जोड, सिरिल एडविन मिटि्‌चन्सन : ( १२ ऑगस्ट १८९१ — ९ एप्रिल १९५३ ). ब्रिटिश तत्त्वज्ञ. त्यांचा जन्म एडविन व मेरी जोड या दांपत्यापोटी इंग्लंडमधील दऱ्हॅम येथे झाला. ऑक्सफर्ड प्रिपरेटरी स्कूल व ब्लंडेल्स स्कूल येथून शालेय शिक्षण प्राप्त करून ते उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड येथील बॅलिअल महाविद्यालयात दाखल झाले. जॉन लॉकच्या नावाची शिष्यवृत्ती संपादन करून क्रीडा, वाद-परिसंवाद अशा विविध क्षेत्रांत ते आघाडीवर होते. त्यांच्यावर एच. जी. वेल्स, जॉर्ज बर्नार्ड शॉ व बर्ट्रंड रसेल यांचा प्रभाव विशेषत्वाने होता.

१९१४ मध्ये जोड प्रशासकीय सेवेत रुजू झाले, ते समाजवादी आदर्श घेऊन; पण त्याचवेळी पहिल्या महायुद्धास तोंड फुटले. तरी सेवेतील जबाबदाऱ्या पार पाडत तेथून सोळा वर्षांनी ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर लंडन विद्यापीठातील बर्कबेक महाविद्यालयात १९३० मध्ये ते तत्त्वज्ञान व मानसशास्त्र विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. जॉर्ज बर्नार्ड शॉसमवेत त्यांचे फेबिअन सोसायटीशी घनिष्ठ नाते होते; मात्र उन्हाळी अभ्यासवर्गातील त्यांनी केलेल्या लैंगिक गैरवर्तनामुळे त्यांना सोसायटीने बडतर्फ केले व मग पुन्हा घेतले.

जोड यांची ओळख केवळ विद्यापीठीय वर्तुळापुरती सीमित न राहता सर्वसामान्यांस झाली ती त्यांच्या तात्त्विक विवेचनांमुळे. १९४१‒६७ दरम्यान बी.बी.सी.च्या ‘ब्रेन्स ट्रस्ट’ कार्यक्रमातील त्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होय. इतर तत्त्वज्ञांचे विचार सुलभ रीतीने विशद करून मांडण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांची स्वतःची भूमिका सातत्याने अज्ञेयवादी व शांततावादी होती. शॉ, रसेलप्रमाणे महायुद्धांदरम्यान घेतलेल्या ह्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त होते. घटस्फोटप्रक्रिया सुलभीकरण, गर्भप्रतिबंधक साधनांस व गर्भपातास कायदेशीर मान्यता, निःशस्त्रीकरण अशा अत्याधुनिक विचारांचा त्यांनी आग्रह धरला.

प्रसिद्धीवलयात असलेले जोड वॉटर्लू ते एक्सटर असा रेल्वेप्रवास करूनही भाडे न दिल्याने उद्भवलेल्या प्रकरणामुळे लौकिक गमावून बसले. बी.बी.सी.ने त्यांस बडतर्फ केले.

१९१५ साली मेरी व्हाइटशी झालेल्या विवाहातून त्यांना एक मुलगा व दोन मुली झाल्या; परंतु १९२१ साली हे विवाहबंधन तुटल्यावर त्यांचा स्त्रीवादावरील विश्वास उडाला; स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन संपूर्णतः बदलला. त्यानंतर त्यांनी ओस्वाल्ड मॉस्ली यांच्या प्रभावामुळे ‘न्यू पार्टी’ या राजकीय पक्षात प्रवेश केला. १९४६ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. नंतर पक्षातील फॅसिस्ट विचार न पटल्याने ते बाहेर पडले. १९४८ नंतर ते अंथरुणास खिळले व कर्करोगाने त्यांचे लंडनला निधन झाले. तत्पूर्वी आपल्या अज्ञेयवादी भूमिकेऐवजी त्यांनी ख्रिस्ती धर्मश्रद्धेचा पुनर्विचार केला व आपली मते द रिकव्हरी ऑफ बिलिफ (१९५२) या ग्रंथात मांडली.

पाश्चात्त्य समाजातील समस्यांवरील उतारा म्हणून जोड पौर्वात्य तत्त्वज्ञानाकडे पाहात. सर्वपल्ली राधाकृष्णनांची व्याख्याने ऐकून ते प्रभावित झाले व त्यांचे काउंटर अटॅक फ्रॉम द ईस्ट (१९३३) प्रसिद्ध झाले. गिरिजा मुखर्जींच्या साहाय्याने त्यांनी इंडियन सिव्हिलायझेशन  लिहिले. मुल्कराज आनंद व त्यांचे विद्यार्थी निखिल सेनसह अन्य विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेतून गांधीप्रेमी जोड यांना भारत जसा दिसला, तसा त्यांनी शब्दबद्ध केला. आर्यन पाथ, स्पेक्टॅटर अशा कित्येक नियतकालिकांतून त्यांनी नियमित व विपुल लेखन केले.

शिकणे हे मुळात फक्त स्वतःसाठी असते, हे त्यांना मान्य नव्हते आणि समजा जरी स्वतःसाठी शिकणे शक्य असले, तरी ते योग्य नव्हे, असे मत असल्याने त्यांनी तत्त्वप्रसाराचे अजोड कार्य केले.

संदर्भ :

                                                                                                                                                                            समीक्षक : लता छत्रे