रो, सर टॉमस : (? १५८१ – ६ नोव्हेंबर १६४४). एक इंग्रज मुत्सद्दी व भारतातील मोगल दरबारातील वकील. त्याचा जन्म लो लिटन (इसेक्स-इंग्लंड) येथे सधन कुटुंबात झाला. त्याच्या बालपणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याचे शिक्षण मॅग्डलन महाविद्यालयात (ऑक्सफर्ड) झाले.

प्रारंभी पहिल्या एलिझाबेथच्या कारकिर्दीत त्याला दरबारात नियुक्ती मिळाली (१६०३). राणीने त्यास सरदारकीचा (नाइटहूड) दर्जा दिला (१६०४). काही वर्षे आफ्रिकेतील ॲमेझॉन व ओरिनोको या नद्यांच्या जलप्रवासात आणि सोन्याच्या शोधार्थ त्याने घालविली (१६१०). पुढे तो टॉमवर्थमधून पार्लमेंटवर निवडून आला (१६१४).

पहिला जेम्सने त्याची भारतात मोगल बादशहा जहांगीर याच्या दरबारी वकील (राजदूत) म्हणून नियुक्ती केली (१६१५). या चार वर्षांच्या कारकिर्दीत (१६१५ ते १६१९) त्याने ब्रिटिशांचा (ईस्ट इंडिया कंपनी) व्यापार वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने काही एक निश्चित धोरण राबविले. त्याने गुजरातचा सुभेदार खुर्रम आणि बादशाह यांच्याकडून व्यापारासाठी दोन फर्माने मिळविली. जहांगीरबरोबर तो अजमीर, मंडू, अहमदाबाद आदी ठिकाणी गेला. त्याने डच व पोर्तुगीज यांचे जहांगीरच्या दरबारातील महत्त्व लक्षात घेऊन इंग्रजांच्या वखारीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारात त्यामुळे सुरक्षितता लाभली आणि अनेक सवलती मिळाल्या. मोगल बादशाहाबरोबर बरोबरीच्या नात्याने कंपनीतर्फे व्यापारी तह करावा, अशी त्याची इच्छा होती; परंतु त्यात त्यास यश आले नाही. जहांगीरास त्याने अनेक मूल्यवान वस्तू भेट दिल्या. त्यांपैकी इंग्रजी घाटाची बगी प्रसिद्ध होती. भारतातील आपल्या वास्तव्याच्या त्याने सविस्तर आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्या मोगल काळातील रीतीरिवाजांवर व जहांगीर-शाहजहान यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतात.

भारतातून तो इंग्लंडला परत गेला (१६१९). त्याची राजाने कॉन्स्टँटिनोपल येथे राजदूत (१६२१-२८) म्हणून नियुक्ती केली. त्याने ऑटोमन साम्राज्यात इंग्लंडच्या व्यापारासाठी सम्राटाकडून काही विशेष अधिकार मिळविले. ऑटोमन साम्राज्यांतर्गत त्याच्या आधिपत्याखाली असलेल्या अल्जीरियाबरोबर त्याने मैत्रीचा तह केला आणि बर्बरी राज्यांतील चाच्यांनी पकडलेल्या शेकडो इंग्रजांना मुक्त केले (१६२४). ऑटोमन साम्राज्य आणि पोलंड यांमधील शांतता तहात त्याने मध्यस्थी केली. इंग्लंडला परतल्यानंतर (१६२९) त्याने स्वीडन आणि पोलंड यांमधील आल्तामार्कचा शस्त्रसंधी घडविण्यात सक्रिय भाग घेतला. त्याबद्दल स्वीडनच्या राजाने त्याला दोन हजार पौंड बक्षीस दिले. या शस्त्रसंधीमुळे स्विडिश लोकांना प्रॉटेस्टंटाच्या बाजूने तीस वर्षीय युद्धात निर्विघ्नपणे भाग घेता आला. पुढे त्याची चॅन्सेलर ऑफ द ऑर्डर ऑफ द गार्टर या पदावर नियुक्ती झाली (१६३७). या पदाचे त्याला १२०० पौंडांचे वार्षिक निवृत्ती वेतन मिळू लागले.

हॅम्बुर्ग (१६३८), रॅटसबॉन (१६४१) आणि व्हिएन्ना (१६४२) येथे तीस वर्षीय युद्ध संपुष्टात यावे म्हणून भरलेल्या शांतता परिषदांत इंग्लंडचा प्रतिनिधी म्हणून तो उपस्थित होता. राजाने मध्यंतरी त्याची खासगत मंत्री (प्रायव्ही कौन्सिलर) पदावर नियुक्ती केली (१६४०). ऑक्सफर्ड विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून तो लाँग पार्लमेंटवरही निवडून आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याने स्वेच्छा निवृत्ती पतकरली (१६४३) आणि बॅथ (समरसेट) येथे तो विश्रांतीसाठी स्थायिक झाला. तेथेच तो काही महिन्यांनी मरण पावला.

टॉमस रोने आठवणींच्या स्वरूपात विपुल लेखन केले. त्यांपैकी एम्बसी ऑफ सर टॉमस रो टु द कोर्ट ऑफ ग्रेट मोगल (१८९९) हा ग्रंथ भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. सर विल्यम फॉस्टर याने त्याची सुधारित आवृत्ती संपादित करून १९२७ मध्ये प्रसिद्ध केली. त्याने उद्‌धृत केलेली माहिती मनोरंजक असून विश्वसनीय आहे. त्याच्या मुत्सद्देगिरीमुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराला आशिया खंडात चालना मिळाली. तीस वर्षांच्या युद्धातील त्याची सलोख्याची मध्यस्थी आणि ऑटोमन साम्राज्यातील त्याची शिष्टाई यांतून त्याच्या मुत्सद्देगिरीचे पैलू दिसतात.

संदर्भ :

  • Majumdar, R. C. Ed. The Mughul Empire, Bombay, 1974.