पेट्रोल हे गॅसोलीन, मोटर स्पिरीट, गॅस (अमेरिका), बेंझाइन (फ्रान्‍स) या नावाने देखील ओळखले जाते.

निर्मिती : निष्कर्षित खनिज तेलाचे आंशिक ऊर्ध्वपातन (Fractional distillation) करून पेट्रोल विलग करण्यात येते. पेट्रोल हे इंधन ३०—२१० से. तापमानादरम्यान उकळणाऱ्या हायड्रोकार्बन रसायनांनी युक्त असते.

शुद्धीकरण : उत्प्रेरकी भंजन (Catalytic cracking) किंवा बहुवारिकीकरण (Polymerization) या पद्धतींचा वापर करून पेट्रोलचे शुद्धीकरण केले जाते.

साठवण : द्विस्तरीय आवरण असलेल्या भूमिगत टाक्यांमध्ये पेट्रोलची साठवण करतात.

गुणधर्म : पेट्रोलची घनता प्रति लिटर ६५० — ७५० ग्रॅ. इतकी असते. पेट्रोल बाष्पनशील, ज्वालाग्राही आणि रंगहीन असते. अन्य पेट्रोलियम पदार्थांपासून त्याची सहज ओळख व्हावी म्हणून त्यात नारिंगी (ऑक्टेन-91), लाल (ऑक्टेन -97) किंवा निळा रंग दिला जातो.

ठिणगी प्रज्वलन : पेट्रोलचालित वाहने ठिणगी प्रज्वलन (Spark ignition) तत्त्वावर कार्यरत होतात. हे इंधन मोटर गाड्यांच्या चार-आघाती (4-stroke) आणि द्विआघाती (2-stroke) वाहनाच्या एंजिनाला कार्यरत करते. एंजिनातील बाष्परूपात रूपांतरित झालेल्या इंधनामध्ये एक ठिणगी सोडली जाते. त्याद्वारे बाष्परूप इंधनांच्या लहानलहान स्फोटांची मालिका होते आणि एंजिन सुरू होते. याला  इंधनी आघात (Knocking) असे म्हणतात. एंजिनातील नळकांड्यामध्ये इंधनाचे ज्वलन होताच एंजिन हादरते व आवाज येतो. या आघातांमुळे एंजिनाचे भाग खराब होऊ शकतात. त्यामुळे इंधनी आघातांना आटोक्यात आणणे गरजेचे असते.

रासायनिक पुरके (Additives) : इंधनी आघात टाळण्यासाठी प्रत्याघाती (Anti-knocking) पदार्थ पेट्रोलमध्ये मिसळतात. तसेच प्रतिऑक्सिडीकारकांचाही यामध्ये समावेश करतात. इंधनामध्ये रेझिननिर्मिती झाल्यास एंजिनाच्या अंतर्गत भागांवर रेझिनांचा थर बसतो. त्यामुळे एंजिनामध्ये बिघाड होऊ शकतो. हे टाळण्याचे कार्य प्रतिऑक्सिडीकारक करतात.

वर्गीकरण : ऑक्टेन निर्देशांकानुसार सामान्य (Regular), मध्यमस्तरीय (Midgrade) आणि अधिस्तरीय (Premium) असे पेट्रोलचे दर्जात्मक वर्गीकरण केले जाते. ऑक्टेन निर्देशांकाप्रमाणे पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ होते.

उपयोग : पेट्रोलचा वापर मोटार सायकल आणि चारचाकी गाड्या यांमध्ये इंधन म्हणून केला जातो. तसेच शेती, बांधकाम आणि वन्य विभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये देखील पेट्रोल हे इंधन म्हणून वापरतात. अत्यावश्यक वीजनिर्मिती यंत्रामध्ये (Electricity generator) पेट्रोलचा वापर होतो.

पर्यावरणावरील दुष्‍परिणाम : पेट्रोल हा विषारी आणि अतिशय ज्वालाग्राही द्रवपदार्थ आहे. पेट्रोलचे बाष्पीभवन तसेच ज्वलन झाले असता तयार होणारे वायू हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. यामध्ये कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, कणयुक्त पदार्थ (Particulate matter) आणि अदग्ध (Unburned) हायड्रोकार्बन यांचा समावेश होतो. पेट्रोलच्या ज्वलनातून तयार होणारा कार्बन डायऑक्साइड हा हरितगृह वायूंपैकी एक होय.

शिसेविरहित आणि हायड्रोकार्बन सुधारित अशा पेट्रोलची निर्मिती करणे तसेच पेट्रोलची गळती रोखणे हे उपाय पेट्रोलच्या पर्यावरणावरील दुष्परिणांना आळा घालण्यासाठी आवश्यक आहेत.

पहा : ऑक्टेन निर्देशांक.