डीझेल तसेच इतर इंधनांमधील सल्फरवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेलशुध्दिकरण कारखान्यात हायड्रोडीसल्फरीकरण ही प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे इंधनातील सल्फरच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यात येते. तसेच ५० पीपीएम. पेक्षा (दशलक्षांश) कमी सल्फर असलेले डीझेल इंधन तयार करण्यास मदत होते.

सल्फर विलगीकरणाची आवश्यकता : पेट्रोलियम पदार्थांमध्ये सल्फर प्रामुख्याने कार्बनी तसेच अकार्बनी स्वरूपात देखील आढळतो. सल्फर क्षपणकारक आहे. सल्फरची संयुगे अम्लीय (उदा., मरकॅप्टने) आणि अल्कली (उदा., थायोफीन, सल्फाइड, डायसल्फाइड) प्रकारची असतात.

वाहनातील एंजिनाच्या किंवा कारखान्यांतील यंत्राच्या इंधनातील सल्फरचे ज्वलन झाले असता सल्फर डायऑक्साइड वायू तयार होतो आणि हवेचे प्रदूषण होते. हे प्रमाण कमी करण्याकरिता हायड्रोडीसल्फरीकरण प्रक्रिया उपयुक्त ठरते.

उत्प्रेरक : हायड्रोडीसल्फरीकरण ही एक उत्प्रेरकी रासायनिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया ॲल्युमिना आधारित उत्प्रेरकाच्या सान्निध्यात होते. याकरिता मॉलिब्डेनम आणि कोबाल्ट (Co-Mo) आणि मॉलिब्डेनम आणि निकेल (Ni-Mo) हे उत्प्रेरक वापरतात.

हायड्रोडीसल्फरीकरण प्रक्रिया

प्रक्रियेचे स्वरूप : विक्रिया मिश्रण (Feed) उच्च दाबाखाली हायड्रोजन वायूच्या संपर्कात आणले जाते. विक्रियाकारकांचे बाष्परूपात रूपांतर होईपर्यंत मिश्रणाला उष्णता दिली जाते. हे मिश्रण उत्प्रेरकाच्या सान्निध्यात येताच हायड्रोडीसल्फरीकरणाची प्रक्रिया घडून येते. नंतर मिश्रणाचे तापमान आणि दाब नियंत्रित करून वायू पृथक्‍करण स्तंभामधून (steam distillation column) जाऊ देतात. मिळालेल्या वायूंचे मिश्रण ऊर्ध्वपातन स्तंभांच्या मालिकेतून जाते. त्याद्वारे प्रोपेन, ब्युटेन, मिथेन इ. वायू मिळवले जातात.

 

 

उच्च उत्कलनांक असलेल्या संयुगांपेक्षा अल्प उत्कलनांक असलेल्या संयुगांमधून सल्फर विलगीकरण करणे सुलभ असते. सल्फर विलगीकरणामध्ये पुढील क्रम दिसून येतो : पॅराफीन < नॅप्थॅलीन <  ॲरोमॅटिक.

उपयोग : (१) हायड्रोडीसल्फरीकरण प्रक्रियेद्वारे अल्पसल्फरयुक्त इंधननिर्मिती करणे शक्य होते. परिणामी वाहन, जहाजे आणि औद्योगिक उपकरणांद्वारे उत्सर्जित होणाऱ्या सल्फर डायऑक्साइड वायूचे उत्सर्जन कमी करण्यास मदत होते. (२) हायड्रोडीसल्फरीकरणाद्वारे विलग करण्यात आलेल्या हायड्रोजन सल्फाइड वायूचे सल्फरमध्ये रूपांतर करण्यात येते किंवा सल्फ्यूरिक अम्लनिर्मितीमध्ये त्याचा वापर करतात.

पहा : डीझेल, सिटेन निर्देशांक.