नाताळ किंवा ख्रिस्मस हा ख्रिस्ती धर्मीयांचा आनंदाचा आणि उल्हासाचा सण. प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून तो जगभर २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ‘दिएस नातालिस’ (जन्म दिवस) या लॅटिन शब्दातील ‘नातालिस’ या शब्दावरून ‘नाताळ’ हा शब्द रूढ झाला. सुरुवातीच्या काळात नाताळचा सोहळा साजरा केला जात नसे; कारण तेव्हा मृत्यूदिनच पाळले जात. येशू ख्रिस्त यांच्या पुनरुत्थानानंतर त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या विचारांचा प्रचार सुरू केला. त्याला यहुदी लोकांनी प्रखर विरोध केला. सुरुवातीच्या काळात शिष्यांचा व नवख्रिस्ती लोकांचा प्रचंड छळ केला गेला. हजारो लोकांना तुरुंगात डांबले गेले. अनेकांना कंठस्नान घातले गेले. कित्येकांना उकळत्या तेलाच्या कढईत टाकण्यात आले. तर कित्येकांना भुकेल्या सिंहाच्या पुढ्यात टाकण्यात आले. तब्बल ३१७ वर्षे हा छळ सुरू राहिला. म्हणून येशू ख्रिस्त यांच्यासाठी मरणाऱ्यांचे मृत्यूदिन पाळण्याची प्रथा सुरू झाली.
इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे येशू ख्रिस्त यांची निश्चित जन्मतारीख उपलब्ध नाही; परंतु चौथ्या शतकात, चारही शुभवर्तमानातील वर्णनानुसार, त्या काळी परंपरेने २५ डिसेंबर रोजी पाळल्या जाणाऱ्या ‘हिवाळी सणाच्या’ (Winter Solstice) दिवशी नाताळचा सोहळा साजरा केला जाऊ लागला.
डिसेंबरच्या सुमारास नॉर्स लोक ‘यूल’ नावाचा (हिवाळा संपल्यावर सूर्याचा जणू पुनर्जन्मच होतो या कल्पनेतून) व रोमन लोक ‘सॅटर्नेलिया’ नावाचा (सॅटर्न या कृषिदेवतेचा तसेच सूर्यदेवतेच्या पुनर्जन्माचा) उत्सव साजरा करताना एकमेकांना विविध भेटवस्तू देऊन आनंदोत्सव करीत. येशू ख्रिस्त हेही जगाला प्रकाश दाखविणारे आहेत, या कल्पनेतून त्या उत्सवांशी त्यांचा संबंध जोडला गेला. तसेच नाताळ सण २५ डिसेंबर या दिवसाशी निगडित झाला. त्यावरूनच नाताळ कसा साजरा करावा, याची कल्पनाही सूचली.
नाताळ हा सण २५ डिसेंबर रोजी रोम येथे प्रथम चौथ्या शतकाच्या पूर्वार्धात साजरा केला गेल्याची माहिती मिळते. पूर्वेकडील रोमन साम्राज्यात मात्र येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन व त्यांचा बाप्तिस्मा झाल्याचा दिवस म्हणून ६ जानेवारी हा दिवस पाळला जाई; तथापि तेथे नाताळ सणाची कल्पना नव्हती. नंतर मात्र २५ डिसेंबर रोजी तेथे, जेरूसलेमचा अपवाद सोडता सर्वत्र येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून नाताळ साजरा होऊ लागला आणि ६ जानेवारी हा दिवस त्यांचा बाप्तिस्मादिन म्हणूनच समजला जाऊ लागला. पुढे दहाव्या शतकात नाताळ साजरा करण्याची २५ डिसेंबर ही तारीख सूर्याच्या अयनान्तावरून (हिवाळा संपतो व दिवस मोठा होऊ लागतो म्हणून) ठरविण्यात आली.
नाताळआधीचे चार रविवार हे येशू ख्रिस्त यांच्या आगमनकाळाचे (Advent) रविवार म्हणून गणले जातात. त्याचप्रमाणे कॅथलिक परंपरेनुसार चर्चमध्ये वेदीजवळ तीन जांभळ्या व एक गुलाबी अशा मेणबत्त्या, प्रत्येक रविवारी एक या प्रमाणे, प्रज्वलित केल्या जातात. त्या वेळी धर्मगुरू तारणाऱ्याच्या आगमनाचे सुतोवाच करतात. चर्चमध्ये सुमधुर गायने (Carols) गायिली जातात. नाताळच्या रात्री मात्र वेदीजवळ शुभ्र रंगाच्या मेणबत्त्या उजळल्या जातात.
