सेरीस

(खगोलशास्त्र). (ॲस्टेरॉइड, प्लॅनेटॉइड, मायनर प्लॅनेट). लघु म्हणजे लहान आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या या ग्रहांना ‘लघुग्रह’ असे नाव आहे. स्वत:च्या गुरुत्वाकर्षणाखाली गोलाकार होण्यासाठी या वस्तूंचे वस्तुमान पुरेसे नसल्याने, लघुग्रह अनियमित आकाराचे राहिले आहेत. लघुग्रहांचे आकार धूलीकणांपासून ते शेकडो किलोमीटर आकाराच्या टेकडी/डोंगर/पर्वता एवढे जरी असले, तरी यातल्या एक मीटरहून लहान आकाराच्या वस्तूंना ‘अशनी किंवा उल्का (मिटिअरॉइड; meteorite)’ म्हणतात. एक मीटरपेक्षा अधिक लांब-रुंद ग्रहांनाच लघुग्रह म्हणायची प्रथा आहे. पण सेरीस या सर्वांत मोठ्या लघुग्रहाला ‘बटुग्रह’ किंवा ‘खुजा ग्रह’ अशा एका वेगळ्या गटांत आता सामील केले गेले आहे.

लघुग्रह संख्येने कोट्यावधी असले, तरी मार्च २०२० पर्यंत आंतराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाच्या (आय.ए.यू.; इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमी युनियन; International Astronomical Union) यादीत नावानिशी नोंद केलेले, ज्यांची कक्षा, आकार आणि वर्णपटावरून अंदाजे रासायनिक जडणघडण माहीत झालेले, एकूण नऊ लाख सत्तावन हजार सातशे बेचाळीस लघुग्रह ज्ञात आहेत. बहुसंख्य लघुग्रहांच्या सूर्याभोवती असलेल्या परिभ्रमण कक्षा सर्वसाधारणपणे मंगळ आणि गुरू ग्रहांच्या कक्षांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे या जागेला ‘लघुग्रहांचा पट्टा (Asteroid Belt)’ असे म्हणतात. काही लघुग्रह गुरूच्याच कक्षेत त्याच्या पुढे आणि मागे आहेत. यांना ‘ट्रोजन-लघुग्रहांचा गट (Trojan Asteroid Group)’ म्हणतात. काही लघुग्रह नेपच्यून ग्रहाच्या कक्षेपलीकडेही आहेत. त्यांना लघुग्रहांचा ‘क्यूपर-पट्टा (Kuiper belt)’ असे म्हणतात. काही लघुग्रहांच्या विकेंद्री कक्षा पृथ्वीकक्षेला छेदून जाणाऱ्या आहेत. त्यांचे ‘अपसूर्य स्थान’ (लंबवर्तुळाकार कक्षेतील ग्रहांचे सूर्यापासून सर्वात दूरचे स्थान; याला अपसूर्य बिंदू असे म्हणतात; aphelion point) जरी मंगळापलीकडचे असले, तरी ‘उपसूर्य स्थान’ (लंबवर्तुळाकार कक्षेतील वस्तूचे सूर्यापासून सर्वात जवळचे स्थान; याला उपसूर्य बिंदू असे म्हणतात; perihelion point) शुक्राच्या कक्षेहूनही कित्येकदा कमी असते. अशा लघुग्रहांना ‘पृथ्वीसमीप-लघुग्रह गट’ असे आता नव्याने संबोधण्यात येते.

लघुग्रहांचे साधारणतः तीन प्रकार पडतात.
१. कार्बन बहुलता असणारे
२. सिलिकेटने बनलेले,
३. धातूंची बहुलता असणारे.

सूर्य आणि ग्रहमाला ज्या आंतरतारकीय रेणवीय मेघापासून निर्माण झाले, त्या मेघातून त्याचवेळी लघुग्रहांची निर्मिती झाली असावी. मंगळ आणि गुरू ग्रहांच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे येथे एक मोठा ग्रह निर्माण होऊ शकला नसावा, अशी लघुग्रह निर्मितीबाबत संकल्पना आहे. प्रत्येक लघुग्रहाचे परिवलन वेगवेगळ्या गतीने चालू आहे आणि प्रत्येकाच्या आसाची दिशाही निरनिराळी आहे.

पहा : लघुग्रह शोध; लघुग्रह नामकरण पद्धती. 

कळीचे शब्द : #अशनी #उल्का # सेरीस #क्यूपरपट्टा

संदर्भ :

समीक्षक : माधव राजवाडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.