लघुग्रहांचा शोध १९९८पर्यंत चार पायऱ्यांमध्ये नोंदवला जात असे. आकाशाच्या ठराविक भागाचे सातत्याने (दर दिवशी किंवा ठराविक कालावधीने एका माहीत असलेल्या ताऱ्याची जागा प्रतिमेत कायम त्याच जागी राहील अशा प्रकारे हे चित्रण होत असे) दूरदर्शीच्या साहाय्याने प्रकाशचित्रण केले जायचे. त्याकाळी हे प्रकाशचित्रण काचेवर प्रकाशसंवेदनशील लेप (photosensitive coating; हा चांदीच्या क्षारांचा – सिल्व्हर हॅलाइडांचा असे) लावून हे चित्रण केले जात असे. यातल्या तारका काळ्या अपारदर्शक तर बाकीची काच विकसनाची रासायनिक अभिक्रिया केल्यानंतर पारदर्शकच असे. या तयार प्रतिमांच्या काचा, एकावेळी दोन दिसतील अशा खालून प्रकाशित केलेल्या पारदर्शक चौकटीत ठेवण्याची व्यवस्था केलेली असे. पहिली काच एका जागेवर ठेवून दुसऱ्या काचेच्या जागी भराभर एका मागोमाग एक प्रतिमा-काचा बदलण्याची व्यवस्था असे. याला शेजारी शेजारी दोन प्रतिमा असल्याने ‘स्टिरिओस्कोप’ असे म्हटले जात असे. पण त्यामधून आजच्या त्रिमितिदर्शीमधून (स्टिरिओस्कोप- Stereoscope मधून) जसे दोन प्रतिमांमधून एकच त्रिमित चित्र दिसते तसे काही दिसत नसे, तर काचा भराभर बदल्याने (दृष्टिसातत्याच्या तत्त्वामुळे) बाकीच्या बिंदूंच्या संदर्भात एखादा बिंदू जागा बदलत आहे, असे दिसून येत असे. मग त्या बिंदूचे नीट निरीक्षण केले जायचे. जर एखाद्या प्रकाशबिंदूच्या जागेत फरक होत आहे असे आढळले, तर सूक्ष्मदर्शीचा वापर करून, शेजारच्या ताऱ्यांच्या संदर्भात तिचे आकाशाच्या नकाशातील सूक्ष्म स्थाननिर्देशक (होरानुसार आणि क्रांतिनुसार) काढले जात. मग त्या बिंदूला एक तात्पुरते नाव दिले जाते. त्या नावात ज्या ग्रहाचा शोध लागला ते साल, महिन्यातल्या कोणत्या पंधरवड्यात तो लागला त्याचे एक अक्षर (जानेवारीत ए आणि बी, फेब्रुवारीत सी आणि डी यांप्रमाणे), यादीचे अक्षर आणि अनुक्रमांक अशाप्रकारे हे नाव देण्यात येते. उदा., ‘१९९८ एफ. जे. ७४’. त्यानंतर अशा बिंदूची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा निश्चिती झाल्यावर, तिचे लघुग्रहांच्या यादीत नाव नोंदवले जाते. लघुग्रहाचा शोध ज्याने लावला त्याचे नाव किंवा त्याने सुचविलेले एखादे नाव, अथवा प्राचीन पुराणकथांमधील देवतांची नावे, किंवा राजे, सरदारांचीही नावे लघुग्रहांना देण्यात येतात. उदा., ‘४३३ एरॉस (433 Eros)’, अशी यादी बनवून नावे देण्याचे काम रशियातील लेनिनग्राडच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ थिअरॉटिकल ॲस्ट्रॉनॉमी’ यासंस्थेतर्फे होत असे. सु. २८०० लघुग्रहांची नावे अशाप्रकारे देण्यात आली होती.

४३३ एरॉस

१९९८ नंतरची कार्यपद्धती थोडी बदलली. निरीक्षणातून मिळालेली माहिती स्थान-निर्देशांकांसह आंतरराष्ट्रीय ‘लघुग्रहकेंद्रा’ला (मायनर प्लॅनेट सेंटरला; Minor planet Centre) कळवल्यानंतर अनेक वेधशाळा त्याचे अधिक सखोल निरीक्षण करतात. त्यातून या ग्रहाची कक्षा निश्चित केल्यावर, काही काळानंतर (सु. दोन-तीन महिन्यांच्या कालावधी याला लागतो) या कक्षेच्या अनुषंगाने भाकीत केलेल्या जागी ते ग्रह इतर निरीक्षकांनाही त्या जागी आढळले की, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाच्या (इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमी युनियनच्या: International astronomy union) परवानगीने, सर्वात प्रथम ज्याने निरीक्षण केले त्याचे नाव, किंवा त्याने सुचविलेले एखादे नाव या खगोलीय ग्रहाला देण्यात येते. आता तर विविध प्रकल्पांमधून मिळालेल्या निरीक्षणांच्या उपलब्ध माहितीवरून, ज्यांनी गणिताने, त्या माहितीच्या विश्लेषणातून लघुग्रहाची कक्षा निश्चिती केली आहे, त्यांची नावेही लघुग्रहांना देण्यात आली आहेत. काही संशोधकांची नावे त्यांच्या एकूण जीवनकार्याच्या गौरवार्थही काही लघुग्रहांना देण्यात आली आहेत.

पहा : लघुग्रह, लघुग्रह : शोध

कळीचे शब्द : #लघुग्रह #मंगळ #Mars #गुरू #Jupiter

संदर्भ :

समीक्षक : माधव राजवाडे