पातंजल योगसूत्रावर आधारित एक ग्रंथ. या ग्रंथात १२ अध्यायांतून याज्ञवल्क्य आणि गार्गी यांच्या संवादाच्या रूपाने येणाऱ्या ५०४ श्लोकांद्वारे अष्टांगयोगाच्या प्रत्याहार, प्राणायाम, ध्यान, धारणा अशा महत्त्वपूर्ण संकल्पनांची चर्चा करण्यात आली आहे. सदर ग्रंथाचे पहिले प्रकाशित हस्तलिखित इ.स. १८९३ मध्ये बंगालमध्ये सापडले.

याज्ञवल्क्य ऋषींच्या गुणवर्णनाने ग्रंथाचा आरंभ होतो. गार्गीने विद्वत्सभेत केलेल्या योगतत्त्व विशद करण्याच्या विनंतीला अनुसरून याज्ञवल्क्य ऋषी योगतत्त्वाच्या निरूपणास सुरुवात करतात. आपल्याला सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवांकडून हे ज्ञान मिळाल्याचे कृतज्ञतापूर्वक नमूद करीत याज्ञवल्क्य प्रवर्तक आणि निवर्तक अशी दोन प्रकारची कर्मे व त्यांतील फरक यांचे ते विवेचन करतात. ‘जीवात्मा आणि परमात्मा यांचा संयोग म्हणजे योग’ अशी योगाची व्याख्या देऊन हा योग म्हणजेच ज्ञान आणि तो योग अष्टांगांनी युक्त आहे असे ते सांगतात. त्यापुढे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि या योगांगांचे विवेचन येते. यमांच्या विस्तृत विवेचनाने या अध्यायाचा मोठा भाग व्यापला आहे. याज्ञवल्क्यांनी महर्षि पतंजलिप्रणीत अष्टांगयोगातील अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य हे चार यम विचारात घेतले असून अपरिग्रह हा यम वगळला आहे. तसेच दया, आर्जव, क्षमा, धृति, मिताहार आणि शौच यांची भर घालून एकूण दहा यमांच्या व्याख्या दिल्या आहेत. यात आई-वडील, आचार्य, मामा आणि श्वशुर (सासरे) हे मनुष्याचे पाच गुरू सांगितले आहेत. त्यातही आई-वडील आणि आचार्य हे मुख्य गुरू आणि त्यातसुद्धा आचार्य हे सर्वोच्च गुरू असा क्रम मानला आहे. सर्व यमांची सविस्तर चर्चा करून पहिल्या अध्यायाची सांगता केली आहे.

दुसऱ्या अध्यायात नियमांचे विस्तृत विवेचन आले आहे. पातंजल योगात सांगितलेल्या शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान या नियमांपैकी याज्ञवल्क्यांनी संतोष, तप यांना विचारात घेतले आहे. स्वाध्याय आणि शौच यांना नियमांमधून वगळले आहे आणि आस्तिक्य, दान, सिद्धांतश्रवण, ह्री, मति, जप आणि व्रत यांचा नव्याने समावेश केला आहे. ईश्वरप्रणिधानाऐवजी ईश्वरपूजन अशी संज्ञा योजली आहे.

यात जपाची विशेष माहिती दिली आहे. गुरूपदेशाने किंवा शास्त्रोक्त मार्गाने केलेला मंत्राभ्यास म्हणजे जप आणि वेद, सूत्र, पुराण, इतिहास यांचा पुन:पुन्हा केलेला अभ्यास म्हणजेही जप अशा जपाच्या व्याख्या याज्ञवल्क्य देतात. तसेच त्यांनी त्याच्या वाचिक, मानस, उपांशु इत्यादी प्रकारांचाही परिचय करून दिला आहे.

तिसऱ्या अध्यायात स्वस्तिकासन, गोमुखासन, पद्मासन, वीरासन, सिंहासन, भद्रासन, मुक्तासन आणि मयूरासन अशा आसनांची लक्षणे सांगितली  आहेत. यम, नियम यांचे पालन करून आणि या आसनांचा योग्य प्रकारे प्रयोग करून नाडीशुद्धी आणि प्राणायाम केल्यास शरीरातील सर्व रोग नष्ट होतात आणि विषबाधेचा प्रतिकार होतो असे प्रतिपादन याज्ञवल्क्य करतात.

