हेइआन कालखंड : (हे-आन कालखंड).जपानी साहित्याचे सुवर्णयुग. इ.स. ७९४ ते ११८५ च्या दरम्यानचा हा कालखंड जपानी काव्य आणि साहित्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. त्या काळात जपानची राजधानी असलेल्या हेइआनक्यो (सध्याचे क्योतो) वरुन या कालखंडाचे नाव हेइआन असे पडले. ह्या कालखंडामध्ये जपानवर बौद्ध धर्म,ताओ धर्म आणि चीनचा अतिशय प्रभाव होता. हेइआन कालखंडावर जपानी साम्राज्यशाहीचा प्रभाव मोठा आहे. तसेच तत्कालिन काव्य व साहित्य यासाठी तो ओळखला जातो. हेइआन कालखंडामध्ये जपानची अक्षर-लिपी विकसित झाली. नारा कालखंडामध्ये चीनी लिपीचा वापर केला जात असे.ती लिहिणे आणि वाचणे अवघड होते. नारा कालखंडामध्ये प्रसिद्धीस आलेल्या मानयोशु ह्या काव्य संग्रहामध्ये चीनी भाषेतील कांजी लिपीचा वापर केला गेला होता. हेइआन कालखंडामध्ये संकलित केल्या गेलेल्या कोकिन वाकाश्यु मध्ये मात्र काना या लिपिचा वापर केला आहे. हेइआन कालखंडामध्ये विकसित झालेली काना ही लिपी एकसमान असून अतिशय सोपी होती. काना लिपीचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला तसा जपानी साहित्याचा एक विलक्षण आविष्कार समोर आला. उच्चकुलीन व्यक्तींकडून लिहिल्या गेलेल्या साहित्याने जपानी साहित्य समृद्ध झाले. त्यांना वाटणारी सौंदर्यशास्त्राबद्दलची कळकळ त्या काळातील साहित्यामध्ये दिसून येते. नारा कालखंडातील असलेला चीनी साहित्याचा प्रभाव हेइआन कालखंडामध्ये नाहीसा झाला.या काळात पूर्णपणे जपानी साहित्य उदयास आले.म्हणून ह्या कालखंडाला जपानी साहित्याचे सुवर्णयुग असे म्हटले जाते.
या कालखंडामध्ये मुख्यत: काव्यसंग्रह, वंशावळी, रोजनिशी, ऐतिहासिक माहिती देणारे ग्रंथ, काल्पनिक गोष्टी असे साहित्यप्रकार लिहिलेले दिसून येतात. निर्दोष काव्यरचना आणि त्यातून व्यक्त केल्या गेलेल्या रंगछटा वाचकाला आकर्षित करतात. ह्या कविता तांका ह्या काव्य प्रकारात मोडतात. तांका ह्या शब्दाचा अर्थ छोट्या कविता असा आहे. ह्या कवितांचा वापर एकमेकांना निरोप देणे तसेच काव्यमैफिली मध्ये केला जात असल्याने लांबलचक कवितांपेक्षा छोट्या कवितांना प्राधान्य दिले गेले. ह्या कालखंडात उदयास आलेले मध्य-प्राचीन साहित्य विशेष करून गोष्टी, प्रेमकथा आणि महिलांनी लिहीलेली रोजनिशी ह्या प्रकारात मोडते. कांजी ही चीनी लिपी लिहिणे-वाचणे अवघड असल्याने जपानी स्त्रियांच्या साहित्य कलाकृती नारा कालखंडामध्ये दिसून येत नाहीत ; मात्र साध्या आणि सोप्या काना या लिपीच्या वापरामुळे जपानी स्त्रियापण साहित्य लिहिण्यासाठी प्रवृत्त झाल्या. त्यांनी जपानी लोकांचे भावविश्व, सौंदर्याशास्त्राबद्दलच्या कल्पना, राजदरबार ह्या बद्दल लिहिले. हेइआन कालखंडामध्ये रोजनिशी ही फक्त स्त्रियांनी लिहायची गोष्ट होती. म्हणूनच कि नो त्सुरायाकिने तोसा निक्की म्हणजे तोसाची रोजनिशी लिहिली. पुरुष असूनही त्याने हे लेखन एका स्त्रीच्या दृष्टीकोनातून केले आहे.मुरासाकी शिकिबूने लिहीलेल्या गेंजी मोनोगातारीला जगातली सगळ्यात जुनी कादंबरी म्हणून ओळखले जाते.राजपुत्र हिकारु गेंजी आणि त्याच्या प्रेमप्रकरणांबद्दल तसेच राज्य दरबाराबद्दल अनेक गोष्टी गेंजी मोनोगातारीमध्ये लिहिल्या आहेत.त्यावरून त्या काळातल्या समाजाची कल्पना करता येते. सेइ श्योनागोन हिने लिहीलेल्या माकुरा नो सोशी मध्ये हलके फुलके ललितलेखन आणि निसर्गाचे उत्कृष्ट वर्णन दिसून येते. आजूबाजूला घडणार्या घटना आणि अनुभवांबद्दल तिने तिचे विचार मांडले आहेत. लेडी साराशिना या नावाने ओळखल्या जाणार्या सुगावारा नो ताकासुएच्या मुलीने लिहिलेली साराशिना निक्की (साराशिनाची रोजनिशी ) मध्ये तिने केलेल्या प्रवास आणि यात्रांचे सुंदर वर्णन आढळते. त्या काळामध्ये लिहिलेल्या मोजक्या प्रवासवर्णन पुस्तकांमध्ये त्याचा समावेश होतो. ह्या पुस्तकातील काही भाग उच्च-माध्यमिक जपानी शालेय पुस्तकामध्ये समाविष्ट केला आहे. ओकागामी ही इ.