इर्लेकर, सुहासिनी : (१७ फेब्रुवारी १९३२ – २८ ऑगस्ट २०१०). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री आणि समीक्षक. १९७० नंतरच्या पिढीतील साहित्यात त्यांचे भरीव योगदान असून बालसाहित्य आणि ललितलेखन या साहित्य प्रकारातही त्यांनी योगदान दिले आहे. जन्म सोलापूर येथे एका सधन कुटूंबात. मूळ नाव लीला वासुदेव मंगळवेढेकर. लग्नानंतर सुहासिनी इर्लेकर या नावानीशी त्या लेखन करू लागल्या. लेखनाचे त्यातही कवितेचे संस्कार त्यांना त्याच्या आईकडून प्राप्त झाले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण सोलापूर येथे झाले. दहावीची परीक्षा त्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केली होती. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना बरीच स्थलांतरे करावी लागली. सयाजीराव महाराज महाविद्यालय, बडोदा; डि.व्ही कॉलेज, सोलापूर;कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय,सातारा आणि राजाराम कॉलेज, कोल्हापूर या महाविद्यालयांमधून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले.त्या उस्मानाबाद येथे शिक्षिका म्हणून प्रारंभी कार्य करीत होत्या नंतर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात मराठी साहित्य विषयात संशोधक म्हणून त्यांनी कार्य केले. “संत कवयित्रीचे वाङ्मयीन कार्य” या विषयावर त्यांनी आचार्य पदवीसाठी संशोधन केले. बीड येथील बलभीम महाविद्यालयात प्राध्यापक व तद्ननंतर प्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केले. शालेय जीवनापासूनच सुहासिनी इर्लेकर यांची साहित्यिक जाणीव प्रगल्भ होत आली आहे.मराठी साहित्यातील गणमान्य साहित्यिकांच्या साहित्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता.
सुहासिनी इर्लेकर यांनी १९४५ च्या सुमारास कवितालेखन सुरु केले होते. संचार या नियतकालिकात त्यांची कविता प्रथमता प्रकाशित झाली होती. साहित्य संपदा : कवितासंग्रह – तृप्ती (१९६१),चित्रांगण (१९७३), अक्षर (१९८४),गाथा,आल्या जुळून तारा, आकाशाच्या अभिप्रायार्थ, बुद्धचरित गाऊ या,छांदस (२०००) ; संतसाहित्यविषयक संशोधन – महदंबेचे धवळे (१९७७), यादवकालीन मराठी काव्य (१९७९), प्राचीन मराठी संत कवयित्रीचे वाङ्मयीन कार्य (१९८०), जनाबाईचे निवडक अभंग : एक चिंतन, नाथाचे रुक्मिणी स्वयंवर (१९८५), ज्ञानेश्वरीचे अंतरंग (संपा, १९९१), तुकारामांची प्रभावळ (१९९२),नामदेवकृत ज्ञानेश्वर चरित्र (१९९५),समर्थ रामदासांची करुणाष्टके (१९९५), नरेंद्रकृत आद्य मराठी महाकाव्य, नाना फडणीस यांचे आत्मचरित्र इत्यादी; बालसाहित्य – पाऊसगाणे, मी भारतीय आहे (संस्कारगीत), आजी आणि शेनवॉर्न, डॉक्टर आणि दादाची परीक्षा (कुमार नाटय), आईचा पाढा (बालकाव्य) इत्यादी.
त्यांची कविता प्रामुख्याने तालबद्ध व गेयता असणारी आहे भावतरल संवेद्य जाणिवांचा आविष्कार त्यांनी आपल्या छंदबद्ध रचनांतून घडविला आहे. त्यांच्या कवितांमधून कौटूंबिक स्त्री जीवनाचे एक अनुभवविश्व प्रकट झालेले आहे. ग्राम्यसंस्कृती आणि महानगरीय सभ्यता या दोन्ही अक्षांवरून ते स्त्री जीवनातील सामाजिक मुल्यभान त्यांच्या कवितेत मांडतात. सृजनशील लेखनाबरोबरच त्या संत साहित्याच्या डोळस कलावादी समीक्षक म्हणूनही साहित्य विश्वात परिचित आहेत. त्यांच्या संतसाहित्यविषयक संशोधकीय लेखनात एक वैचारिक आणि वैज्ञानिक शिस्त आढळते.आध्यात्मिक अशा या संशोधनात त्यांनी चिकित्मक वृत्तीला भावनिकतेची जोड दिली; मात्र त्यातील भौतिक आणि वास्तविक संकेतांची मोडतोड केली नाही. संत साहित्यातील सामाजिक दृष्टिकोन त्यांनी प्रकर्षाने जपला आहे. प्रसिद्ध कलावादी समीक्षक वा.ल.कुलकर्णी यांच्या त्या विद्यार्थिनी होत. त्यामुळे त्यांच्या लेखनावर वा.लंचा प्रभाव जाणवतो.
विपुल वाङ्मयीन लेखनासाठी त्यांचा विविध पुरस्काराने गौरव झाला होता. इंटर नॅशनल युनिव्हर्सिटी कॅलिफोर्नियाद्वारा मानद डी.लिट् पदवी त्यांना प्राप्त झाली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे २००९ साली कंधार येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. एक भावतरल, संवेदनाक्षम कवयित्री, कलावादी मीमांसक व लालित्य पूर्ण शैलीत स्फुट लेखन करणार्या सृजनशील, चिंतनशील लेखिका म्हणून त्या साहित्यप्रांती लक्षवेधी ठरल्या आहेत.
पुणे येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.
संदर्भ : गणोरकर, प्रभा, डहाके, वसंत,आबाजी आणि अन्य (संपा),संक्षिप्त मराठी वाङमयकोश (१९२०-२००३), मुंबई, २००४.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.