मासे घेतलेल्या कोळ्याचे चित्र, अक्रोतिरी, मिनोअन संस्कृती.

भित्तिलेपचित्रणाच्या प्रमुख पद्धतीतील एक पद्धती. हे मध्ययुगीन व आरंभिक प्रबोधनकाळातील चित्रणाचे माध्यम होते. शुष्क भित्तिलेपचित्रणात भिंत पूर्ण सुकल्यानंतरच चित्रण केले जाते. भिंतीवर लावलेला गिलावा संपूर्ण सुकल्यावर व योग्य तो पोत मिळाल्यावर त्यावर पारदर्शक वा अपारदर्शक जलरंगात चित्रण केले जाते. सेक्को पद्धती ही कायमच सार्द्र भित्तिलेपचित्रणापेक्षा दुय्यम दर्जाची म्हणून गणली जात असली, तरी चित्रणात नंतर सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरते. या पद्धतीत दोन प्रकार आहेत.

जिओव्हान्नी बातीस्ता टिपोलो याने काढलेले  विवाहसोहळ्याचे चित्र, बारावे शतक.

अ. पहिल्या पद्धतीमध्ये सुकलेल्या गिलाव्यावर रंग आसंजित वा एकरूप व्हावेत, म्हणून त्यांत दुग्ध प्रथिने (casein) वा वनस्पतींपासून काढलेला गोंद यांचा बंधक म्हणून वापर केला जातो. उदा., लिओनार्दो दा व्हींचीचे मिलान येथील द लास्ट सपर हे भित्तिचित्र. या चित्रात ‘अंडेमिश्रित चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’चा वापर केलेला असला, तरी काही तज्ज्ञांच्या मते हे चित्र शुष्क भित्तिलेपचित्रण या प्रकारातील आहे. पहिल्या दोन गिलाव्यांच्या स्तरांवर चित्रांत फिकट छटा यावी म्हणून लिओनार्दोने पांढऱ्या गंधकाचा लेप लावला. यामुळे त्याच्या या चित्रात शुष्कपणा निर्माण होऊन चित्र पूर्ण करण्यास जास्त अवधी मिळाला; परंतु त्याच्या या कृतीमुळे या चित्राचा हळूहळू ऱ्हास होऊ लागला. त्याचा टिकाऊपणा सार्द्र भित्तिचित्रणाच्या प्रमाणात कमी झाला आहे.

बऱ्याचदा या भित्तिलेपपद्धतीने रंगविलेल्या चित्राच्या पृष्ठावर चित्र अधिक टिकाऊ करण्याच्या हेतूने मेणाचा पातळ थरही दिला जातो. उदाहरणार्थ, रोम आणि पाँपेई येथील काही भित्तिलेपचित्रे ही शुष्क पद्धतीतील असून, त्यावर मेणाचा पातळ थर दिलेला असल्याने ती चित्रे आजही शाबूत आहेत.

जॉत्तो दी बोंदोने याने काढलेले सेंट फ्रान्सिसचे चित्र, तेरावे शतक.

ब. दुसऱ्या पद्धतीला चुनायुक्त-शुष्क भित्तिलेपचित्रण (Lime Secco) असे म्हणतात. या तंत्र-पद्धतीमध्ये प्रथम भिंतीवर चुन्याचा गिलावा दिला जातो. पूर्ण कोरड्या झालेल्या भिंती चित्रणाआधी चुन्याच्या पाण्यात भिजविल्या जातात आणि भिंती ओलसर असेपर्यंत रंगद्रव्यांमध्ये चुन्याचे मिश्रण करून चित्रण केले जाते. यामुळे रंग भिंतीत आरपार न जाता इतर कृत्रिम रंगांप्रमाणे पृष्ठीय पटल निर्माण करतात. रंग लेपन करतानाच हलके कोरडे पडून त्यांच्या मूळ छटेपेक्षा फिकट पडतात. ज्यामुळे त्यांचे फिकट, खरपृष्ठाप्रमाणे व खडूसारख्या अभिरंगात रूपांतरण होते. रंग पूर्णत: गिलाव्याशी शोषले जात नाहीत. त्याचे कधीही पापुद्रे निघण्याची शक्यता असते. याचे एक उदाहरण म्हणजे चौदाव्या शतकातील जॉत्तो दी बोंदोने  (Giotto) या कलाकाराचे असीसी येथील सॅन फ्रान्सिस्को हे भित्तिलेपचित्र.

