वर्गामध्ये अध्यापनासाठी मार्गदर्शन करू शकणारा आकृतिबंध किंवा आराखडा विद्यार्थी व शिक्षक यांनी परस्पर सहकार्याने विविध शैक्षणिक मार्ग, कृती, पद्धती इत्यादींचा वापर करून तयार करणे म्हणजे अध्यापन प्रतिमाने होय. अध्यापनामध्ये या मार्गाचा अवलंब केल्याने वर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला पूरक वातावरणाची निर्मिती होऊ शकते. प्रतीमानांमध्ये कार्यकारण परंपरा/उपपत्ती दिलेली असते. त्यामुळे विशिष्ट प्रतिमान कशासाठी व का उपयुक्त आहे, हे सांगता येते. तसेच त्या विशिष्ट प्रतीमानाला विशिष्ट उपपत्तीमुळे व्यावहारिक उपयोगितेचा अनुभवसिद्ध पुरावाही असतो. प्रशिक्षक, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, प्रणाली विश्लेषक, मानसपोचारतज्ज्ञ आणि इतर काही स्त्रोतांमधून अध्यापन प्रतिमांनाचा शोध लागला; कारण त्या सर्वांनी अध्ययन-अध्यापनासाठी सैद्धांतिक परिस्थिती विकसित केली. ब्रुस जॉइस यांच्या मते, ‘आपल्याला सहज वापरता येईल अशी कार्यनीती व त्या कार्यनीतीतील प्रत्येक कृतीबाबतची कार्यकुशलता, तसेच आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी कराव्या लागणाऱ्या शैक्षणिक कृती व परिस्थितीची रचना यांसाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचनांचा वापर करून अध्यापनाच्या क्षमतांचा विकास करता येतो’. त्याचप्रमाणे त्यांनी प्रतिमानांचा वापर लवचिकतेने, मात्र त्याच्या मुळ तत्त्वांना छेद न देता करावा. त्याचबरोबर त्या प्रतीमानाची विशिष्ट तत्त्वे व रचना यांचाही तंतोतंत वापर करावा; अन्यथा ते माणसाळविले (डोमेस्टिकेशन) जातात, असे आवर्जून मत मांडले आहे. यात एरिकसन, मॅस्ले, रॉजर्स, आसुबेल, ब्रुनर, स्किनर यांसारखे अध्ययन सिद्धांतकर्ते यांचा समावेश करता येईल. या सर्वांच्या अभ्यासाचा विचार करून ब्रुस जॉइस व मार्शा वील यांनी अध्यापन प्रतिमाने ही संकल्पना मांडली.
प्रतिमांनामुळे आपण वर्गात कसे शिकवावे किंवा विशिष्ट अध्यापन वातावरण कसे निर्माण करावे ते कळते; परंतु शिक्षकाने वर्गात साचेबंदपणे असेच केले पाहिजे, असा आग्रह अभिप्रेत नाही. अध्यापनाच्या या तत्त्वानुसार कार्य केल्यास शिक्षक वर्गामध्ये विशिष्ट हेतूंसाठी पोषक वातावरण निर्माण करू शकतो. याचे प्रमुख कारण ज्या सुस्थिर तत्त्वांवर अध्यापन प्रतिमाने आधारलेली असतात, ती तत्त्वे मानवी अध्ययन व वर्तन बदलाच्या संशोधनातून उदयास आलेली आहेत. अध्यापन प्रतीमाने ही अधिक लवचिक व संशोधनावर आधारित आहे आणि ती प्रामुख्याने विशिष्ट हेतूसाठी वापरावयाची असतात. सर्व प्रतिमाने अध्ययन–अध्यापन संशोधनावर आधारित असून संशोधकांकडून हेतुत: व प्रयत्नपूर्वक निर्मित आहेत. त्यांचे साध्य केल्या जाणाऱ्या शैक्षणिक उद्दिष्टांनुसार वर्गीकरण आढळते. तसेच प्रतिमाने अध्यापनाबरोबरच शिक्षणक्रम, अभ्यासक्रम, शैक्षणिक साधनांची निर्मिती इत्यादींसाठीही मार्गदर्शक ठरतात.
प्रतिमानांचे वर्गीकरण (कुले) : अध्यापन प्रतिमानांचे चार कुलांत वर्गीकरण केले जाते : (१) ज्ञान प्रक्रिया प्रतिमाने : हे प्रतिमान हिल्डा टाबा, रिचर्ड सचमन, जोसेफ श्वॉब, जेरॉम ब्रुनर, डेव्हिड आसुबेल, मायकेल प्रेसले, बिल गार्डन यांनी विकसित केलेल्या सिद्धांतावर आधारित असून याद्वारे विद्यार्थ्यांस माहिती ग्रहण करण्यास अथवा ज्ञानावर मानसिक प्रक्रिया करण्यास मदत होते. उदा., माहितीचे संग्रहण, संकल्प निर्मिती, परिकल्प निर्मिती, समस्या विश्लेषण व उकल इत्यादी. या कुलात उद्गमन विचार प्रतिमान, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान, संबोध साध्यता प्रतिमान, अग्रत संघटक प्रतिमान, स्मृती प्रतिमान, संयुक्त–असंयुक्तिकता या सात उपप्रतीमानांचा समावेश होतो.