नाताळ सणासाठी २४ डिसेंबरच्या संध्याकाळी (याला ‘ख्रिस्मस ईव्ह’ म्हणतात) भाविक रंगीबेरंगी, आकर्षक व ठेवणीतले कपडे परिधान करून चर्चमध्ये जातात. प्रार्थनाविधीत बायबलमधून तारणाऱ्याच्या आगमनाच्या भविष्यवाणीचे तसेच येशू ख्रिस्त यांच्या जन्मकथेच्या वृत्तांताचे वाचन केले जाते. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे येशू ख्रिस्त यांची आई मरिया (मेरी) या नाझरेथ गावातील एक कुमारिका होत्या. त्या प्रार्थनेत राहून अतिशय पवित्र जीवन जगत होत्या. दाविद (डेव्हिड) यांच्या घराण्यातील जोसेफ (योसेफ) नावाच्या पुरुषाबरोबर त्यांचा वाङ्निश्चय झाला होता. एके दिवशी त्यांना दिव्य दृष्टांत झाला. गॅब्रिएल नावाच्या देवदूतांनी त्यांना देवाचा निरोप सांगितला, ‘‘नमन तुला मरिये, देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पवित्र आत्म्याद्वारे तू गर्भवती होशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू ठेव. तो थोर होईल. त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभूदेव त्याला त्याचा पूर्वज दाविद यांचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही’’ (बायबल, लूक १ : २७–३३). मरिया यांनी देवाच्या इच्छेला होकार दिला.
कालांतराने रोमन सम्राट सीझर ऑगस्टस यांनी जनगणनेचे फर्मान जारी केले. मरिया यांचे पती जोसेफ हे दाविद यांच्या वंशातील असल्यामुळे त्यांना दाविद घराण्यात यहुदियांच्या बेथलेहेम (बेथलीएम) या त्यांच्या जन्मगावी मरिया यांसह जावे लागले. त्या वेळी गर्भवती मरिया यांचे दिवस पूर्ण भरले होते. उतारशाळेत जागा नसल्यामुळे त्यांना गुरांच्या गोठ्यात आश्रय घ्यावा लागला. तेथे मरिया यांनी आपल्या बाळाला जन्म दिला. त्यांनी त्याला बाळंत्यांनी गुंडाळून गव्हाणीत ठेवले. रानात मेंढरे राखणाऱ्या मेंढपाळांपुढे देवदूत प्रकट झाले. जगात तारणारा जन्माला आल्याची आनंदवार्ता त्यांनी मेंढपाळांना दिली. मेंढपाळ आपले कळप सोडून येशूबाळाच्या दर्शनासाठी गेले. हे सर्व काही संदेष्ट्यांनी येशू ख्रिस्त यांच्या जन्माविषयी केलेल्या भाकिताप्रमाणे घडून आले. “पहा, कुमारी गर्भवती होऊन पूत्र प्रसवेल व त्याचे नाव ‘इम्मानूएल’ (आम्हांमध्ये देव) असे ठेवतील” (बायबल, यशया ७ : १४).
जन्मकथेस अनुसरून धर्मगुरू समायोचित प्रबोधन करतात. प्रार्थनाविधीनंतर ख्रिस्ती भाविक ‘हॅपी ख्रिस्मस’ किंवा ‘मेरी ख्रिस्मस’ म्हणत एकमेकांना शुभेच्छा देतात. चर्चच्या आवारात हर्षोत्सवाला व आनंदाला उधाण येते. जगभर नाताळरात्री मेजवाण्या, नृत्ये अशा स्वरूपात नाताळ साजरा केला जात असला, तरी आपल्याकडे मात्र भारतीय परंपरेनुसार काहीशा संयमित स्वरूपात नाताळ साजरा केला जातो. ख्रिस्मस सुमधुर गायने (खास नाताळसाठी रचलेली भक्तिगीते) गात गात लहान मुले व तरुण रात्री १२ पासून पहाटे ३-४ वाजेपर्यंत अनेकांच्या घरी जातात व शुभेच्छा व्यक्त करतात. नाताळप्रसंगी ही गीते म्हणण्याची प्रथा तेराव्या शतकात प्रथम इटलीत सुरू झाली. असिसीचे संत फ्रांन्सिस यांनी बालख्रिस्ताच्या सुयशस्तुतिपर गीते रचली. या प्रथेचे तेच जनक समजले जातात. त्यांनीच बालयेशूच्या संगोपनगृहाचे (क्रेश) दृश्य पहिल्यांदा तयार केले व त्याचा नंतर जगभर प्रसार झाला. २५ डिसेंबरला पहाटे कॅथलिक चर्चमध्ये ‘मिस्सा’ नावाचा उपासनाविधी मोठ्या प्रमाणावर होतो. प्रॉटेस्टंट चर्चमध्ये सकाळी साधारणपणे ८-९ च्या सुमारास उपासना असते. लूककृत शुभवर्तमानातील दुसऱ्या अध्यायात दिलेली ख्रिस्तजन्माची हकिकत किंवा इतर भाग यावेळी वाचून दाखवितात व त्यावर प्रबोधन होऊन मनन-चिंतन केले जाते व प्रभूभोजन विधी साजरा केला जातो.
