भौतिकीतील या तत्त्वानुसार इलेक्ट्रॉनासारख्या एखाद्या सूक्ष्म कणाचा स्थिती–सहनिर्देशक (जागा निश्चित करणारा अंक) व संवेग (वस्तुमान × वेग)किंवा ऊर्जा आणि काल या दोन्ही राशींचे एका वेळेस केलेले मापन विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त अचूक करता येत नाही. सूत्ररूपात Δx· Δp ≥h किंवा ΔE· Δt ≥h असे मांडता येईल. येथे Δx, Δp, ΔE आणि Δt या अनुक्रमे स्थिति-सहनिर्देशक, संवेग, ऊर्जा व काल यांच्या मापनातील अनिश्चितता किंवा त्रुटी (चूक) असून हा h प्लांक स्थिरांक आहे (h= 6.62607004 × 10-34 m2 kg / s). यावरून असे दिसून येते की, वरील जोड्यांपैकी एका राशीतील त्रुटी कमी करू गेल्यास आपोआपच दुसऱ्या राशीतील त्रुटी वाढते. या तत्त्वाचा प्रत्यय सूक्ष्म कणांच्या बाबतीतच येतो. हे तत्त्व हायझेनबेर्क यांनी १९२७ मध्ये मांडले. पुंजयामिकी मधील हे एक मूलभूत तत्त्व आहे.
समीक्षक : माधव राजवाडे