चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढीपाडवा असे नाव असून या तिथीला वर्ष प्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष (इ.स.सु. ७८ वर्षांनंतर) या दिवसापासून सुरू होते. दक्षिण भारतात तसेच भारताच्या इतर भागात नूतन वर्षारंभ याच दिवशी मानतात. ‘शालिवाहन’ ‘सातवाहन’चा अपभ्रंश असावा. सातवाहनांपैकी कोणी व कोणत्या प्रसंगी हा शक सुरू केला, हे निश्चितपणे सांगता येत नाही. शक हे परकीय असून त्यांच्यावर सातवाहनांनी मिळविलेल्या एखाद्या महत्त्वाच्या विजयदिनापासून ह्या शकाची सुरुवात झाली असावी, असे काही विद्वान मानतात. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात वर्षाचा आरंभ निरनिराळ्या देशांत भिन्नभिन्न महिन्यात होत असे. सु. ८०० वर्षांपूर्वी काश्मीर प्रांतात चैत्र हाच महिना प्रथममास मानीत, असे इतिहासकार अल बीरूनीच्या लेखांवरून दिसते. चैत्र शुद्ध १ हा दिवस तेथील लोक मोठ्या उत्साहाने पाळीत व हा परशत्रूस राजाने मागे हटविल्याचा दिवस आहे, असे ते समजत. गुप्तराजांची सत्ता एके काळी उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र पसरली होती, तेव्हा चैत्रारंभी वर्षारंभ होत असे, असे प्राचीन लेखांवरून दिसते.

वसंत ऋतूचा आरंभ याच दिवशी होतो. अनेक उत्सव या ऋतूस योग्य असल्याचे रूढ आहे. चैत्र मास अधिक मास असल्यास नूतन वर्षाचा आरंभ अधिकमासीच होतो. या तिथीला ‘युगादितिथी’ असेही म्हणतात. या दिवशी शक्य असेल तर पाणपोई घालावी. चैत्रापासून चार महिन्यांपर्यंत प्राणिमात्रास जलदान करावे, असे सांगितले जाते. हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त असून कोणत्याही नवीन कार्यारंभास हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, अशी श्रद्धा आहे. पुराणात गुढी पाडव्यादिवशी काही धार्मिक विधीही सांगितले आहेत. त्यात ब्रह्मपूजा हा महत्त्वाचा विधी असतो. महाराष्ट्रासारख्या ज्या काही प्रांतांत वर्षाचा आरंभ चैत्र महिन्यापासून होतो तेथे त्या महिन्याची पहिली तिथी समारंभाने आणि धार्मिक विधी करून साजरी करण्यात येते.

श्रीरामचंद्र चौदा वर्षे वनवास करून सीतेसह आपल्या नगरीत परत आला तो दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदा होता, यासाठी हा दिवस वर्षाचा पहिला दिवस मानतात. वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला व त्याला स्वर्गातील अमरेंद्राने या दिवशी वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला. ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेस सृष्टी निर्माण केली, अशा कारणांनी हा दिवस संवत्सराचा पहिला दिवस ठरला. अशा अनेक धार्मिक समजुती या सणामागे आहेत.

या दिवशी मंगलस्नान करून स्त्रीपुरुष, मुले नवीन वस्त्रे परिधान करतात. घरासमोर गुढ्या-तोरणे उभारतात. बांबूच्या किंवा कळकाच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे वा पितळेचे भांडे पालथे घालून त्याला कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ व साखरेची माळ बांधतात आणि पूजापूर्वक ती सजवलेली गुढी दारात उभारतात. गुढी उभारण्यावरूनच या दिवसास ‘गुढी पाडवा’ म्हटले जाते. शिवाय दरवाजासमोर चौरंग ठेवून त्याच्यावर ठेवलेल्या कलशाची पूजा करण्याचाही प्रघात काही ठिकाणी आहे. कलश व पताकायुक्त गुढी ही आनंदोत्सवाची दर्शक आहे. या सणाच्या निमित्ताने होणारे जलदान, निंबभक्षण हे निसर्गप्रेमाचे निदर्शक आहे. कडुलिंबाची पाने, मिरे, हिंग, लवण, जिरे व ओवा यांसह खाल्ली असता आरोग्य, बल, बुद्धी व तेजस्विता प्राप्त होते, असे म्हटले जाते.

प्रत्येक धर्मात वर्षारंभाचा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो. त्यादृष्टीने चैत्रारंभ हा वर्षारंभाचा दिवस हिंदू लोक मानतात. नूतन वर्षाच्या उदयाबरोबर अंतःकरणात नवीन आशांकुर उत्पन्न होऊन नवीन वर्ष आनंदात जावो, अशी सदिच्छा उत्पन्न होत असते. त्यामुळे एकमेकांची प्रेमाने भेट घेऊन सदिच्छा देण्याबरोबरच आपल्या अंतःकरणात सत्कर्माबद्दल उमेद व दुष्कर्माबद्दल पश्चात्ताप उद्भवून आपले वर्तन सुधारण्यासाठी प्रेरणा देणारा हा सण महत्त्वाचा मानला जातो.

https://www.youtube.com/watch?v=ZUHtnsHm3zc

संदर्भ :

  • आर्यांच्या सणांचा इतिहास, व्ही. प्रभा आणि कंपनी, मुंबई, १९६४.
  • ‘ऋग्वेदी−दुभाषी, वामन मंगेश, आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास, वाई, १९७९.
  • भट, यशवंत आबाजी, भारतरत्न म. म. डॉ. काणेकृत धर्मशास्त्राचा इतिहास (उत्तरार्ध), साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९७०.