नाताळ हा जसा एक सामाजिक सण आहे, तसाच तो कुटुंबाचाही सण आहे. या दिवशी लेकी-बाळी माहेरी येतात. गोड पंचपक्वान्ने, विविध प्रकारचे केक तयार केले जातात. शेजारी-पाजारी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देतात. नाताळ हा आनंदाचा सण. हा आनंद इतरांच्या जीवनात निर्माण करण्यासाठी एकमेकांना भेटकार्डे व भेटवस्तूही दिल्या जातात.
येशू ख्रिस्त यांचा जन्म गुरांच्या गोठ्यात झाला, त्याचे प्रतीक म्हणून घरोघर बाळगोपाळ त्या बेथलेहेमच्या गोठ्याची प्रतिकृती (Crib) बनवितात. त्यामध्ये जोसेफ, मरिया व येशूबाळाच्या प्रतिमा ठेवल्या जातात. संत फ्रान्सिस यांनी १२३३ मध्ये आपल्या असिसी या गावी सर्वप्रथम बेथलेहेमातील गोठ्याची प्रतिकृती तयार केली. तेव्हापासून ही प्रथा जगभर रूढ झाली.
बायबलमध्ये वर्णन केल्याप्रमाणे पूर्वेकडून तीन ज्ञानी पुरुष येशूबाळाच्या दर्शनासाठी आले. त्यांनी येशूबाळाला सोने, ऊद व गंधरस हे अर्पण केले. ‘सोने’ हे येशू ख्रिस्त यांच्या राजेपणाचे, ‘ऊद’ हे त्यांच्या दैवीपणाचे, तर ‘गंधरस’ हे त्यांनी मानवजातीच्या वेदना ज्या स्वत:कडे घेतल्या त्याचे प्रतीक मानले जाते. त्या तीन ज्ञानी पुरुषांना प्रवासात एका ताऱ्याने मार्ग दाखविला. त्याचे प्रतीक म्हणून या सोहळ्यात समाजात घरोघर आकाशकंदील लावण्याची प्रथा सुरू झाली.
नाताळच्या दिवसांत यूरोपात बर्फवृष्टी होते. हिवाळ्यातील पानझडीच्या या दिवसांत वृक्षांना पालवी नसते. मात्र पॉईनसेट्रीया (Poinsettia) हा पाईन कुळातील वृक्ष तेवढा हिरवागार असतो. त्याची पानेही ताऱ्यासारखी दिसतात. त्याचे प्रतीक म्हणून घरोघर नाताळ वृक्ष (Christmas Tree) सजविला जातो. त्याचप्रमाणे सांटा क्लॉज बाबा हे फारसा गाजावाजा न करता गोरगरिबांना गरजेच्या वस्तू पुरवित असे. त्यावरून रात्रीच्या वेळी हरणाच्या गाडीतून येणारे, मुलांना खाऊ वाटणारे, मुलांसाठी गुपचूप त्यांच्या पायमोज्यात भेटवस्तू ठेवणारे सांटा क्लॉज पुढे रूढ झाले. लांब पांढरी शुभ्र दाढी असलेले व नेहमी आनंदी असणारे, स्थूल शरीराचे, वृद्ध सांटा क्लॉज हे आशिया मायनरमधील संत निकोलस नावाचे बिशप होते. त्यांच्या सत्कृत्यांसाठी तसेच लहान मुले व अविवाहित मुली यांच्याविषयी त्यांना वाटणाऱ्या अपार प्रेमासाठी ते प्रसिद्ध आहेत.
नाताळनंतरच्या पहिल्या आठवाड्यातील पहिला दिवस ‘बॉक्सिंग डे’ म्हणून पाळण्याची प्रथा काही देशांत आहे. जे लोक वर्षभर आपल्या उपयोगी पडले, त्यांना या दिवशी काही भेटवस्तू ‘बॉक्स’मध्ये घालून देण्याची प्रथा आहे.
नाताळ सणातील या प्रथांना सध्या जगभर व्यापारी स्वरूप आले असले, तरी एखाद्या राजवाड्याऐवजी गुरांच्या गोठ्यात जन्म घेणारा देवपूत्र येशू ख्रिस्त आणि गावकुसाबाहेरच्या मेंढपाळांना त्यांच्या आगमनाची सर्वप्रथम दिली गेलेली शुभवार्ता, या नाताळच्या मूळ गाभ्याकडे या दिवशी श्रद्धावंत आपले लक्ष केंद्रित करतात.
संदर्भ :
- Glarier, Michael ; Helwiig, Monika, The Modern Catholic Encyclopedia, Bengaluru, 1994.
- Sheen, Fulton J., Life of Christ, Bangalore, 1958.
- दिब्रिटो, फादर फ्रान्सिस, ख्रिस्ती सण व उत्सव, वसई, १९९७.
- दिब्रिटो, फादर फ्रान्सिस, सुबोध बायबल, पुणे, २०१०.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया