सतराव्या शतकातील संगीतशास्त्रावरील एक प्रसिद्ध ग्रंथ. संगीतकार गोविंद दीक्षितांचा द्वितीय पुत्र पंडित व्यंकटमखी यांनी तो लिहिला असून ते उच्च कोटीचे गायक, वीणावादक, रचनाकार, शास्त्रकार, गणितज्ञ, तत्त्वज्ञ व राजनीतिज्ञ होते. कर्नाटकात ते व्यंकटश्वरी आणि व्यकंटेश्वर दीक्षित या नावांनीही परिचित होते. व्यंकटमखी तंजावरचे नायक राजा अच्युत विजयराघव (कार. १६६०–१६७३) यांच्या दरबारात होते. त्यांच्या प्रोत्साहनाने व्यकंटमखींनी चतुर्दण्डिप्रकाशिका  हा ग्रंथ लिहिला. त्यांनी स्थाय, आलाप, गीत व प्रबंध या चार स्तंभावर संगीताचे विश्व उभे केले, त्यावर या ग्रंथात प्रकाश टाकण्यात आला आहे. म्हणून या ग्रंथास चतुर्दण्डिप्रकाशिका असे नाव देण्यात आले आहे. रागवर्गीकरणासाठी गणितानुसार सांगितलेली अत्यंत तर्कसंगत अशी मेलपद्धती हे या ग्रंथाचे मुख्य योगदान होय. या ग्रंथात एकूण बारा प्रकरणे होती. त्यांपैकी दोन किंवा तीन प्रकरणे लुप्त आहेत.

१) वीणा प्रकरण – या प्रकरणामध्ये शुद्धमेलवीणेच्या पडद्यावर निघणारे १२ स्वर दर्शविले आहेत आणि या वीणेचे दोन प्रकार सांगितले आहेत. त्यानंतर मध्यमेलवीणेवरील स्वरांचे स्वरूप दाखविले आहे. पुढे वीणांच्या उपप्रकारांचे वर्णन केले आहे. रघुनाथेंद्र-मेलवीणा (व्यंकटमखी यांचे वडील गोविंद दीक्षित यांनी संशोधन केलेली ही वीणा) हा वीणेचा तिसरा प्रकार सांगितला आहे. रघुनाथेंद्र-मेलवीणेचे वर्णन करताना नायकराजा रघुनाथाच्या नावावर प्रसिद्ध असलेला संगीतसुधानिधी  हा ग्रंथ वडिलांनी सिद्ध केल्याचे व्यंकटमखी म्हणतात. या वीणांचे स्वरक्षेत्र तीन सप्तकांचे आहे. वरील तीन प्रकारच्या वीणांमध्ये पडदे बसविण्याच्या दोन पद्धती सांगितल्या आहेत.

१. सर्वरागमेल वीणा : या वीणेमध्ये सर्व राग वाजवणे शक्य होऊ शकेल, अशा प्रकारे पडदे निश्चित केलेले असतात.

२. एकरागमेल वीणा : या वीणेमध्ये रागानुसार पडद्यांची योजना बदलावी लागते.

२) श्रुती प्रकरण – यात म्हटले आहे की, श्रुती हा नादविशेष असून स्वराचे कारण आहे; तथापि दोन्ही अभिन्न आहेत. पारंपरिक पद्धतीने २२ श्रुती व सात स्वरांमध्ये श्रुतींचे विभाजन केले असून शेवटच्या श्रुतीवर स्वर स्थापना व असमान श्रुत्यंतर या विषयांची चर्चा केली आहे.

३) स्वर प्रकरण – व्यंकटमखींच्या मतानुसार सप्तकामध्ये सात शुद्ध व पाच विकृत स्वर येतात. रामामात्यांच्या स्वरमेलकलानिधी  या ग्रंथामध्ये सांगितलेल्या सात विकृत स्वरांशी ते सहमत नाहीत. शुद्ध स्वरांचे सप्तक म्हणजेच मुखारी राग व त्याची रचना ४, ३, २, ४, ४, ३, २ या श्रुतीविभाजनाने सिद्ध होते असे ते स्पष्ट करतात. त्यानंतर सप्तकावर आधारित ग्राम, मूर्च्छना, अलंकार, ताना यांची चर्चा आहे.

