सतराव्या शतकातील इंग्लिश विचारवंतांचा एक गट. ह्यांचे कार्य मुख्यतः धर्मशास्त्र, नीतिशास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्या क्षेत्रांत आहे. बुद्धी आणि श्रद्धा, विज्ञान व धर्म ह्यांत मानल्या जाणाऱ्या द्वंद्वाचे आणि विरोधाचे निराकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ईश्वर आणि मानवी आत्मा ह्यांचे स्वरूप, परस्पर संबंध ह्यांविषयीचे काही सिद्धांत म्हणजे ख्रिस्ती धर्म नव्हे; ख्रिस्ती धर्म हा जीवनाचा एक मार्ग आहे, ईश्वराने ज्या विवेकाधिष्ठित तत्त्वांनुसार विश्वाची व्यवस्था लावली आहे, त्यांचे आकलन करून त्यानुसार जीवन जगणे हे ह्या जीवनमार्गाचे सार आहे, असा ख्रिस्ती धर्माचा उदार, बुद्धिवादी, नीतिप्रधान अर्थ त्यांनी लावला; धार्मिक सिद्धांतांबाबत आढळणाऱ्या मतभेदांविषयी सहिष्णुता बाळगावी, असे प्रतिपादन केले आणि सैद्धांतिक कडवेपणाला विरोध केला.
बेंजामिन व्हिचकट (१६०९–८३) हा एक प्रभावी शिक्षक त्यांचा अर्ध्वयू होता. त्याने स्वतः काहीच लिखाण प्रसिद्ध केलेले नसले, तरी त्याची बुद्धिनिष्ठा, धार्मिक असहिष्णुतेला असलेला त्याचा विरोध आणि प्लेटोवरील त्याची भक्ती ह्यांचा त्याच्या अनुयायांवर पगडा बसला. केंब्रिज प्लेटॉनिस्टांपैकी राल्फ कडवर्थ (१६१७–८८) आणि हेन्री मोर (१६१४–८७) ह्या दोघांनी विपुल लेखन करून ह्या विचारसरणीचे पद्धतशीर प्रतिपादन केले आहे. पीटर स्टेरी, जॉन स्मिथ, जॉर्ज रस्ट, जॉन वर्दिंग्टन, सायमन पॅट्रिक आणि ॲने कॉन्वे (१६३०–७९) ह्यांनीही ह्या मतप्रणालीचे मंडन आणि प्रसार करायला हातभार लावला आहे. हे सर्व केंब्रिज विद्यापीठाशी संबंधित होते. ऑक्सफर्ड येथे जोसेफ ग्लॅन्व्हिल आणि जॉन नॉरिस ह्यांच्यावर ह्या विचारसरणीचा बराच प्रभाव पडला होता.
धर्मशास्त्रात केंब्रिज प्लेटॉनिस्टांनी प्रामुख्याने जॉन कॅल्व्हिनच्या पंथाला विरोध केला. ह्या पंथाच्या सिद्धांताप्रमाणे ईश्वराची सार्वभौम इच्छा अनियंत्रित, स्वैर (आर्बिट्ररी) असते, पण तिला सर्वस्वी शरण जाण्यात नीती असते आणि धार्मिक श्रद्धेची कसोटीही लागते. उलट केंब्रिज प्लेटॉनिस्टांची भूमिक अशी की, ईश्वराने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात माणसाचे कल्याण असते हे खरे, पण हे नियम ईश्वराने घालून दिलेले असतात म्हणून त्यांचे पालन करणे योग्य असते असे नसून ईश्वर विवेकी आहे, विवेकावर आधारलेल्या तत्त्वांना अनुसरून ईश्वराने नियम घालून दिलेले असतात, यामुळे त्यांचे पालन करण्यात माणसाचे कल्याण असते, म्हणून त्यांचे पालन करावे. ह्याच, नीती विवेकावर आधारलेली असते ह्या भूमिकेवरून त्यांनी हॉब्ज (१५८८–१६७९) यालाही विरोध केला. कारण हॉब्जने ईश्वराच्या जागी ऐहिक सार्वभौम सत्तेची स्थापना केली होती व ह्या सत्तेने दिलेल्या स्वच्छंदी आदेशांचे पालन करण्यात नीती असते, असे प्रतिपादन केले होते. ‘प्लेटॉनिस्ट’ असे जरी त्यांचे नाव होते, तरी प्लेटोच्या विवक्षित सिद्धांतांचा त्यांनी स्वीकार केला होता असे आढळत नाही. आत्म्याची समधातता, ऐहिक गोष्टींविषयी पराङ्मुखता, सत्यावरील निष्ठा, न्याय व सचोटी ह्यांविषयी आस्था हेच त्यांच्या दृष्टीने प्लेटोच्या शिकवणीचे सार आल्यासारखे दिसते. प्लेटोच्या सिद्धांतांचा अर्थ त्यांनी नवप्लेटोमताच्या दृष्टिकोनातून लावला. अनुभववादी विचारसरणीला त्यांनी विरोध केला आणि ह्यासाठी जन्मजात ज्ञानाचे महत्त्व प्रतिपादन करणाऱ्या देकार्त (१५९६–१६५०) याच्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी पुरस्कार केला. पण भौतिक सृष्टीतील सर्व घटनांचे केवळ यांत्रिक नियमांच्या साहाय्याने स्पष्टीकरण करावे, ह्या देकार्ताने स्वीकारलेल्या भूमिकेला त्यांनी विरोध केला आणि नैसर्गिक घटना व प्रक्रिया सहेतुक असतात, ह्या मताचे समर्थन केले.
मुळात केंब्रिज प्लेटॉनिस्टांचा प्रयत्न कालसुसंगत तत्त्वज्ञान साकारण्याचा आहे. प्राचीन तत्त्वज्ञानाचा अन्वयार्थ नव्या संदर्भात कसा कालोचित आहे, हे दर्शविण्याचा आहे. श्रद्धा व तर्क यांची सांगड घालत, धर्मसंस्थेचा व नीतीचा विचार तत्त्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर करणारे नि वैज्ञानिक प्रगतीची दखल घेणारे आणि मुख्य म्हणजे इंग्रजीतून विचार व्यक्त करणारे केंब्रिज प्लेटॉनिस्ट्स सतराव्या शतकात अग्रस्थानी होते. लॉक-लायप्निट्ससारख्या नामवंत तत्त्वज्ञांची वाट त्यामुळे सुकर झाली.
संदर्भ :
- Cassirer, Ernst; Trans. The Platonic Renaissance in England, Edinburgh, 1953.
- Cragg, G. R. Ed. The Cambridge Platonists, New York, 1968.
- Levitin, Dmitri, Ancient Wisdom in the Age of the New Science, Cambridge, 2015.
- Nadler, Steven, Ed. A Companion to Early Modern Philosophy, Oxford, 2002.
- Patrides, C. A. The Cambridge Platonists, Cambridge, 1980.
- Rogers, G. A.; Vienne, J.-M.; Zarka, Y. C. Eds. The Cambridge Platonists in Philosophical Context : Politics, Metaphysics and Religion, Dordrecht, 1997.
- Tulloch, Jhon, Rational Theology and Christian Philosophy in England in the Seventeenth Century, 2 Vols., London, 1872.
समीक्षक − शर्मिला वीरकर