चवथ्या अध्यायात गार्गी याज्ञवल्क्यांना नाड्यांची उत्पत्ती, त्यांच्या चारणाची प्रक्रिया, वायूची शरीरातील स्थाने आणि कर्मे यांची विचारणा करते. यावर उत्तर देताना याज्ञवल्क्य विवेचन करतात की, शरीर ९६ अंगुळे इतके असून प्राण १२ किवा १४ अंगुळे इतका आहे. येथे देहाचा मध्य कोठे असतो तसेच मनुष्य, चतुष्पाद आणि पक्षी यांच्या बाबतीत तो कसा वेगवेगळ्या स्थानी असतो याची चर्चा आली आहे.

नाभीमध्ये १२ आऱ्यांचे चक्र आहे आणि त्याच्या आधाराने देह सुस्थिर आहे असे याज्ञवल्क्य सांगतात. या चक्रामध्ये पाप-पुण्याने लिप्त असा जीव कोळ्याच्या जाळ्यात असावा तसा बद्ध असतो. या चक्राखाली प्राणाचे अस्तित्व असते आणि प्राणामुळे जीवाचे अस्तित्व असते. यापुढे सुषुम्णा, इडा, पिंगला, सरस्वती, वारूणी, पूषा, हस्तिजिह्वा, यशस्विनी, विश्वोदरा, कुहू, शंखिनी, पयस्विनी, अलम्बुषा, गांधारी या १४ नाड्यांचे विवेचन येते. या नाड्यांमधून दहा प्रकारचे वायू प्रवास करतात आणि त्यातल्या पाच प्रमुख वायूंना प्राण ही संज्ञा आहे. यापुढे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पंचप्राणांची विस्ताराने माहिती दिली आहे.

पाचव्या अध्यायात याज्ञवल्क्य नाडीशोधनाची प्रक्रिया म्हणजेच नाडीशुद्धीचे उपाय सांगतात. नाडीशोधन करू इच्छिणाऱ्या आदर्श साधकाच्या गुणवैशिष्ट्यांचे ते प्रतिपादन करतात. शारीरिक आणि मानसिक पावित्र्याने युक्त, स्वधर्माचे निष्ठेने पालन करणारा, मिताहारी असा साधक जेव्हा योगसाधनेस अनुकूल अशा रम्य आणि पवित्र जागी जाऊन इष्टदेवता, गुरू यांचे स्मरण करून नासाग्रावर लक्ष एकाग्र करतो, तसेच इडा, पिंगला, प्राण यांचे योग्य प्रकारे चालन करून षट् कृत्यांचे तीन ते चार महिने किंवा तीन ते चार वर्षे नियमित आचरण करतो, तेव्हा त्याची  नाडीशुद्धी होते असे प्रतिपादन याज्ञवल्क्य करतात.

सहाव्या अध्यायात प्राणायामाच्या प्रक्रियेचे सविस्तर वर्णन येते. ‘प्राण आणि अपान यांचा संयोग म्हणजे प्राणायाम’ आणि तो रेचक, पूरक व कुंभक यांनी युक्त असतो असे याज्ञवल्क्य सांगतात. नाड्यांद्वारे होणारे वायूंचे चलनवलन, प्रणवाचा जप, महेश्वराचे ध्यान, गायत्रीचा जप यांचे वर्णन येते. प्राणाला शरीराच्या कोणत्या भागात धारण करून ठेवल्याने आरोग्याला कोणते लाभ होतात याचे सविस्तर वर्णन पुढे येते. पायाच्या अंगठ्यात प्राण धारण केल्याने शरीर हलके होते, तर नाभीमध्ये प्राण धारण केल्याने सर्व रोगांचा विनाश होतो, असे याज्ञवल्क्य सांगतात.  प्राणायामाचे लाभ सांगून प्रणवाच्या आराधनेसोबत रेचक, पूरक, कुंभक यांनी युक्त असा प्राणायाम सर्वांनी करावा असे सांगून ते या अध्यायाची सांगता करतात.

सातव्या अध्यायात प्रत्याहाराची माहिती दिली आहे. इंद्रिये स्वभावत:च विषयांकडे आकृष्ट होणारी असतात. त्यांना बलपूर्वक विषयांपासून परावृत्त करणे म्हणजे प्रत्याहार अशी व्याख्या याज्ञवल्क्य देतात. येथे प्रत्याहाराच्या पाच प्रकारांचे वर्णन येते. शरीरातील १८ मर्मस्थानांवर वायूला धारण केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते असे अगस्तीमुनींनी देखील सांगितले आहे असे याज्ञवल्क्य उद्धृत करतात. येथे ही स्थाने, त्यांचे एकमेकांपासून असलेले अंतर याची माहिती दिली आहे.

