पानतावणे, गंगाधर : (२८ जून १९३७ – २७ मार्च २०१८).गंगाधर विठोबाजी पानतावणे. ज्येष्ठ विचारवंत, संशोधक, समीक्षक, दलित साहित्य चळवळीचे भाष्यकार, पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,अस्मितादर्शकार म्हणून सर्वपरिचित. त्यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण नागपूर येथील डी.सी.मिशन स्कूलमधून अत्यंत हालाखीत घेतले. १९५६ रोजी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९४६ व १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूरला आल्यानंतर त्यांना पाहण्याची व त्यांचे विचार ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. पुढे ते १९६२ मध्ये औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले.
१९८७ मध्ये त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता या विषयावर पीएच.डी प्राप्त झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मराठी विषयाचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून ते १९९७ मध्ये निवृत्त झाले. अभ्यासू व चिंतनशील प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. दलित चळवळीत त्यांचा प्रमुख सहभाग होता. पिपल्स् एज्युकेशन सोसायटीचे ते सदस्य् होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी अस्मितादर्श हे त्रेमासिक १९६७ मध्ये सुरू केले. नवोदित दलित लेखकांना हक्काचे विचारपीठ मिळाल्यामुळे लवकरच दलित चळवळ व साहित्याचे ते मुखपत्र बनले. अत्यंत निष्ठेने त्यांनी अस्मितादर्शची जोपासना केली. याबरोबरच पानतावणे यांनी विपुल ग्रंथ लेखन केलेले आहे.
पानतावणे यांचे समग्र लेखन वैचारिक स्वरूपाचे असून त्यामध्ये परिवर्तनवादी विचारांची मांडणी पाहावयास मिळते. अलक्षित विषय, आशय, वस्तुनिष्ठ मांडणी, परखड भूमिका व विषयाची संशोधनात्मक मांडणी त्यांच्या लेखनाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. प्रारंभी त्यांनी कविता लिहिल्या. त्या तत्कालीन वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्या. मृत्यूशाळा (१९८२) हे त्यांनी लिहिलेले महत्त्वाचे नाटक आहे. पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९८७) हा त्यांचा संशोधन ग्रंथ असून त्यात प्रथमत: बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर प्रकाश टाकलेला आहे. मूकनायक ते प्रबुध्द् भारत या वृत्तपत्रांच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांनी केलेल्या क्रांतदर्शी विचारकार्याचा सम्यक आलेख या ग्रंथातून त्यांनी मांडलेला आहे. मूल्यवेध (१९७२) हा त्यांचा समीक्षा ग्रंथ आहे. दलित साहित्यांची मूल्यात्मक मांडणी या ग्रंथात येते. विद्रोहाचे पाणी पेटले आहे (१९७६) या ग्रंथात अमृत या मासिकातून लिहिलेले लेख आलेले आहेत. त्यातून ते दलित चळवळीचा संशोधकनात्मक पध्दतीने वेध घेतात. दलितांचे प्रबोधन (१९७८) हा त्यांचा वैचारिक ग्रंथ आहे. त्यातून फुले-शाहू-आंबेडकर या महामानवांच्या विचारांची प्रभावी मांडणी ते करतात. मूकनायक (१९७८) हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आहे. त्याचे स्वरूप वैचारिक असून बाबासाहेबांचा दलित मुक्तिलढा यातून त्यांनी दृग्गोचर केलेला आहे. वादळाचे वंशज (१९८७) या ग्रंथात गोपाळबाबा वलंगकर, किसन फागुजी बनसोड, शिवराम जानबा कांबळे या दलित समाजचिंतकांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंतच्या क्रांतिनायकांचा शोध घेतलेला आहे. प्रबोधनाच्या दिशा (१९८४) हा ग्रंथ त्यांच्या निवडक भाषणांचा संग्रह आहे. अत्यंत मूलगामी पध्दतीने समाजातील प्रश्नांचा वेध ते या ग्रंथाच्या माध्यमातून मांडतात. हलगी (१९९०) या ग्रंथात त्यांचे अस्मितादर्शमधील स्फूट लेख आलेले आहेत. चैत्य् (१९९१) हा संशोधन ग्रंथ असून परिवर्तनवादी विचारांची मांडणी यात त्यांनी केलेली आहे. दलित वैचारिक वाङ्मय (१९९५) हा ग्रंथ त्यांनी मुंबई विद्यापीठात दिलेले प्रदीर्घ भाषण असून त्यामधून वैचारिक साहित्याची संकल्पना व त्यांचे स्वरूप त्यांनी मांडलेले आहे. लेणी (१९९७) या ग्रंथातून आंबेडकरी विचारदर्शन घडविणाऱ्या कथांची सौंदर्यस्थळे मांडलेली आहेत. साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती (१९९९) हा समीक्षा ग्रंथ महत्त्वाची असून साहित्य प्रवाहांची मूलभूत चिकित्सा यात पाहावयास मिळते. साहित्य : शोध आणि संवाद (२००२) हा ग्रंथ समीक्षेचा आहे. स्मृतिशेष (२००२) या ग्रंथात अनंतात विलीन झालेल्या सोबत्यांच्या आठवणी त्यांनी शब्दबध्द केलेल्या आहेत. अर्थ आणि अन्वयार्थ (२००६) हा सुध्दा समीक्षा ग्रंथ असून त्यातून साहित्य सिध्दांतांची त्यांनी मांडणी केलेली आहे. आंबेडकरी जाणिवांची आत्मप्रत्ययी कविता (२०१०) या ग्रंथात विविध कवितासंग्रहांना लिहिलेल्या प्रस्तावना आलेल्या आहेत. बुध्दचिंतन (२०११) हा ग्रंथ तथागत बुध्दाच्या धम्मातील मूलभूत संकल्पना स्पष्ट करणारा आहे. परिक्रमा (२०११) या ग्रंथात विविध ठिकाणी केलेल्या प्रवासांची वर्णने त्यांनी मांडलेली आहेत. एकूणच वरील सर्व ग्रंथ हे डॉ. पानतावणे यांच्या मूल्यगर्भ चिंतनाचा दस्तऐवज आहे.