(२) व्यक्तिगत विकास प्रतिमाने : ही प्रतिमाने व्यक्तीविशेष वैविध्य, गरजा आणि क्षमता या गोष्टींशी निगडीत असतात. व्यक्तिमत्त्वाचा विकास हे त्याचे प्रमुख ध्येय असते. व्यक्तीच्या भावविश्वाशी ही प्रतिमाने संबंधित असून ती व्यक्तीला सभोवतालच्या नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरणाशी निर्मितीक्षम संबंध प्रस्थापित करण्यास मदत करतात. या कुलात कार्ल राजर्स यांच्या सिद्धांतावर आधारित अनिर्देषित अध्यापन प्रतीमानाचा समावेश होतो.
(३) सामाजिक–आंतरक्रिया प्रतिमाने : या प्रतिमानात व्यक्ती व समाजातील परस्परसंबंधांवर भर दिला जातो. इतरांशी योग्य संबंध ठेवण्याचा, व्यक्तीतील क्षमतेचा विकास करण्यासाठी या प्रतिमानाचा उपयोग करतात. अशा संबंधातून समाजाबरोबरच मनाचा व व्यक्तीचा विकास व्हावा, असे त्याचे प्रमुख ध्येय आहे. हे प्रतिमान हर्बर्ट थेलन, डेव्हिड जॉन्सन, बायरन मसायलस, बेंजामिन कॉक्स, डोनाल ऑलिव्हर, जॉर्ज शॅफ्टेल, फॅनी शॅफ्टेल इत्यादी तज्ज्ञांच्या सिद्धांतावर आधारित असून समूह अन्वेषण प्रतिमान, सकारत्मक परस्परावलंबित्व, सामाजिक पृच्छा प्रतिमान, न्याय तत्त्वशास्त्रीय प्रतिमान, भूमिकापालन प्रतिमान या पाच उपप्रतीमानांचा यात समावेश होतो.
(४) वर्तन–परिवर्तन प्रतिमाने : बाह्य वर्तनातील प्रत्यक्ष बदल हे वर्तन-परिवर्तन प्रतिमानाचे ध्येय आहे. कौशल्याचे प्रशिक्षण, वर्तनातील सुधारणा, निर्धारित कार्यक्षमता साध्य करणे इत्यादींसाठी या प्रतिमानाचा उपयोग होतो. हे प्रतिमान बेंजामीन ब्लूम, जेम्स ब्लॉक, टॉम गुड, कार्ल स्मिथ, मेरी स्मिथ, अल्बर्ट बांदुरा कार्प, बी. एफ. स्कीनर इत्यादींच्या सिद्धांतावर आधारित असून प्रभुत्व अध्ययन प्रतिमान, प्रत्यक्ष अनुदेशन प्रतिमान, अभिरूपता प्रतिमान, सामाजिक अध्ययन प्रतिमान आणि क्रमन्वित अध्ययन प्रतिमान या पाच उपप्रतीमानांचा यात समावेश होतो.
प्रतिमान रचना : कोणत्याही प्रतीमानाचा अध्यापनात वापर करताना पुढील पाच संकल्पनांचा विचार करावा लागतो. (१) सूचनात्मक व संगोपनात्मक परिणाम (इन्स्ट्रक्शनल अँड नर्च्युरंट इफेक्ट्स) : ज्या हेतूने विशिष्ट प्रतिमान वापरले जाते, त्या संबंधित प्रतिमानाचा संगोपनात्मक परिणाम असतो; तर मुख्य हेतू साध्य करत असताना सहज साध्य होणाऱ्या गोष्टींना पोषित परिणाम म्हणतात. उदा., साखर तयार करण्याच्या मुख्य उद्देशाने साखर कारखान्यांची निर्मिती केली जाते; परंतु चॉकलेट, वाईन, ढेप इत्यादी त्याचे सहज साध्य परिणाम असतात.
वाक्यरचना (सिनटॅक्स) : प्रतिमानाच्या कार्यवाहीत कृतींचा एक क्रम असतो. त्याचे वर्णन वाक्यरचनेत (पदबंधात) असते. एखाद्या प्रतिमानाचा वापर करताना सुरुवात कशी करावी? प्रथमत: काय करावे? त्यानंतर कोणत्या कृती कराव्यात? घटनांच्या क्रमांच्या आधारे वाक्यरचनेचे वर्णन असते. त्या घटनांच्या क्रमांना टप्पे किंवा पायऱ्या असे म्हणतात. उदा., प्रत्यक्ष सूचनात्मक प्रतिमानात प्रथम विद्यार्थ्यांची प्रथम पूर्वतयारी करून त्यानंतर त्यांना माहिती/कौशल्य सादर करणे; संरचित सराव करून मार्गदर्शन सराव करून घेणे; सरावाची संधी देणे आणि स्वनियमित सराव ही या प्रतिमानाचे टप्पे होत.
