(खगोलशास्त्र). लघुग्रह (ॲस्टेरॉइड; Asteroid) आकाराने लहान आणि सूर्यापासून सु. २२—५५ कोटी किमी. अंतरावरआहेत. ते स्वयंप्रकाशी नाहीत. दुर्बिणीचा शोध लागल्या नंतरही २०० वर्षांपर्यंत लघुग्रहांचा शोध लागला नाही. रात्रीच्या आकाशातल्या या अंधुक ठिपक्यांना इतर ताऱ्यांमधून ओळखून काढणे कठीण होते. तसेच मंगळ (Mars) ते गुरू (Jupiter) ग्रहांच्या दरम्यान इतर कोणताही ग्रह नाही, ती जागा रिकामी आहे, असे तात्कालीन खगोलनिरीक्षकांना वाटत होते.
योहान बोडे (Johann E. Bode) आणि योहान टिटियस (Johann D. Titius) यांनी इ.स. १७७२ मध्ये ग्रहांमधल्या अंतराच्या एका सांख्यिक नियमाकडे लोकांचे लक्ष वेधले गेले होते, त्यालाच टिटियस-बोडे नियम (Titius-Bode law; Bode law) असे म्हणण्यात येते. सूर्यापासून ग्रहांच्या कक्षांची स्थाने एका ठराविक संख्या श्रेणीत आहेत, पण यातल्या पाचव्या स्थानावर कोणताही ग्रह नाही असे दिसत होते. यातील ग्रहांची सूर्यापासूनची स्थाने खगोलीय एककात (ख.ए.; AU) ०.४ बुध, ०.७ शुक्र, १.० पृथ्वी, १.६ मंगळ, २.८ कोणी नाही, ५.२ गुरू, १०.० शनी अशी येत होती. अर्थात त्यामुळे पाचव्या २.८ ख.ए. या ठिकाणी एखादा ग्रह असावा अशा कल्पनेतून शोधांची सुरुवात झाली.
सिसिलीच्या पालेर्मो वेधशाळेचे संचालक जुझेप्पे प्यात्सी (Giuseppe Piazzi) हे नवीन तारकासूची तयार करत होते. त्यावेळी १ जानेवारी, १८०१ रोजी, दररोज थोडी स्थान बदल दर्शविणारी एक तारका त्यांना जाणवली. आधी तो एक शेपूट नसलेला धूमकेतू असावा असे वाटले. तिचा कक्षा मार्गनिश्चित करण्यासाठी अधिक निरीक्षणे केल्यानंतर, तो एक लहान ग्रह आहे, असे कळले. पण तो २.८ ख.ए. नव्हे, तर २.७ ख.ए. अंतरावर आहे,असे अनुमान येत होते. तसेच त्याचा अंदाजित व्यास एखाद्या ग्रहासाठी फार लहान, (त्यावेळचा अंदाज ४०० किमी. व्यास; सध्याचे मापन ९५० किमी. व्यास) असल्याने, २.८ ख.ए. जागेवरील त्यापेक्षा मोठ्या ग्रहाचा शोध पुढे चालू राहिला. या मिळालेल्या ग्रहाला सिसिलीचे रक्षण करणाऱ्या आणि रोमन संकल्पनेप्रमाणे शेतीची देवता असणाऱ्या ‘सेरीस (Ceres)’चे नाव देण्यात आले.
सेरीस पेक्षा इथे मोठा ग्रह असला पाहिजे या कल्पनेतून शोध पुढे चालू राहिले. इ.स. १८०२ मध्ये एच्. ओल्बर्स (Wilhelm Olbers) यांना सेरीस समान कक्षा आणि आकारमानाची आणखी एक ग्रह याच अंतरावर सापडली. त्याला ‘पालास (Pallas)’ असे नाव देण्यात आले. हे दोनही ग्रह एकाच मोठ्या ग्रहाचे काही कारणाने झालेले तुकडे असावेत, अशा तर्कामुळे, असे आणखी तुकडे असण्याची शक्यता निर्माण झाली. त्यातून शोध घेण्याचे काम चालूच राहिले. कार्ल हार्डिंगना इ.स. १८०४ मध्ये ‘जूनो (Juno)’ आणि ओल्बर्सना इ.स. १८०७मध्ये ‘व्हेस्टा (Vesta )’ हे आणखी छोटे दोन लघुग्रह सापडले. तेव्हा या चारही ग्रहांना ‘ॲस्टेरॉइड (Asteroid; लघुग्रह)’ असे नाव विल्यम हर्षलने (William Herschel) सुचवले.