पानतावणे यांनी जसे स्वतंत्रपणे लेखन केले. तसेच काही ग्रंथ संपादित केलेले आहेत. त्यामध्ये धम्मचर्चा (१९६३), दलित कथा (१९८०), विचारयुगाचे प्रणेते : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९८१), दलित आत्मकथन (१९८५), महारांचा सांस्कृतिक इतिहास (१९८६), लोकरंग (१९८७), दलित साहित्य् : चर्चा आणि चिंतन (१९९४), लोकचळवळीचे प्रणेते :म. जोतीराव फुले (१९९६), स्त्री आत्मकथन (१९९०), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख (१९९७), डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन ग्रंथ, या सर्व संपादित ग्रंथामागे त्यांची विचारतुलात्मक दृष्टी पाहावयास मिळते. मराठी भाषा आणि साहित्याला नवी वैचारिक दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून ही संपादने मूलगामी ठरतात. याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या खंडांच्या संपादक मंडळात सदस्य म्हणून त्यांनी केलेले लेखन अतिशय महत्त्वाचे आहे.
पानतावाणे यांनी आपल्या आयुष्यात दलित साहित्याची भूमिका परखडपणे, जोरकसपणे मांडली. दलित साहित्य संकल्पनेला होणाऱ्या विरोधांचा तात्त्विक समाचार घेतला. त्यांनी विविध साहित्य संमेलनांमधून केलेली भाषणे याचा प्रत्यय देतात. या भाषणांचे संकलन महेंद्र गायकवाड यांनी विद्रोह, विज्ञान आणि विश्वात्मकता (२००८) या ग्रंथामध्ये केलेले आहे. विशेषत: २००९ मध्ये अमेरिका येथील सॅनहोजे येथे झालेल्या पहिल्या जागतिक मराठी साहित्य् संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी दलित साहित्याने विश्व साहित्याला दिलेले योगदान स्पष्ट केलेले आहे.
पानतावणे यांनी दलित चळवळ व साहित्याला अस्मितादर्शच्या रूपाने स्वतंत्र विचारपीठ मिळवून दिले. अस्मितादर्श मेळावे व संमेलनांनी महाराष्ट्रात वैचारिक प्रबोधन गतिमान ठेवले. दलित- ग्रामीण मराठी शब्दकोशाचे केलेले कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये लंडन येथील भारतरत्न् डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, अखिल भारतीय दलित साहित्य् अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार, फाय फाऊंडेशन पुरस्कार, आचार्य अत्रे समीक्षा पुरस्कार, मराठवाडा गौरव पुरस्कार, मसाप, पुणे यांचा डॉ. भालचंद्र फडके पुरस्कार, पद्मश्री दया पवार साहित्य पुरस्कार, राष्ट्रीय बंधुता पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ महाराष्ट् भूषण पुरस्कार, दमाणी पुरस्कार, वाई येथील के. रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार तसेच केंद्र शासनाच्या वतीने दिला जाणारा पद्मश्री पुरस्काराचा समावेश होतो. वयाच्या ८१ व्या वर्षी औरंगाबाद येथे त्यांचे दुःखद निधन झाले.
संदर्भ :
- जाधव, डॉ.मनोहर,कांबळे,ऋषिकेश (संपा),साहित्य, समाज आणि संस्कृती – डॉ. गंगाधर पानतावणे गौरवग्रंथ, सुविद्या प्रकाशन, पुणे २००६.
- विवेकी, डॉ.रमेश (संपा), प्रवर्तन-डॉ. गंगाधर पानतावणे गौरव ग्रंथ, अक्षरवेल पब्लिकेशन, लातूर,२०१६.
- कांबळे, डॉ.चिंतामण,शेंडे, डॉ.वसंत, गिमेकर, डॉ. परशुराम (संपा), निळे अनुबंध- अस्मितादर्शकार डॉ. गंगाधर पानतावणे अभिवादन ग्रंथ, संघर्ष प्रकाशन, नागपूर, २०१९.