४) मेल प्रकरण – हे या ग्रंथातील सर्वांत लक्षवेधी प्रकरण आहे. गणिताच्या आधारे सप्तकातील बारा स्वरांपासून एकूण बहात्तर मेल होऊ शकतात. हा सिद्धांत व्यंकटमखींनी या प्रकरणात मांडला. मात्र त्यापैकी स्वत: बनविलेल्या सिंहारव नावाच्या रागाचा एक मेल धरून प्रचलित केवळ एकोणीस मेल व्यवहार्य असून बाकीचे मेल सैद्धांतिक पातळीवर अस्तित्वात असून भविष्यकाळात निर्माण होऊ शकतील अशा सर्व रागांना ते समाविष्ट करू शकतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व मेलांना त्यांनी अनुक्रमांक दिले आहेत. त्यांतील प्रचारात असलेले एकोणीस मेल व मेलपद्धतीतील त्यांचे अनुक्रमांक पुढीलप्रमाणे :

१. मुखारी: मेल क्र. १              २. सामवराळी: मेल क्र. ३          ३. भूपाल: मेल क्र. ८

४. हेज्जुजी: मेल क्र. १३            ५. वसंतभैरवी: मेल क्र. १४         ६.गौळ: मेल क्र.१५

७. भैरवी: मेल क्र. २०              ८. अहिरी: मेल क्र.२१                ९. श्रीराग: मेल क्र.२२

१०. कांभोजी: मेल क्र.२८       ११. शंकराभरण: मेल क्र. २९       १२. सामंत: मेल क्र.३०

१३. देशाक्षी: मेल क्र.३५          १४. नाट: मेल क्र.३६                  १५. शुद्धवराळी: मेल क्र. ३९

१६. पंतुवराळी: मेल क्र.४५      १७. शुद्धरामक्रिया: मेल क्र.५१

१८. सिंहारव: मेल क्र. ५८       १९. कल्याणी: मेल क्र.६५

५) राग प्रकरण – या प्रकरणात ग्रह, अंश, न्यास, अपन्यास, अल्पत्व, बहुत्व, मंद्र, तार, ओडवत्व व षाडवत्व ही दहा प्राचीनोक्त रागलक्षणे आणि त्यांच्या व्याख्या दिल्या आहेत. पारंपरिक ग्रामराग वर्गीकरण, भाषाराग यांचे विवेचन केले असून सुमारे ५७ रागांची रागलक्षणांनुसार माहिती दिलेली आहे.

६) आलाप प्रकरण – रागालापाच्या विविध अवस्थांची चर्चा या प्रकरणात केली आहे. आलापीचा प्रारंभ करणारी आक्षिप्तिका, रागविस्ताराची दिशा दर्शविणारी रागवर्धिनी अथवा करण, स्वस्थान नियमांनुसार येणाऱ्या विदारी, स्थायी, वर्तनी यांचे विवेचन येथे प्राप्त होते.

७) ठाय प्रकरण – हे सर्वात लहान प्रकरण असून यात सहाव्या प्रकरणात दाखविलेली आलापाची पद्धती तीच ठाय होय. मात्र राग संकल्पना समजून घेण्याच्या दृष्टीने हे प्रकरण महत्त्वपूर्ण आहे. रागाचा स्थाय म्हणजे रागवाचक स्वरसमूह. यालाच आजच्या भाषेत रागाचे मुख्यांग म्हणता येईल. रागाच्या स्थायामध्ये राग बीजरूपात असतो. राग आलापीचा तो केंद्रबिंदू असतो.

