आणवीय वस्तुमान एकक हे अणु, अणुकेंद्रे आणि रेणूंची वस्तुमाने मोजण्यासाठी योजलेले खास एकक आहे. या एककाची संकल्पना डाल्टन याने 1802 साली मांडली. त्याने हायड्रोजनच्या अणूचे वस्तुमान हे एकक मानले होते. त्यानंतर भौतिकीमध्ये ऑक्सिजन-१६ च्या अणूच्या वस्तुमानास 16 ने भागून आलेले वस्तुमान हे एकक मानले जाऊ लागले. या उलट रासायनिकीत मात्र ऑक्सिजनच्या सरासरी वस्तुमानास 16 ने भागून आलेले वस्तुमान हे एकक मानले जाऊ लागले. या एककांना ए. एम. यू. (a. m. u.)  असे नाव देण्यात आले. सर्वसाधारणपणे हवेत मिळणाऱ्या  ऑक्सिजनमध्ये  ऑक्सिजन-17 आणि  ऑक्सिजन-18 चे अणू थोड्या फार प्रमाणात असतात. त्यामुळे भौतिकी आणि रासायनिकीच्या आणवीय वस्तुमान एककाच्या किमतीत थोडा फरक होता.  हा फरक आणि त्यामुळे होणारे संभ्रम टाळण्यासाठी 1960 मध्ये कार्बन-12 च्या अणूच्या वस्तुमानावर आधारित असे वस्तुमानाचे एकक निश्चित  करण्यात आले.  त्यानुसार या एककास यू (u) असे नाव देण्यात आले. या व्याख्येप्रमाणे

१ यू (u) = कार्बन-12 च्या अणूचे वस्तुमान /12

असे आहे. अणूचे वस्तुमान आणि त्या अणूच्या अणुकेंद्राचे वस्तुमान यांमध्ये थोडा फरक असतो कारण अणूच्या वस्तुमानात अणूमधील इलेक्ट्रॉनांचे वस्तुमान तसेच इलेक्ट्रॉनांच्या बंधनऊर्जेइतके वस्तुमान समाविष्ट असते. 2005 नंतर आण्विक वस्तुमान एककास डाल्टन (dalton) असे संबोधण्याचे निश्चित केलेले आहे आणि त्याचे नाव Da असे ठेवले आहे.

प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचे वस्तुमान डाल्टनमध्ये अनुक्रमे 1.0072764668 da आणि 1.0086649 da आहे.  तसेच 1  da = 1.6605173  x 10  -27   kg होय.

पुनर्लेखन व समीक्षण – शशिकांत फाटक