शुष्क भित्तिलेपचित्रण या पद्धतीत जरी चुन्याची बंधक शक्ती वापरात येत असली, तरी खऱ्या (True fresco) भित्तिलेपपद्धतीप्रमाणे ती टिकाऊपणा साध्य करू शकत नाही; पण तुलनेने विस्तृत पृष्ठावर ज्यावेळी चित्रण करावयाचे असेल, त्यावेळी ही पद्धती सार्द्र भित्तिलेपचित्रण पद्धतीपेक्षा उपयुक्त ठरते. तसेच सार्द्र भित्तिलेपचित्रणपद्धतीतील चित्रांची दुरुस्ती करण्याकरिता ही पद्धत उपयोगात आणतात.

मिनोअन कला-संस्कृतीमधील क्रीटमधील नॉसस येथे तसेच इटलीमधील प्राचीन अभिजात कला-साहित्याच्या पुनरुज्जीवनाची चळवळ असलेल्या प्रबोधनकाळात तेराव्या ते सोळाव्या शतकातील अनेक प्रवाहातील चित्रकारांकडून या पद्धतीचा वापर करण्यात आला. यामध्ये फ्रा अँजेलिको, प्येरो देल्ला फ्रांचेस्का, जॉत्तो दी बोंदोने इत्यादी कलाकरांची नावे प्रामुख्याने घेता येतील.

गुंफाचित्र, सितन्नवासल, तमिळनाडू.

सोळाव्या शतकातील दक्षिण भारतीय शिल्पशास्त्रज्ञ श्रीकुमार याने शिल्परत्न या ग्रंथामध्ये या शुष्क भित्तिलेपचित्रण पद्धतीचे सविस्तर वर्णन केलेले आहे. त्यामध्ये त्याने यासाठी वापरण्यात येणारे रंग, त्यासाठीचे वापरावयाचे इतर साहित्य इत्यादींची सविस्तर माहिती दिलेली आहे. भारतात केरळ व तमिळनाडू येथील द्राविड शैलीच्या गुंफामंदिरांमध्ये आणि जुन्या राजमहालांमध्ये, राजस्थानमध्ये विविध हवेल्यांतील भित्तिचित्रांमध्ये या प्रकारच्या शुष्क भित्तिलेपचित्रण पद्धतीचा वापर केलेला पहावयास मिळतो. येथील भित्तिचित्रांमध्ये लाल, पिवळा, हिरवा, काळा आणि सफेद हे पाच प्रमुख नैसर्गिक रंग विविध वनस्पती, खनिज इत्यादींपासून बनवलेले वापरलेले आहेत. येथील भित्तिचित्रे प्रामुख्याने कणाश्म (ग्रॅनाइट) व जांभा (लेटराइट) दगडांच्या भिंतीवर काढलेली आहेत. क्रूड प्लास्टरच्या पहिल्या थरानंतर चुना व वाळूच्या मिश्रणाने त्यावर दुसरा गुळगुळीत थर देऊन त्यानंतर चुन्याच्या अनेक थरांवरती राळ आणि चुन्याच्या अंतिम थराचे लेपन केलेले आढळते. यावर एका विशिष्ट क्रमाने रंग दिलेले आहेत. सर्वांत शेवटी काळ्या रंगाचे भरण केलेले आहे.

१८व्या शतकात यूरोपमध्ये जिओव्हान्नी बातीस्ता टिपोलो (Giovanni Battista Tiepolo), फ्रान्काइस बाउचर (François Boucher) व झां-होनोरे फ्रेगोनार्द (Jean-Honoré Fragonard) या कलाकारांनी शुष्क भित्तिलेपचित्रण या पद्धतीचे पुनरुज्जीवन केले. विसाव्या शतकात पाश्चात्त्य चित्रकार दिएगो रिव्हेरा आणि फ्रान्सिस्को क्लेमेंत यांनी तर भारतामध्ये राजस्थानी कलाकार व केरळ येथील प्रमुख चित्रकार अमियूर कृष्णन कुट्टी नायर यांनी या कलेचे यशस्वी पुनरुज्जीवन केले.