जाधव, लक्ष्मण सिद्राम : (१६ जुलै १९४५ – ०५ जून २०१९). ल.सि. जाधव. मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक. वयाच्या पासष्ठाव्या वर्षी लेखनास सुरुवात करून अल्पावधितच मराठी साहित्यात आपली स्वतंत्र लेखनमुद्रा दर्जांकित करणारे एक महत्त्वाचे कवी, कथाकार, कादंबरीकार, ललित लेखक. त्यांचा जन्म सोलापूरमधील मातंग वस्तीमध्ये झाला. पिढीजात मिळालेले दु:ख,दारिद्रय, उपासमार सहन करत त्यांनी शिक्षण घेतले. दयानंद कॉलेजमधून बी.कॉम. झाल्यांनतर भारतीय स्टेट बँकेत नोकरी केली.

दरम्यान लसिंना ख्यातनाम लेखक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा सहवास लाभला. लसिंचे हस्ताक्षर सुंदर असल्यामुळे सरदेशमुखांनी त्यांना आपले लेखनिक म्हणून लेखन साहाय्य केले. ल. सि. जाधव यांचे होरपळ हे पहिले पुस्तक २०११ मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर अल्पावधीतच त्यांची पुढीलप्रमाणे विपुल साहित्य संपदा प्रकाशित झाली आहे. आत्मचरित्रपर : सुंभ आणि पीळ (२०१४), सूळकाटा (२०१८); कादंबरी : पराभूत धर्म (२०१३), सं गच्छ्ध्वम् (२०१४) मावळतीची उन्हे (२०१५), अडगळ (२०१८), धर्मवेध (२०१९); कविता :केतकीची फुले (२०१५), परतीचे पक्षी (२०१५), पाथेय (२०१६), गुदमरते शालीन जगणे (२०१७), प्रकाशाच्या वळचणीत (२०१८) ; बालसाहित्य : तुमचा खेळ होतो पण (२०१५), शूर जवान (२०१६), शूरवीर लहानू (२०१६), या तीन कुमार कादंबऱ्या, भारत माझा देश आहे (२०१५) ; ललितलेखन : अश्रुंचे गोंदण (२०१८) इत्यादी.

होरपळ ते त्यांचे आत्मकथन आहे. मातंग वस्तीमध्ये घालवलेले बालपण ते बँकेत नोकरी मिळेपर्यंतचे जीवनानुभव त्यांनी होरपळमध्ये चितारलेले आहेत. ज्येष्ठ समीक्षक गो. मा. पवार यांनी होरपळची पाठराखण करताना त्यातील व्यापक जीवनदृष्टी, सामाजिकतेची प्रगल्भ समज, प्रसंग वा भावस्थितीचे प्रत्यंकारी चित्रण करण्याचं सामर्थ्य, प्रसादपूर्वक ओघवती भाषाशैली या साऱ्या गुणांमुळे हे आत्मकथन  दलितच नव्हे तर एकंदरीत मराठी आत्मकथनात मोलाची भर घालणारे आहे असा अभिप्राय दिला आहे. या सर्व वाङ्मयीन वैशिष्ट्यांचा प्रत्यय होरपळ वाचताना येतो. मराठीबरोबरच हिंदी, कोकणी, कन्नड, इंग्रजी भाषांमध्ये या आत्मकथनाची भाषांतरे झाली.

होरपळनंतर लसिंची सुंभ आणि पीळ, सूळकाटा ही पुस्तके आत्मचरित्रपर कादंबरीस्वरूपातील आहेत. बालपण, तारुण्य आणि वृध्दावस्था या तीन टप्प्यावरील लसिंचे आयुष्य् यामध्ये आलेले आहे. सुंभ आणि पीळ या कादंबरीमध्ये मातंग समाजाच्या व्यथा, वेदना आलेल्या आहेत. मातंगांच्या चालीरिती, त्यांचे व्यवसाय, जगण्यातील अगतिकता, अपरिहार्यता, अस्पृश्यतेचे जीवघेणे जगणे, अंधश्रध्दा, रूढी, परंपरा आणि विशेषत: मातंगांची समाजबोली त्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे ही कादंबरी मातंग समाजाचा दस्तऐवज ठरते. सूळकाटा ही लसिंची भावस्पर्शी आत्मकथनपर कादंबरी आहे. मुलाच्या अकाली निधनाने व्यथित झालेल्या वृध्द् मनाचे भावनात्मक चित्रण लसि येथे करतात. होरपळ ते सूळकाटा हे त्यांचे लसिंचे लेखन महत्त्वाचे असून त्यातून त्यांचा जीवनपट आलेला आहे.

