या आसनात चेहेऱ्यावरचे उग्र भाव सिंहमुखाची आठवण करून देतात म्हणून या आसनाला सिंहासन हे नाव दिले आहे. घेरण्डसंहिता, हठप्रदीपिका, वसिष्ठसंहिता, त्रिशिखिब्राह्मणोपनिषद्, दर्शनोपनिषद्, शांडिल्योपनिषद् या सर्व ग्रंथांमधे सिंहासनाचे वर्णन आहे. या आसनाला सिंहमुद्रा असेही म्हणतात. या आसनात बंध लावणे सहज शक्य होते व मन एकाग्र होते.
कृती : हठप्रदीपिकेनुसार (१.५०-५२ ) या आसनात मूल, जालंधर व उड्डियान या तीनही बंधांचा उपयोग करावा असे म्हटले आहे.
जमिनीवरील आसनावर दण्डासनात बसावे. आधी उजवा पाय वाकवून पाऊल वृषणाखालून/ योनीखालून डावीकडे (नितंबाखाली) ठेवावे. नंतर डावा पाय उजव्या पोटरीच्या खालून उजवीकडे ठेवावा. तळहात गुडघ्यांवर किंचित दाबून थोडे पुढे झुकून दोन्ही टाचा व पावले विरुध्द बाजूच्या नितंबाखाली (वृषणाच्या/योनीच्या) दोन्ही बाजूस येतील अशी रचना करावी व टाचांवर भार येईल असे बसावे. गुडघे जमिनीवर टेकलेले राहतील असे पाहावे. हात ताठ ठेवावेत. हातांचे पंजे गुडघ्यांवर पालथे ठेवावेत व बोटे पसरलेली असावीत. आता तोंड जास्तीत जास्त उघडून जीभ पूर्ण बाहेर ताणावी. दृष्टी नासाग्र किंवा भ्रूमध्य येथे ठेवावी (घेरण्डसंहिता २.१५). सिंहमुद्रेमधे भुवया उंचावून, डोळे विस्फारून, जबडा सिंहाच्या उघडलेल्या जबड्यासारखा असावा व चेहेऱ्यावर उग्र भाव धारण करावा. श्वसन शक्यतो नाकाने सुरू ठेवावे. या स्थितीत १५ ते २० सेकंद किंवा शक्य असल्यास त्याहीपेक्षा जास्त वेळ राहता येईल. आसन सोडताना जीभ आत घेऊन तोंड बंद करून हातपाय सोडवून साधी मांडी घालून किंवा पाय पसरून विश्रांती घ्यावी.
लाभ : जीभ बाहेर ताणली जाते तेव्हा सर्व लाळग्रंथींना व घशाला व्यायाम मिळतो. तेथील रक्ताभिसरण वाढते. थायरॉईड ग्रंथीला उत्तेजना मिळते. तिचे कार्य सुधारते. आवाज सुधारतो. ओटीपोटाच्या स्नायूंनाही उत्तम व्यायाम मिळतो. मन एकाग्र होते व मनोदौर्बल्य दूर होते. या आसनामुळे सर्व रोगांचा नाश होतो असे घेरण्डसंहिता (२.१५) म्हणते. या आसनामुळे सर्वसाधारण स्वास्थ्य टिकवून ठेवण्यास मदत होते.
विधिनिषेध : हे आसन खूप प्रयत्न करून शक्ती खर्च करून करू नये. सहजतेने करावे.
स्वामी जनार्दन, नागपूर यांनी त्यांच्या पुस्तकात सिंहासनाशी साम्य असणारे व्याघ्रासन या नावाचे आसन दिले आहे. यात पद्मासनात बसून हात बाजूला जमिनीवर ठेवून, जिवणी दोन्ही बाजूस हसताना ताणली जाते त्याप्रमाणे ताणून, छाती फुगवून दृष्टी सरळ समोर ठेवावी.
हठप्रदीपिकेमध्ये सिद्ध, पद्म, सिंह आणि भद्र ही चार आसने श्रीशंकरांनी सांगितलेल्या ८४ आसनांत प्रमुख आहेत, असे सांगितले आहे (हठप्रदीपिका १.३४).
समीक्षक : श्रीराम आगाशे