अध्यापक प्रतिक्रिया तत्त्वे (प्रिंसिपल्स ऑफ रिॲक्शन) : प्रतिक्रिया देण्याच्या तत्त्वामुळे शिक्षकांना विशिष्ट प्रतीमानाने शिकविताना विद्यार्थ्यांना कसा प्रतिसाद द्यावा याबाबतचे मार्गदर्शन प्राप्त होते. प्रतिमांनामध्ये विशिष्ट विद्यार्थ्याला विशिष्ट कृतीवर प्रतिसाद देऊन शिक्षक त्यांच्या व्यक्त स्वरूपातील वर्तनाला आकार देतात; परंतु त्याच वेळी इतरांच्या बाबतीत तटस्थ भूमिका घेतात. उदा., सर्जनशीलता विकसित करण्यासाठी असलेल्या प्रतिमानात शिक्षक तटस्थ, परंतु दक्षतेने स्वीकार हा पवित्रा घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वनिर्देशितपणा येतो. प्रतिक्रिया देण्याच्या तत्त्वामुळे शिक्षकांना अनुभवजन्य नियम प्राप्त होतात. त्या नियमांमुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो आणि विद्यार्थी कृतीबाबत योग्य प्रतिसाद निवडही करता येते.
सामाजिक व्यवस्था किंवा प्रणाली (सोशल सिस्टिम) : यामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांनी वर्गामध्ये बजावण्याच्या भूमिका व त्यांच्यातील परस्परसंबंध यांचा समावेश होतो. प्रतिमानानुसार शिक्षकांची भूमिका बदलते. काही प्रतिमानांमध्ये शिक्षक हे समूहात्मक कार्यात सुविधा देणारा (फॅसिलिटेटर), परावर्तक (रिफ्लेक्टर) तज्ज्ञ, व्यक्तींचे समंत्रक असातात; तर काही प्रतिमानात ते शिस्तित कार्य करून घेणारे तज्ज्ञ (टास्कमास्टर) असतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांचा कार्यातील सहभाग व कार्याची सुरुवात करण्याची उत्सुकता ही अधिकाराचे स्थान आणि आंतरक्रियेतून उत्पन्न होणारे कृतीवरील नियंत्रण याबाबींच्या संदर्भात असते. काही प्रतिमाने शिक्षककेंद्री आणि आंतरभरणाचे स्रोत असतात. काही प्रतिमानात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात कार्याची समान विभागणी असते. काहींमध्ये ते संयोजक व परिस्थितीला गती देणारे, तर काही ठिकाणी विद्यार्थी केंद्रस्थानी असतो.
प्रत्येक प्रतिमानात विद्यार्थ्यांच्या विविध कृतीसाठी प्रेरणा दिली जाते. काही प्रतिमानांमध्ये पूर्ण केलेल्या कार्यासाठी शाबासकी दिली जाते किंवा पृछेच्या पुरस्कृत सीमेमध्ये राहून वर्तन केल्याबद्दल शाबासकी दिली जाते; तर काही प्रतिमानात विद्यार्थ्याने जे काही आत्मसात केले असेल, त्याची जाणीव हेच त्यांचे पारितोषिक असते. थोडक्यात, प्रतीमानात भूमिका, संबध, मानके, आकृती या बाबी बाह्य घटकांतून जशा लाभल्या जातात, तशा या बाबी जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांच्या नियंत्रणात असतात. त्या प्रमाणावरून सामाजिक प्रणाली कमी-जास्त साचेबंद असतात.
आधार प्रणाली (सपोर्ट सिस्टिम) : आधार प्रणालीत मानवी कौशल्ये, क्षमता आणि तांत्रिक सुविधा या प्रतिमानांच्या कार्यवाहीसाठी आवश्यक असणाऱ्या नेहमीच्या बाबींशिवाय अतिरिक्त गरजांचा समावेश होतो. उदा., मानवीसंबंध प्रतिमानासाठी प्रशिक्षित नेत्याची गरज असते. एखाद्या अनिर्देशीत प्रतीमानासाठी विशिष्ट व्यक्तीमत्त्व असणाऱ्या व्यक्तीची (अत्यंत सहनशील व आधार देणारे) गरज असते. एखाद्या प्रतिमानाचे गृहीतक स्वयंअध्ययन असेल, तर शिक्षकांची भूमिका केवळ सुलभीकरणास मदत करणारी असते. अशा वेळी कोणती आधार प्रणाली लागेल? असा विचार केला, तर केवळ पाठ्यपुस्तके स्वयंअध्यापन साहित्य उपलब्ध करून देणे एवढ्यापुरतेच ते मर्यादित होते.
समीक्षक : बाबानंदन पवार