स.१११९च्या सुमारास लिहिली गेलेली ऐतिहासिक कादंबरी आहे. ह्या कादंबरी मध्ये इ.स.८५० ते १०२५ हा फुजिवारा कुटुंबियांच्या सुवर्णकाळाबद्दल लिहिले आहे. ह्या काळामध्ये फुजिवारा कुटुंब हे अतिशय प्रभावी कुटुंब म्हणून मानले जात होते. सम्राटाच्या खालोखाल त्यांना मान दिला जात असे. इ.स. ९८० मध्ये लिहिली गेलेल्या इसे मोनोगातारीमध्ये गद्य तसेच पद्य दोन्हीचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये १४३ कथा असून प्रत्येक कथेमध्ये एका पेक्षा जास्त गीते आहेत. प्रसंगाचे वर्णन करण्यासाठी गद्याचा वापर करण्यात आला आहे. इसे मोनोगातारीच्या लेखकाबद्दल काही माहिती उपलब्ध नाही. निहोन र्योइकी (इ.स.८२२ ) मध्ये बौद्ध भिक्षू क्योकाइने बुद्धाच्या चमत्कारांबद्दल लिहिले आहे. हे वाचून लोकांनी चांगल्या गोष्टी आचरणात आणाव्यात, सत्याचा मार्ग धरावा असे त्यांना अपेक्षित होते. सगळ्यात मोठ्या आणि काल्पनिक म्हणून जपानी साहित्यामध्ये ओळखल्या जाणार्या उत्सुबो मोनोगातारी (इ.स.९७० -९८३ ) मध्ये पद्यात्मक गोष्टी आणि परिकथांचा समावेश आहे. ह्या कादंबरी मध्ये ९८६ तांका (छोट्या कविता ) असून प्रत्यक्ष जीवन आणि काल्पनिक जग असा दोन्हीचा संगम आहे. १० व्या शतकामध्ये लिहीलेल्या ताकेतोरी मोनोगातारी मध्ये काल्पनिक गोष्टी लिहिल्या आहेत. चंद्रावरून पृथ्वीवर आलेली राजकन्या,तिच्याशी लग्न करायची इच्छा असणारे युवक आणि तिने त्यांना आणायला सांगितलेल्या अशक्य आणि दुर्मिळ गोष्टी ही कागुया हिमेची हलकीफुलकी कथा प्रसिद्ध आहे. १० व्या शतकामध्ये अंतराळामधून पृथ्वीतळावर येणारी व्यक्ती ही कल्पना लिहिल्याचे वाचून आश्चर्य वाटते. १२व्या शतकाच्या सुरूवातीस लिहीलेल्या कोंज्याकु मोनोगातारी मध्ये फक्त जपानच्या नव्हे तर चीन आणि भारतामधल्या कथा पण आहेत. ह्या कथांमधून दाखवलेले गेलेले जग व त्याचे वर्णन हे सम्राट-राजदरबाराच्या गोष्टींमधून दिसत नसल्याने ते वाचनीय ठरते. प्रत्येक कथेची सुरुवात ‘आत्तापासून खूप पूर्वी ‘ या वाक्याने होते. चीनी भाषेतल्या अक्षरांप्रमाणे 今は昔 असे लिहिले जाते आणि त्याचा उच्चार कोंज्याकु होतो. ह्या कथांमधून वेगवेगळे प्राणी येतात. मनुष्य स्वभावाशी असलेले त्यांचे साधर्म्य हे ह्या कथांचे वैशिष्ट आहे.सामुराइ योद्ध्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जपानमध्ये हेइआन कालखंडात स्त्रियांना सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या बरेच स्वातंत्र्य होते आणि कलेच्या दृष्टीने विशेषत: साहित्यामध्ये मान होता. जपानी साहित्य आणि त्याचा आस्वाद घेण्याची सौंदर्यदृष्टी हा हेइआन कालखंडातील उच्चकुलीन स्त्री पुरुषांनी जपानला दिलेला वारसा आहे असे म्हटले जाते.
संदर्भसूची :
- 1.Diaries of Court Ladies of Old Japan. digital.library.upenn.edu › women › omori › court › court
- 2.Heian Period – Ancient History Encyclopedia ,www.ancient.eu › Heian_Period
- 3.Japanese literature – Classical literature: Heian period,www.britannica.com › art › Classical-literature-Heian-period-794-118
- 4.Literature of the Heian Period: 794-1185 | Asia for Educators … afe.easia.columbia.edu › special › japan_600ce_heian
- 5.平安時代文学(へいあんじだいぶんがく)とは – コトバンク,kotobank.jp › word › 平安時代文学-623792
- 6. 各時代の代表的な文学作品と歴史的背景 ,www.hidaka-h.wakayama-c.ed.jp › chuko › izuisi25
समीक्षक : निसिम बेडेकर