्याची सोय असते.

नाईकपोड यांची अनेक कुळे आहेत. त्यांपैकी पंजारवाड (पुजारी), तलमवाड (विहिरीतून पाणी उपसणारे), लांजेवाड (जंगली प्राणी) आणि कोमुवाड (प्राण्यांची शिंग असलेले) ही काही महत्त्वाची होत. पुरुष कुटुंबप्रमुख असतो. त्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून अन्नधान्य व रेशिम (कोसा) यांचे ते उत्पन्न घेतात. त्याचबरोबर शिकार करणे, मजुरी करणे, गुरे पालन करणे, गवतापासून झाडू व दोरी बनविणे, ताडी विकणे, मासे पकडणे, पत्रावळी पनविणे असे विविध व्यवसाय नाईकपोड जमात करतात. ही जमात बंजारा (वंजारी), गोंड इत्यादी जाती-जमातींशी आर्थिक आणि व्यावसायिक संबंध ठेवल्याचे दिसून येते. शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्यांनी आपल्या पाल्यांना शाळा शिकवितात; परंतु मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी दिसून येते. शिक्षण, सरकारी नोकरी, रोजगार, शेतीतंत्रज्ञानाच्या आधुनिक सोयी-सुविधा इत्यादींमुळे या जमातीची आर्थिक घडी थोड्या प्रमाणात सुधारली आहे. स्त्रियांचा शेतीच्या कामात तसेच पाळीव प्राणी पालन या कामात हातभार असतो.

नाईकपोड लोक शाकाहारी व मांसाहारी आहेत. हे डुकराचे मांस खातात; परंतु गोमांस खात नाहीत. मोहाच्या फुलापासून अनेक खाद्यपदार्थ व दारू बनवून त्यांचे सेवन करतात. तसेच भात, भाजी, पोळी, भाकरी हेही यांचे अन्न आहे.

महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांतील नाईकपोड जमातीत रोटीबेटी व्यवहार केला जातो. लग्न ठरवून होतात. मामेभाऊ किंवा आत्येबहिणीशी, तसेच त्यांच्या इतरही भावकित लग्न केली जातात. काही ठिकाणी मुली आपल्या आई-वडिलांच्या घराजवळच घर बांधून राहतात. वडिलांनंतर मुलगाच संपत्तीचा वारस असतो. जर मुलगा नसेल, तर मुलगी वारस असते. यांच्यात पुनर्विवाहास मान्यता असते.

नाईकपोड यांची लक्ष्मीदेवारा (लच्छम्मा) ही कुलदैवत असून पोच्छम्मा ही त्यांची ग्रामदैवत आहे. तिचे व एल्पू (वाघ) देवतेचे मंदिर गावाच्या वेशीबाहेर असते. याशिवाय किष्टास्वामी, पोतुराज, धरमराज, भिमडू, सहदेवडू, पर्शुरामकडू, जगदंबी, द्रौपदी या देवतांनाही ते भजतात. काही नाईकपोड इतर समाजाचे अनुकरण करून ब्रह्मदेव, शंकर, राम, कृष्ण, हनुमान, लक्ष्मी, कालीमाता या हिंदू देवी-देवतांची पुजाही करतात. काही लोक लग्नासाठी, बाळाच्या जन्मासाठी आणि मृत्युनंतरच्या विधींसाठी ब्राह्मण पुजारी नेमतात. इतर दुसऱ्या विधींसाठी स्थानिक जेष्ठ व्यक्ती किंवा गावाचा पुजारी चालतो.

नाईकपोड लोक संक्रांत व महाशिवरात्र यांच्या मधल्या काळात ‘लक्ष्मीदेवारा बोनालू’ हा पारंपरिक उत्सव थाटात साजरा करतात. या वेळी ते रात्रभर गातात व नाचतात. तसेच पारंपारिक हिंदू सण (होळी, दिवाळी इत्यादी) साजरा करतात. लग्न झालेली स्त्री ‘दिवसो’ नावाचा सण साजरा करते. यासाठी ती पार्वतीची पूजा करून स्वतःच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मांगल्याची प्रार्थना करते.

मृत्यूनंतर मृतदेह दहन करण्याची प्रथा या जमातीमध्ये आहे. त्यांच्यापैकी काही लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून ते मृतदेहाला ख्रिश्चन विधीनुसार दफन करतात.

आज अनेक नाईकपोड लोक शिक्षण घेऊन रोजगार, नोकरीसाठी शहरात वास्तव्यास येत असून त्यांच्या राहणीमान, खानपान, वेशभूषा, घरे इत्यादींत मोठा बदल होताना दिसून येत आहे.

संदर्भ :

Singh, K. S., People of India : Anthropological Survey of India, 1998.

समिक्षक : लता छत्रे