आठव्या अध्यायात धारणेची चर्चा आलेली आहे. हृदयरूपी कमळाच्या अंतराकाशात बाह्याकाशाला धारण करणे म्हणजे धारणा अशी व्याख्या याज्ञवल्क्य देतात. धारणा भूमी, आप, तेज, वायू आणि आकाश अशा पाच महाभूतांवर केली जाते. त्यापुढे या पाच महाभूतांची शरीरातील स्थाने कोणती, त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या धारणेचा काळ किती याचे विस्तृत विवेचन आले आहे. मानवी शरीर पाच महाभूतांपासून बनलेले असल्याने त्यांचा आणि शरीरातील वात, पित्त व कफ या तीन दोषांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने धारणा करून प्राणसंयमन केल्यास त्रिदोषांवर विजय मिळवता येतो.

नवव्या अध्यायात ध्यानाची माहिती दिली आहे. ध्यान हे सर्व जीवांच्या बंधन (संसारात अडकणे) आणि मोक्ष (जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका) यांचे कारण आहे, असे विधान याज्ञवल्क्य करतात. सगुण आणि निर्गुण अशा ध्यानाच्या दोन प्रकारांचे ते विवेचन करतात. सगुण ध्यानाच्या संदर्भात शंखचक्रगदाधारी विष्णूच्या सगुण साकार रूपावर, शांत निर्विकार शिवावर किंवा सहस्र अमृतधारांनी युक्त अशा कमळावर ध्यान करावे असे वर्णन येते. ऋषिमुनींनी ध्यानाच्या बळावरच मुक्ती प्राप्त केली असे नमूद करून याज्ञवल्क्य प्रस्तुत अध्यायाची सांगता करतात.

दहाव्या अध्यायात समाधीचे वर्णन आले आहे. समाधीमुळे संसाराचे पाश नष्ट होतात असे सांगितले आहे. जीवात्मा आणि परमात्मा यांची साम्यावस्था, जीवाचे ब्रह्माच्या ठिकाणी स्थैर्य असा समाधीचा अर्थ याज्ञवल्क्यांनी सांगितला आहे. ज्यावर ध्यान केले जाते, त्याच्याशी एकात्म्य साधले की समाधीची अनुभूती मिळते. यानंतर समाधीसाठी आवश्यक अशा काही पूर्वअटी सांगितल्या आहेत. त्यापुढे योगी मृत्युसमयी देहाचा त्याग करून मुक्ती कशी मिळवितो त्या प्रक्रियेचे सविस्तर वर्णन येते. मुक्ती मिळविण्यासाठी असलेले कर्मयोगसमुच्चयाचे म्हणजेच कर्म आणि ज्ञान यांचा योग्य मिलाप करून साधना करण्याचे महत्त्व अधोरेखित करून या अध्यायाची सांगता होते.

अकराव्या अध्यायाचा आरंभ गार्गीने विचारलेल्या एका शंकेने होतो. योग्याकडून वेदोक्त नित्यकर्माचे आचरण अपेक्षित असते. परंतु, समाधि अवस्थेतील योग्याकडून ते अपेक्षेप्रमाणे झाले नाही तर त्यावर काय प्रायश्चित्त असते असा प्रश्न गार्गीने केला आहे. यावर याज्ञवल्क्यांचे उत्तर असे आहे की, समाधि अवस्थेतील योग्याला नित्यकर्माचे आचरण बंधनकारक नाही. परंतु, त्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर मात्र त्याने वेदोक्त पद्धतीने आचरण करणे अपेक्षित आहे.

बाराव्या अध्यायात याज्ञवल्क्य आत्तापर्यंत सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा सारांश देतात. योगमार्ग, कुंडलिनीची जागृती, वायूचा शरीरातील प्रवास, साधनेचे लाभ अशा मुद्द्यांवर संक्षेपाने भाष्य करून ते जणू काही ग्रंथाची फलश्रुती सांगतात.

बाराव्या शतकातील योगसाधनेवर या ग्रंथाचा मोठा प्रभाव दिसून येतो.

समीक्षक : कला आचार्य