अठराव्या शतका अखेर युरेनसच्या (Urenus) शोधानंतर बॅरन फ्रान्झ झेवर फाेन झॅक (Franz Xaver von Zach) यांच्या सोबत २४ जणांच्या एका चमूनेही पाचव्या ग्रहाच्या शोधाचे प्रयत्न केले होते. त्यांना जरी एकही ग्रह सापडला नाही, तरी आयनिक वृत्ताच्या पूर्ण पट्ट्यातील आकाशाचे काटेकोर अद्ययावत नकाशे मात्र त्यातून तयार झाले. नंतर कार्लवुड विग हेन्केला (K. L. Hencke) इ.स. १८४५ मध्ये ‘ॲस्ट्रिया (Astraea)’ सापडला, त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच १९४७ मध्ये ‘हेबे (Hebe)’, ‘एरॉस (Iris)’ आणि ‘फ्लोरा (Flora)’ हे लघुग्रह सापडले. विशेष म्हणजे त्यानंतर असे एकही वर्ष गेले नाही, की ज्या वर्षात लघुग्रहांचा शोध नोंद लागेला नाही. अपवाद १९४५ सालाचा. (दुसऱ्या महायुद्धाच्या कारणाने बहुधा शोध कार्य झाले नसावे.) इ.स. १८६८ पर्यंत १००, इ.स.१८७९ पर्यंत २००, तर इ.स.१८९० पर्यंत ३०० लघुग्रह शोधले गेले होते.
लघुग्रहांच्या शोधासाठी इ.स. १८९१ मध्ये जर्मन खगोल निरीक्षक माक्स वोल्फने (Max Wolf) सर्वप्रथम प्रकाशचित्रणाचा (फोटोग्राफीचा) वापर केला. त्यामुळे लघुग्रहांच्या शोध कार्याचे नवीन पर्व सुरू झाले. लघुग्रह शोधण्यासाठी विविध प्रकारे खगोलचित्रण करण्यात आले. आकाशातल्या एकाच जागेचे, म्हणजे तेच तारे फोटोच्या चौकटीत (प्रतिमाचौकटीत) सतत एकाच जागी येतील अशाप्रकारे, दर तासाने एक असे रोजच रात्री फोटो काढायचे. यासाठी मोठे दृष्टीक्षेत्र असलेली, ताऱ्यांच्या आकाशमार्गी वेगाने हालचाल करणारी ‘चल-दुर्बीण’ (पृथ्वीच्या परिवलन कालावधीशी जुळणारी) वापरतात. यातून मिळालेले फोटो तपासले असता, सगळे तारे जागा सोडत नाहीत, पण कोणतातरी एक अंधुक प्रकाशित बिंदू जागा बदलताना दिसतो.
एका दिवसाच्या कालावधीत या अंतरावरच्या सूर्य कक्षीय खगोलीय ग्रह सु. ३ कोनीय सेकंद (६० कोनीय सेकंद = १ कोनीय मिनिट, ६० कोनीय मिनिटे = १ कोनीय अंश) स्थान बदल करताना दिसतील असे ज्ञात होते. त्यावरूनही नवीन ग्रह मिळाल्याचे कळून येई. सलग चित्रफीतीं पूर्वीही चित्रणे तपासण्यासाठी, एकाच वेळी दोन फोटो एकमेकांशेजारी, मागच्या बाजूने प्रकाशित करून, भराभर बदलत पाहता येतील, अशी रचना असलेले एक यंत्र वापरतात, त्याला ‘त्रिमितीदर्शी (स्टिरिओस्कोप; Stereoscope)’ असे म्हणतात. यात अशा खगोलीय ग्रहाचे विचलन पटकन जाणवते.
दुसऱ्या प्रकारात चल-दुर्बिणीवर कॅमेरा बऱ्याच कालावधीसाठी आकाशाकडे रोखून चित्रणासाठी उघडा ठेवून दिल्यास, या चित्रणात दूरच्या ताऱ्यांच्या प्रतिमा जरी बिंदुवत उमटल्या तरी सूर्यकुलातील कक्षीय ग्रहांच्या प्रतिमा मात्र फराट्यांसारख्या येतात. तर कधी लघुग्रहा समान वाटणाऱ्या ग्रहाला चौकटीत सतत मध्य भागी ठेवून, रोज दर तासाने एक असे अनेक रात्री फोटो काढायचे. हे सारे फोटो जर लागोपाठ पाहिले, तर ते ग्रह जागा बदलत नाही. पण तिच्या संदर्भात इतर ताऱ्यांची जागा बदलून ते सरकलेले दिसतात.
वोल्फची प्रकाशचित्रणातून लघुग्रह शोधांची सुरुवात ‘३२३ ब्रुसिया (323 Brucia)’च्या शोधाने झाली. तो पर्यंत सर्वांनी मिळून शोधलेले ३००पेक्षा थोडेसेच जास्त लघुग्रह माहीत होते. मात्र एकट्या वोल्फ यांनी प्रतिमाचित्ररणाच्या साहाय्याने २४८ लघुग्रह शोधले.