८) गीत प्रकरण – या प्रकरणामध्ये गीत हा शब्द प्रबंध, आलाप व ठाय यांचा वाचक आहे; तथापि रूढीप्रमाणे गीत याचा अर्थ सालगसूड एवढाच होतो, असा निष्कर्ष काढला आहे. त्यात शुद्ध सूड व सालगसूड या प्रबंधांची चर्चा केली आहे. सालगसूड प्रबंधाचे अट्टताल, रास, एकताली, ध्रुव, प्रतिमठ्ठ व नि:सारू हे सात भेद व त्यांची लक्षणे सांगितली आहे. हा सर्व विषय त्यांनी संगीतरत्नाकर या ग्रंथातून घेतला आहे (१०-६१).

९) प्रबंध प्रकरण – गीत प्रकरणाच्या चर्चेचा पुढील भाग या प्रकरणात आलेला असून प्रबंधाचे उद्ग्राह, ध्रुव, मेलापक व आभोग हे चार धातु व स्वर, ताल, पद, पाट, तेनक, बिरुद ही सहा अंगे सांगून त्यांपैकी ‘तेनक’ ही संज्ञा भांडार भाषेची आहे, असा खुलासा केला आहे. अंगांनुसार होणाऱ्या मेदिनी, आनंदिनी, दीपनी, भावनी व तारावली या प्रबंधांच्या पाच जाती व सुमारे पंचाहत्तर प्रबंधांचे वर्णन केले आहे.

एला प्रबंधाचे १० प्राण – समान, मधुर इत्यादी कल्लिनाथाच्या मताने सांगितले आहेत. त्यातील ओजस्वी नामक दहावा प्राण आभोगरूपाने एलापदांमध्ये अखेरीस वापरावयाचा असतो, असा नियम दिला आहे आणि निष्प्राण प्रबंध-पुरूष शोभणार नाही, म्हणून एला-पदात या दहाही प्राणांना आणण्याचा प्रयत्न वाग्गेयकारांनी कसून करावा, असा उपदेश व्यकंटमखी प्रस्तुत ग्रंथात देतात.

अखेरीस पद-तालांङ्ग-युगल-बद्धस्तारावलीयुत: l l (श्लोक ४८१) असा श्लोक असून त्यानंतर हा ग्रंथ खंडित झाला आहे. मुद्रित मद्रास प्रतीत शेवटी आणखी एका रागलक्षणाचे प्रकरण अनुबन्ध नावाने जोडलेले आहे. त्यात ७२ मेलांचे मुख्य राग , त्यांची लक्षणे व गानसमय दिलेले आहेत.

कर्नाटक संगीत पद्धतीला व्यवस्थित रूप देण्याचे कार्य व्यंकटमखी यांनी केले असे मानले जाते व कर्नाटक संगीत पद्धतीमध्ये आजही हा ग्रंथ महत्त्वपूर्ण मानला जातो.

संदर्भ :

  • मालवीय, श्रद्धा, भारतीय संगीतज्ञ एवं संगीतग्रंथ, कनिष्क पब्लिशर्स अँड डिस्ट्रिब्यूटर्स, नई दिल्ली.
  •  वर्मा, सिम्मी, प्राचीन एवं मध्यकाल के शास्त्रकारोंका संगीतमें योगदान, कनिष्क पब्लिशर्स अँड डिस्ट्रिब्यूटर्स नई दिल्ली, २०१२.
  • देसाई, चैतन्य, संगीतविषयक संस्कृत ग्रंथ, नागपूर, १९७९.
  •  Sangeet Mahabharati, The Oxford Encyclopedia of the Music of India, Vol I, Oxford University Press, 2011.
  • sathyanarayana, R., Caturdandiprakasika of Sri Venkatamakhin (श्रीवेङ्कटमखीविरचिता चतुर्दंडी प्रकाशिका),  Vol. I (2002), Vol. II (2006), Indira Gandhi National Centre for the Arts, New Delhi.
  • Sreenivasrao blog, http://sreenivasraos.com/tag/chatur-dandi-prakashika

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा