न्यूझीलंडमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे, तर न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरील सर्वांत मोठे सरोवर. दक्षिण बेटाच्या नैर्ऋत्य भागात दक्षिणोत्तर पसरलेल्या या सरोवराची लांबी ६१ किमी., रुंदी १० किमी. आणि क्षेत्रफळ ३४४ चौ. किमी. आहे. हिमानी झीज कार्यातून निर्माण झालेल्या एका खोल दरीमध्ये या सरोवराची निर्मिती झालेली आहे. सरोवरातील पाण्याची पातळी सस.पासून २०९ मी. उंचीवर आहे. सरोवराची कमाल खोली २७६ मी. असून तळाकडील ६७ मी. पर्यंतचा भाग समुद्रसपाटीच्या खाली आहे.
पश्चिम किनाऱ्यावर सरोवराचे चार फाटे असून उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे वर्स्ली फाटा, नॉर्थ फ्योर्ड, मिडल फ्योर्ड आणि साउथ फ्योर्ड या नावांनी ओळखले जातात. क्लिंटन व इंग्लिटन या सरोवराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन प्रमुख नद्या आहेत. त्यांशिवाय वर्स्ली, ग्लेसनॉक, वॅपिटी, डून, मॅकेंझी बर्न, उपेकेरोआ या आणि इतर अनेक नद्या व प्रवाह या सरोवराला येऊन मिळतात. सरोवराच्या दक्षिण टोकाशी वायऊ ही नदी सरोवरातून बाहेर पडते. वायऊ नदी टी ॲनाऊ सरोवराच्या दक्षिणेस असलेल्या मनापौरी सरोवराला मिळते. या नदीद्वारे मनापौरी सरोवरातील पाण्याच्या पातळीचे नियंत्रण केले जाते. मनापौरी सरोवराच्या काठी असलेल्या मनापौरी गावाजवळ जलविद्युतनिर्मिती केंद्र आहे. सरोवरात अनेक बेटे असून त्यांपैकी मिडल फ्योर्डच्या मुखाशी अधिक बेटे आहेत. टी ॲनाऊ सरोवराच्या आग्नेय टोकाशी टी ॲनाऊ शहर आहे.
सरोवराचा पश्चिमेकडील भाग वनाच्छादित पर्वतीय प्रदेशाने वेढलेला असून पूर्व भाग सौम्य चढ उताराचा आणि कृषी क्षेत्राचा आहे. पर्यटन व मासेमारीच्या दृष्टीने हे सरोवर विशेष प्रसिद्ध आहे. संपूर्ण उन्हाळभर पर्यटक सरोवरात नौकाविहार, हौशी मासेमारी, जलतरण, कयाक विहार इत्यादींचा आनंद घेत असतात. माराकुरा शीडजहाज क्लब आणि टी ॲनाऊ नौकाविहार क्लब येथे आहेत. दरवर्षी कामगारदिनाच्या दरम्यान सरोवरात मासेमारी स्पर्धा होतात. सरोवराचा बहुतांश भाग पश्चिमेकडील फ्योर्डलँड राष्ट्रीय उद्यानात तसेच टी वाहिपौनामू जागतिक वारसा स्थळ (१९९०) परिसरात येतो. सरोवराच्या सभोवतालच्या प्रदेशात वैविध्यपूर्ण आणि समृद्ध वनस्पती व प्राणिजीवन आढळते. न्यूझीलंडमध्ये पायी मार्ग निरीक्षणाचे (ट्रॅकिंग) नऊ मार्ग विकसित करण्यात आले आहेत (१९९३). निसर्गसौंदर्याचे पायी फिरून निरीक्षण करण्यासाठीच्या या मार्गांना ग्रेट वॉक्स असे म्हणतात. देशातील या नऊपैकी रूटबर्न ट्रॅक, मिलफर्ड ट्रॅक व केप्लर ट्रॅक हे तीन लोकप्रिय ट्रॅकिंग मार्ग टी ॲनाऊ परिसरात आहेत. त्यामुळे या सरोवर परिसराला ‘वॉकिंग कॅपिटल ऑफ वर्ल्ड’ असे संबोधले जाते. पूर्वी टकाही या न उडणाऱ्या व रंगीबेरंगी पक्ष्यांचा येथे अधिवास असे. अठराव्या शतकाच्या अखेरीस त्यांचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे मानले जाई; परंतु १९४८ मध्ये टी ॲनाऊ सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावर एक टकाही पक्षी आढळला होता.
युरोपीयन समन्वेषक चार्ल्स नाइम आणि विल्यम स्टीफन यांनी १८५२ मध्ये या सरोवराचा शोध लावला. त्यानंतर १८६३ मध्ये या सरोवराचे सर्वेक्षण करण्यात आले. सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गुहा आढळतात. टी ॲनाऊ या माओरी भाषेतील संक्षिप्त शब्दाचा अर्थ ‘भोवऱ्याच्या पाण्यातील गुहा’ असा असून त्यावरूनच या सरोवराला टी ॲनाऊ हे नाव दिले गेले असावे.
समीक्षक : वसंत चौधरी