लघुग्रह शोधांचे प्रकल्प : १९५०-१९५२ मध्ये मॅक्डोनल्ड प्रकल्प आणि १९६० पासून पॅलोमार-लायडन प्रकल्प, जो १९७१, १९७३ आणि १९७७या वर्षातही सुरू होता, त्यातून एकूण सु. ५ लाख लघुग्रह शोधले गेले. माध्य प्रतियुतीच्या वेळी प्रतिमाचित्ररणाच्या तंत्राने यांचा शोध घेतला गेला. २१.२ पेक्षा अधिक दृष्यप्रत असणारे आणि २१.५ किमी.पेक्षा जास्त व्यास असणाऱ्या लघुग्रहांचाया शोधांमध्ये समावेश होता.
१९०८ मध्ये झालेल्या ‘तुंगुस्का स्फोटा (Tunguska event)’ची निरीक्षणे आणि ‘अल्वारेझ सिद्धांत (Alvarez hypothesis)’ ज्यात डायनॉसॉरसारखे महाकायजीव एखाद्या अशनी (Meteorite) पाताच्या परिणामाने पृथ्वीतलावरून नाहिसे झाले, असे गृहीतक मनात ठसले होते. अशा अशनी-टकरींच्या भीतीमुळे पृथ्वीजवळून जाणाऱ्या कक्षा असणाऱ्या लघुग्रहांची निरीक्षणे घेण्यासाठी इ.स. १९३० नंतर अधिक चालना मिळाली. यातून अनेक शोध प्रकल्प सुरू झाले. ‘६९२३० हरमेस (69230 Hermes)’ लघुग्रह १९३७ साली पृथ्वीच्या जवळून फक्त ०.००५ ख.ए. अंतरावरून गेला. १९९४ साली गुरू ग्रहाशी ‘शूमेकर लेव्ही ९ (Shoemaker–Levy 9)’ या धूमकेतूची टक्कर झाली. अशा निरीक्षणांमधून लघुग्रहांच्या टकरींमुळे सजीव सृष्टीला होणाऱ्या धोक्याची भीती अधिकच वाढली. शिवाय, अणुस्फोटांच्या निरीक्षणासाठी योजलेल्या लष्करी उपग्रहांनी, १ ते १०मी. आकाराच्या शेकडो अशनींचे पृथ्वीच्या वातावरणात शिरताना होणारे स्फोट नोंदले, त्यामुळे लघुग्रहांच्या शोधांना आणखीनच गती मिळाली. १९९५ पासून अनेक लघुग्रह शोध प्रकल्प सुरू झाले. यातले काही प्रकल्प एका देशाचे होते, तर काही सहकारी तत्त्वावर केलेले बहुराष्ट्रीयही होते.
१) लिनीअर (LINEAR) – लिकोल्न (लिंकन) पृथ्वी समीप कक्षा लघुग्रह मोहीम (Lincoln Near-Earth Asteroid Research)
२) नीट (NEAT) – निअर अर्थ ॲस्टेरॉइड ट्रॅकिंग (Near-Earth Asteroid Tracking),
३) स्पेस वॉच (Spacewatch),
४) लॉवेल ऑब्झर्वेटरी निअर अर्थ ऑब्जेक्ट सर्च (लोनिओज)-Lowell Observatory Near-Earth-Object Search (LONEOS),
५) कॅटेलिना स्काय सर्व्हे (Catalina Sky Survey; सी.एस.एस.; CSS),
६) कॅम्पो इंपरेटर निअर अर्थ ऑब्जेक्ट सर्व्हे (Campo Imperatore Near-Earth Object Survey; सिनेओस; CINEOS)
७) जापनीज स्पेस गार्ड असोसिएशन प्रोजेक्ट – Japanese Spaceguard Association
८) एसियागो – डी. एल्.आर्. ॲस्टेरॉइड सर्व्हे Asiago-DLR Asteroid Survey ((अडास; ADAS)
९) पॅन-स्टारर्स -Pan-STARRS
असे यातले काही मोठे प्रकल्प आहेत. एकट्या लिनीअर प्रकल्पातून २०सप्टेंबर,२०१३पर्यंत १,३८,३९३ लघुग्रह सापडले आहेत. यासगळ्या सर्वेक्षणातून ४,७११ पृथ्वी कक्षेच्या समीप किंवा पृथ्वी कक्षा लांघणारे लघुग्रह मिळाले आहेत. त्यातले ६०० लघुग्रह एक किलोमीटरपेक्षा जास्त व्यासाचे आहेत.
पहा : लघुग्रह, लघुग्रह नामकरण पद्धति.
कळीचे शब्द : #लघुग्रह #मंगळ #Mars #गुरू #Jupiter
संदर्भ :
- https://www.britannica.com/science/asteroid
- https://en.wikipedia.org/wiki/Asteroid
- The Planetary Society, Asteroid Naming Guidelines, Retrieved 14 August 2016.
- मराठी विश्वकोश खंड : लघुग्रह.
समीक्षक : माधव राजवाडे