तोरणे, हरी भाऊ : (१७ जुलै १८९२ – १७ जुलै १९६९). महाराष्ट्रातील प्रसिद्ध सत्यशोधक जलसाकार, भीमभूपाळीकार, परिवर्तनवादी लेखक. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्ती चळवळीत त्यांनी प्रत्यक्ष सक्रीय कार्य केलेले आहे. तोरणेमास्तर अथवा हरिभाऊ म्हणूनही त्यांना ओळखले जाते. जन्म सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस तालुक्यातील मेडद या छोट्याशा गावी झाला. वडील भाऊ तोरणे हे महार समाजातील माळकरी होते. त्यांनी हरीला शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. हरिभाऊंचे प्राथमिक शिक्षण मेडदलाच झाले. गावातील सत्यशोधक विचारांच्या सोनोपंत कुलकर्णी यांनी शिक्षणासाठी हरिभाऊंना मदत केली. सातवी व्हर्नाक्युलर पूर्ण केल्यांनतर हरिभाऊंनी पुणे येथे पुढील शिक्षण घेतले.

तेथे त्यांच्यावर सत्यशोधक चळवळीचा प्रभाव पडला. त्यांना शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. पंढरपूर येथे वास्तव्यास असताना त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीच्या आधारे अस्पृश्य समाजातील मुलांसाठी बोर्डिग काढले. शिक्षणाबरोबरच हरिभाऊंनी सामाजिक चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. विशेषत: १९२० नंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावान सहकारी म्हणून कार्य केले. कसबे तडवळे येथून बदली झाल्यानंतर ते सोलापूर येथे आले. येथे त्यांनी बाबासाहेबांच्या बोर्डिंगची जबाबदारी स्वीकारली. आमदार जिवाप्पा सुभाना ऐदाळे यांच्या बरोबरीने सामाजिक व राजकीय कार्यात सहभाग घेतला. हरिभाऊंना संस्कृत भाषा अवगत होती. त्या दोघांमध्ये असलेले ऋणानुबंध त्यांच्यातील पत्रव्यवहारावरून आपल्या लक्षात येतात. ही पत्रे हरिभाऊंचे चिंरजीव रमाकांत तोरणे यांनी बावडा (ता. इंदापूर) येथे असलेल्या हरी भाऊ तोरणे स्मारकात जतन करून ठेवलेली आहेत. १९४१ मध्ये हरिभाऊ सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते मेडद या गावी गेले. तेथेच त्यांनी पुढील आयुष्य व्यतीत केले.

हरी भाऊ तोरणे यांचे लेखन हे सत्यशोधकी साहित्यातील महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. त्यामध्ये जलसा, वैचारिक ग्रंथ, कविता, गीते, स्फूटलेखन यांचा समावेश होतो. श्रीचोखामेळा महाराजांची पंढरपुरावर स्वारी (१९२१) आणि चावडींतील बैठक (१९२३) हे त्यांचे गाजलेले जलसे आहेत. तत्कालीन काळातील धार्मिक व सामाजिक विषमतेवर या ग्रंथरूप जलशांच्या माध्यमातून त्यांनी प्रहार केला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या आयुष्यातील वेदोक्त प्रकरणाने सामाजिक चळवळीला नवा आयाम दिला. त्यावेळी त्यांच्या समर्थनार्थ व विरोधात अनेकांनी पुढाकार घेतला. पंढरपूर येथील दत्तात्रय बळवंत गंडाळे यांनी केदारनाथाची पंढरपूरवर स्वारी  हा ग्रंथ लिहून पुरोहित वर्गाची बाजू घेत महाराजांवर टिका केली. वास्तविक ही टिका एकांगी होती. त्याला धार्मिक अहंगंडाची बाजू होती. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी हरिभाऊंनी श्री चोखामेळा महाराजांची पंढरपुरावर स्वारी  हा ग्रंथ लिहिला. चावडींतील बैठक हा ग्रंथ सत्यशोधक ग्रंथमाला पुष्प पहिले अंतर्गत हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण यांनी प्रकाशित केलेला आहे. तोरणे यांनी यामध्ये नारायण पाटील, रामकृष्णपंत कुलकर्णी व दगड्या वेसकर या पात्रांच्या माध्यमातून वैचारिक संवाद घडवून आणलेला आहे. ही तीनही पात्रे तीन समाजाचे प्रतिनिधित्व करतात. महत्त्वाचे म्हणजे ब्राह्मणी व अब्राह्मणी अशा विचारांची इथे प्रकर्षाने मांडणी येते. जन्मजात श्रेष्ठत्वाचा जो सिध्दांत पुराणांचे संदर्भ देऊन मांडला जातो त्याला हरिभाऊंनी इथे सडेतोड उत्तर दिलेले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही ग्रंथांमुळे सत्यशोधक विचारांना चालना मिळाली. हे दोन्ही ग्रंथ सत्यशोधक परंपरेतील महत्त्वाचे दस्ताऐवज आहेत.

