इलेक्ट्रॉनिकी टपाल (e-mail). इलेक्ट्रॉनिक मेल याचे संक्षिप्त रूप ई-मेल. पत्र पाठविण्याचे ई-मेल आधुनिक माध्यम आहे. ई-मेल एका प्रकारची अंकीय (Digital) संदेशांची देवाण-घेवाण आहे. ई-मेल प्रणाली संगणक वापरकर्त्यास साधा मजकूर, ग्राफिक्स (Graphics),ऑडियो (Audio) आणि ॲनिमेटेड प्रतिमा (Animated images) दुसऱ्या वापरकर्त्यास पाठविण्यास मदत करतात.

घरापासून ते सरकारी कार्यालयात याचा वापर केला जातो. कार्यालये, न्यायालये, शाळा-महाविद्यालयातील ई-मेलवर माहिती पाठविण्याचे आणि प्राप्त करण्याचा अधिकृत मार्ग तयार करण्यात आला आहे. हे कागदावर लिहिलेल्या पत्रासारखेच आहे, परंतु पेपरमधील अक्षर पत्र आणि ई-मेल मध्ये खूप फरक आहे. पत्र कागदावर लिहिले जाते आणि ई-मेल संगणकाचा वापर करून लिहिला जातो. ई-मेल संगणक नेटवर्कमध्ये प्रकाश गतीने प्रवास करतो आणि हजारो किलोमीटर दूर बसलेल्या कोणत्याही व्यक्तीस ताबडतोब इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवू शकतो. ई-मेल हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे. सध्याच्या बहुतांश ई-मेल यंत्रणा इंटरनेटचा (Internet) वापर करतात. आजचे आधुनिक ई-मेल हे साठवणे (Store) आणि पुढे अग्रेषित करणे (फॉरवर्ड; Forward) या धर्तीवर बनवले गेलेले आहे. ई-मेल सर्व्हर संदेश प्राप्त करतात, संदेश पाठवतात आणि संदेश साठवून सुद्धा ठेवू शकतात. त्यासाठी आता संदेश पाठवणारे, वाचणारे आणि हे ऑनलाइन असण्याची गरज नाही. ते थोड्या काळासाठी एकमेकांबरोबर जोडले गेले, तरी संदेश पाठवता येतो. हा थोडा काल एक संदेश पाठवण्यास लागणाऱ्या वेळेपर्यंत सीमित असतो.

ई-मेल सेवेचा इतिहास : १९८० च्या दशकात रेमंड सॅम्युएल टॉमलिनसन (Raymond Samuel Tomlinson) यांनी बीबीएन टेक्नॉलॉजी (BBN Technologies) या कंपनीत अर्पानेट (ARPANET) विकसित करून ई-मेल सेवा कार्यान्वित केली. १९७० मध्ये पाठवले गेलेले ई-मेल आणि आजचे फक्त शब्दबद्ध मजकूर असलेले ई-मेल यांमध्ये कमालीचे साम्य आहे.

संगणकीय जाळ्यांचा मदतीने पाठवलेला ई-मेल प्रथमत: अर्पानेटवर फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल (FTP) च्या प्रणालीनुसार पाठवला गेला. सन १९८२ पासून ई-मेल पाठवण्यासाठी सिम्पल मेल ट्रान्स्फर प्रोटोकॉलचा (SMTP) वापर होतो.

ई-मेल खाते व त्याचे स्वरूप : आपण इंटरनेटवर ई-मेल खाते सहजपणे तयार करू शकतो. ई-मेल खाते तयार झाल्यानंतर, आपल्याला एक ई-मेल पत्ता प्राप्त होतो, ज्याचा वापर अनेक ठिकाणी केला जाऊ शकतो. दोन प्रकारची ई-मेल सेवा अस्तित्वात आहे, विनामूल्य आणि दुसरे सशुल्क (सशुल्क – खरेदी केलेले) आहेत. आपण सशुल्क ई-मेल सेवा खरेदी करता तेव्हा आपल्याला बरेच अधिकच्या सुविधा मिळतात. ई-मेल सेवा प्रदान करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, जसे की जीमेल (Gmail) – सध्या संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त वापरली जाते. जीमेल (Gmail) व्यतिरिक्त, हॉटमेल (Hotmail), रेडिफमेल (rediffmail), याहू मेल (yahoo mail) देखील ई-मेल सेवा प्रदान करतात.

ई-मेल संदेशाचे दोन भाग असतात. पहिल्या भागत शीर्षलेख (हेडर; Header) म्हणजेच ठळकपणे लिहिलेले संदेशाचा विषय, पाठवणाऱ्याचा ई-मेल आणि संदेश ज्याला पाठवला आहे त्याचा ई-मेल हे सगळे असते. ज्यांना पाठवावयाचे आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर जणांना ई-मेल अग्रेषित करावयाचे असल्यास सीसी (CC) आणि बीसीसी (BCC) ची सुविधा देण्यात आली आहे. बीसीसी म्हणजे “ब्लाईंड कार्बन कॉपी; Blind Carbon Copy” आणि सीसी म्हणजे “कार्बन कॉपी; Carbon Copy”. बीसीसी हा ई-मेलच्या प्रती इतर लोकांना पाठविण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा सीसी वापरला जातो तेव्हा आपण प्राप्तकर्त्यांची यादी पाहू शकता, परंतु बीसीसीमध्ये प्राप्तकर्त्यांची यादी पाहू शकत नाही, हा या दोघांमधील फरक आहे.

दुसरा भाग म्हणजे संदेशाचा मुख्यभाग (मेसेज बॉडी; Message Body) ह्यामध्ये संदेश लिहिलेला असतो.

प्राथमिक स्वरूपात असताना फक्त लिहिलेले संदर्भ (टेक्स्ट; Text) पाठवता येणारा ई-मेल आधुनिक काळात जास्त विकसित होऊन मल्टिमीडिया अ‍ॅटॅचमेन्ट्‌स (Multimedia attachments) म्हणजेच छोट्या आकाराचा मल्टिमीडिया फाईल पाठवण्याइतपत सक्षम बनला. ह्या पद्धतीला मल्टिपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन्स (MIME) असे म्हणतात.

ई-मेल “ॲट द रेट” @ या चिन्हाचा वापर करून इष्ठस्थळी पाठविण्यात येतो.

ई-मेल सेवेचे फायदे : ​ई-मेल सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे, वापरण्यास अतिशय सोपे आहे आणि आपण आपल्या इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज जसे की फोटो, चिन्ह, आधार कार्ड, मतदार कार्ड आणि संदेश चांगल्या प्रकारे ठेवू शकता. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो आणि खूप काळजी करण्याची गरज नसते.

कळीचे शब्द : #मल्टिपर्पज #इंटरनेट #सीसी #CC #बीसीसी #अर्पानेट

संदर्भ :

समीक्षक : अक्षय क्षीरसागर