करणवाघेला : गणपत भिकाजी गुंजीकर आणि खंडेराव भिकाजी बेलसरे यांनी लिहिलेली कादंबरी. ऐतिहासिक-अनुवादित स्वरुपाची ही कांदबरी गणपत कृष्णाजी छापखान्यात सन १८९९ साली प्रकाशित. नंदशंकर तुळजाशंकर यांच्या करघेलो या गुजराती भाषेतील कांदबरीचा हा मराठी अनुवाद आहे. मुस्लिम आक्रमणाच्या काळात स्थानिक राजकारणात झालेले बदल आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये स्त्रियांना जाणवणारी असुरक्षितता ही या कांदबरीची आशयसूत्रे आहेत. प्रस्तुत कादंबरीमध्ये स्त्रियांची परवशता व परस्वाधीनता या सामाजिक प्रश्नाचे दर्शन घडते. गुराथचा शेवटचा रजपुत राजा करणवाघेला याच्या आयुष्यातील व त्याच्या काळातील गुजराथच्या राजकारणातील बदलाचे चित्रण प्रस्तुत कादंबरीत केले आहे. गुजराथ देशातील आव्हिलपूर-पाटण हे एक विस्तीर्ण शहर, तेथे करणवाघेला राज्य करीत असतो. तो शूर, पराक्रमी असतो.पण स्त्रियांबद्दलची आसक्ती हा त्याच्यातला दोष. याच स्वभावदोषामुळे तो माधव या प्रधानाच्या पत्नीकडे (रुपसुंदरी) आकर्षित होतो. तिला प्राप्त करण्याच्या हेतूने माधवला मोहिमेला पाठवून रुपसुंदरीला पळवून आणण्यासाठी करणवाघेला आपल्या सैन्याला पाठवितो. रुपसुंदरीला पळवून आणताना करणवाघेलाचे सैनिक माधवाच्या बंधूला म्हणजेच केशवला ठार करतात. त्यानंतर केशवची पत्नी गुणसुंदरी सती जाते. माधवला हे सर्व कारस्थान समजल्यानंतर तो करणवाघेलाचा सूड घेण्याचे ठरवितो. त्यासाठी तो पाटण शहरावर अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमण आल्यानंतर त्याच्या अलफखां या सरदाराला जाऊन मिळतो. या लढाईत करणवाघेलाचा पराभव होतो. त्यामुळे माधव व रुपसुंदरी यांची भेट होते. माधव रुपसुंदरीला शुध्द करुन स्वीकारतो. इकडे करणवाघेलाची नितांत सुंदर पत्नी कौलारणी हिला अलफखां पातशाहला भेट देण्याचे ठरवितो. तिची रवानगी पातशाहच्या जनानखान्यात करतो. दरम्यान करणवाघेला भटकत भटकत बागलण येथे देवगडच्या राजाच्या आश्रयाला येतो. त्याच्यासोबत त्याच्या दोन्ही मुली देवळदेवी व कनकदेवी बागलण येथे आपल्या पित्यासोबत राहतात. काही काळानंतर कनकदेवीचा मृत्यू होतो. दुसरी मुलगी देवळदेवी ही मोठी होते. तिचे देवगडचा राजकुमार शंकरदेव याच्यावर प्रेम बसते. दोघेही लग्न करण्यास इच्छुक असतात. पण करणवाघेला या विवाहास नकार देतो. पुढे देवळदेवीला दिल्लीला घेऊन येण्याचा पातशहा अलफखांला हुकूम देतो. अलफखां देवळदेवीला पळवून दिल्लीला पाठवितो. पुढे तिचा विवाह पातशहाच्या मुलाबरोबर होतो. हे सगळे कळल्यानंतर करणवाघेला आत्महत्या करायला जातो पण माधव त्याला वाचवितो. शेवटी शंकळदेव व त्याचा भाऊ भीमदेव मुस्लिमांशी युध्द करण्याचे ठरवितात. या लढाईत शंकरदेव ऐन संकटात सापडलेला असताना करणवाघेला त्याच्या मदतीला येतो पण त्या प्रयत्नात तोच ठार होतो. अशाप्रकारे गुजराथच्या शेवटच्या रजपूत राजाचा करणवाघेलाचा अंत होतो. पुढे मुघल राजकर्ते आणि मराठा सरदार यांच्यामधल्या संघर्षात गुजराथची धूळधाण होते.
सदर कांदबरीतील १० प्रकरणे गुंजीकरांनी व ६ प्रकरणे बेलसरे यांनी अनुवादित करूनही कादंबरीमध्ये एकसंधपणा जाणवतो. कादंबरीच्या एका प्रकरणात ललितछंदाची योजना केली आहे.
संदर्भ : गणोरकर, प्रभा,डहाके, वसंत, आबाजी आणि अन्य (संपा),संक्षिप्त मराठी वाङमयकोश , मुंबई, १९९८.