हरिभाऊंच्या समग्र साहित्यातील अलक्षित भाग म्हणजे त्यांनी लिहिलेली काठीचे सपाटे ही लेखमाला होय. दीनमित्र या सत्यशोधक पत्रकातून ‘वेसकर’ या टोपण नावाने हे लेख हरिभाऊंनी लिहिले आहेत. एकूण १७ लेखांपैकी १५ लेख दीनमित्र  तर २ लेख मूकनायक  पत्रकातून प्रकाशित झालेत. १९१८ ते १९२५ हा या लेखमालेचा कालखंड आहे. हे सर्व स्फूटलेख तत्कालीन कालखंडातील सामाजिक, धार्मिक, राजकीय घडामोडींच्या परखड नोंदी आहेत. तत्कालीन कालखंडात अस्पृश्यांवर होणारे अन्याय, अत्याचाराचे अनेक घटनाप्रसंगग या स्फूटलेखात येतात. यातून हरिभाऊंची प्रबोधनपर भूमिका उजागर होते.

हरिभाऊंनी गद्य लेखनाबरोबर काव्यलेखनही केलेले आहे. त्यामध्ये भीमभूपाळी, परस्थिती बिकट किती आमची, व्हा व्हा सावध उठा बंधुंनो, सोडा अभिमान समाजाचे होते नुकसान ही गीते लोकप्रिय आहेत. १९३३ मध्ये जनता  वृत्तपत्राने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मदिन विशेषांक काढला. त्यामध्ये हरिभाऊंनी ‘भीमभूपाळी’ हे आंबेडकरी गौरवकाव्य लिहिले. ‘प्रभावशाली राष्ट्रधुरंधर सखया भिमराया, प्रभातकाली प्रसन्न हृदये प्रणाम तव पाया’ या धृपदातून हरिभाऊंच्या काव्यशैलीचा प्रत्यय येतो. हरिभाऊ संस्कृतबोधी होते. या गीतामध्ये विविध रूपक, प्रतिमांच्या माध्यमातून त्यांनी बाबासाहेबांचे क्रांतिकारी व्यक्तित्व चितारलेले आहे. यामुळे हरिभाऊंना ‘भीमभूपाळीकार’ म्ह्‌णून ओळखले जाते. १९२० मध्ये सोलापूर येथे अस्पृश्य शिक्षक परिषदेत हरिभाऊंनी ‘परस्थिती बिकट किती आमची’ हे गीत तेथे सादर केले. ‘लक्षपटीने गाढव बरे, बाधा न स्पर्शाची, नीच मानलेल्या बंधुंनो चाड धरा याची, परिस्थिती बिकट किती आमची’ या ओळीतून हरिभाऊंची काव्यसंवेदना आविष्कृत होते. ‘व्हा व्हा सावध उठा बंधुंनो’ हे गीत याचे प्रतीक आहे. एन. टी. बनसोडे यांच्या माझा दामू झाला प्रधान  या आंबेडकरी जलशामध्ये हरिभाऊंचे हे गीत आलेले आहे. अज्ञान, अंधश्रध्दा, गुलामगिरी, विषमता यांना नाकारून सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे समाजभान ते येथे मांडतात. ‘असे रहावे कुठवर टाळा, विटाळ नरकाला, मुला मुलींना शिक्षण द्यावे, ऐका हरीच्या बोला’ या ओळीतून समाजप्रबोधनाचा विचार अभिव्यक्त होतो. ‘एकीबळे स्वातंत्र्य जिंका बेकीने राहू नका, जुन्या रूढी दूर लोटा होतो अपमान, सोडा अभिमान समाजाचे होते नुकसान’  ही हरिभाऊंची एक महत्त्वपूर्ण कविता आहे. यातूनही ते सामाजिक चिंतन मांडतात.

हरीभाऊ तोरणे हे फुले- शाहू- आंबेडकरी चळवळ व साहित्य विश्वातील एक महत्त्वाचे लेखक होते. त्यांनी आपल्या लेखनातून सामाजिक चिंतन, परखड विचार मांडणी व धारधार भाषाशैली आविष्कृत केलेली आहे. त्यामुळेच त्यांच्या लेखनाला सामाजिक मूल्य प्राप्त झालेले आहे. अशा या आंबेडकरी सत्यशोधकाचा मृत्यू जन्मदिनाच्या दिवशीच मेडद या गावी झाला.

संदर्भ :

  • रणपिसे,अप्पासाहेब,भीमक्रांती संग्रामातील गरणाळी तोफ हरी भाऊ तोरणे (लेख), सुगावा (मासिक), १९९०.
  • तुपेरे,सारीपुत्र, आंबेडकरी सत्यशोधक हरी भाऊ तोरणे, थिंक टँक पब्लिकेशन्स् ॲन्ड् डिस्ट्रीब्युशन, सोलापूर, २०१९.