पराभूत धर्म , सं गच्छ्ध्वम् , मावळतीची उन्हे , अडगळ , धर्मवेध  या त्यांच्या  कादंबऱ्या महत्त्वपूर्णआहेत. धर्म हा मानवी जीवनासाठी आवश्यक असलेली व्यवस्था असली तरी धर्माच्या आडून लोकमनाचे होणारे शोषण, त्यासाठी निर्माण केलेल्या रूढी, परंपरा, अंधश्रध्दा, कर्मकांड यामुळे नैतिक मूल्यांची घसरण होते. धर्मांधता ही धर्माचे मूळच नष्ट करते हा आशय पराभूत धर्म या कादंबरीत मांडलेला आहे. याच कादंबरीची दुसरी आवृत्ती त्यांनी धर्मवेध नावाने प्रकाशित केली. अडगळ  या कादंबरीमध्ये परिपक्व् दलित लेखकाच्या तरल भावना आणि मनातील कोमल आंदोलने आलेली आहेत. मावळतीची उन्हे  ही कादंबरी तीन उच्चशिक्षित वयस्क व्यक्तींच्या जीवनाचे मनोवेधक चित्रण करणारी आहे. त्यांची कौटुंबिक दु:खे, म्हातारपणातील एकाकीपणा, हतबलता, उदासीनता यांची प्रभावी मांडणी लसि येथे करतात. सं गच्छ्ध्वम्  ही कादंबरी दलित चळवळीत प्रामाणिकपणे कार्य केलेल्या भिकाभाऊ साळवे या कार्यकर्त्याचे जीवनदर्शन घडविणारी आहे. आंबेडकरी विचाराने भारलेले भिकाभाऊ समाजसेवक आहेत. सामाजिक प्रश्नांविषयी त्यांच्या मनात प्रचंड तळमळ असून त्यासाठी ते अहोरात्र धडपडत असतात. अनेक अडचणींवर मात करत ते समाजकार्य करतात. या कादंबरीचे वेगळेपण म्हणजे लसिंनी चळवळीवर परखड भाष्य केलेले आहे. एकूणच लसिंच्या वरील सर्व कादंबऱ्या सामाजिक प्रश्नांचा वेध घेतात. त्यातून त्यांची चिंतनशील भूमिका लक्षात येते.

ल.सि. जाधव हे एक संवेदनशील कवी होते. आपल्या आजुबाजूच्या माणसांविषयी, परिस्थिती, समाज, संस्कृती, निसर्ग यांच्याविषयीच्या संवेदना या सर्व कवितासंग्रहातून आविष्कृत झालेल्या आहेत. विशेषत: बालमनापासून ते वृध्दांपर्यंतच्या मानवी भावनांचे दर्शन या सर्व संग्रहातील कवितांमध्ये आलेले आहे. लसिंच्या एकूण साहित्यात त्यांनी लिहिलेले बालसाहित्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये तुमचा खेळ होतो पण, शूर जवान, शूरवीर लहानू, या तीन कुमार कादंबऱ्या, भारत माझा देश आहे  या संकीर्ण पुस्तकाचा समावेश होतो. लसि जेवढे गंभीर विषयावर लेखन करतात. तेवढयाच ताकतीने लहान मुलांच्या भावजीवनावर हळूवार भाष्यही करतात. रोचक, रंजक, मात्र संस्कारशील असे त्यांचे कुमार साहित्य आहे. अश्रुंचे गोंदण  हा लसिंचा एकमेव ललित लेखसंग्रह आहे. त्यामधून जीवनसन्मुख अनुभवविश्व लालित्यपूर्ण भाषेमध्ये त्यांनी शब्दबध्द केलेले आहेत. प्रिय श्रीनंद  हे त्यांचे अखेरचे पुस्तक असून ते अप्रकाशित आहे. त्यामध्ये लसिंनी आपल्या अकाली निधन पावलेल्या मुलाशी संवाद साधलेला आहे.

ल. सि. जाधव यांचे वरील सर्व लेखन मराठी साहित्यात भर घालणारे असून ते अल्पकाळातच वाचकप्रिय झाले. कारण त्यात परिपक्क्व जीवनानुभवांची मांडणी आलेली होती. लसि अत्यंत संयतपणे लेखन करत होते. त्यामध्ये कुठेही अक्राळस्तेपणा नव्हता.. लसिंना त्यामुळे अनेक मानसन्मान मिळाले. त्यांच्या होरपळ  या आत्मकथनाला महाराष्ट्र शासनाचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार मिळाला (२०१२). महाराष्ट्र साहित्य् परिषद, पुणे, निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान, सोलापूर आणि मनोरमा साहित्य् सभा, सोलापूर या साहित्य् संस्थांच्या वतीने देण्यात येणारे साहित्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

सोलापूर येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • जोशी, रजनीश, उत्तरायणातील साहित्यसेवा, दै. सकाळ, दि. ८ जून २०१९.
  • व्यक्तिवेध – ल.सि.जाधव, लोकसत्ता दि. १८ जून २०१९.