छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकप्रसंगी सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही दोन नाणी नव्याने पाडली व ती स्वराज्यात चलन म्हणून अल्पावधीत रूढ झाली. मात्र स्वराज्यावरील औरंगजेबाच्या आक्रमणानंतर अनेक उलथापालथी झाल्या. त्यातच मराठेशाहीची पूर्वीची द्विधातू चलनव्यवस्था आमूलाग्र बदलून मोगल पद्धतीची त्रिधातू चलनव्यवस्था रूढ झाली. या नव्या व्यवस्थेत तांब्याचा शिवराई पैसा कायम ठेवूनच, चांदीचा रुपया आणि सोन्याची मोहोर ही नाणी नव्याने प्रचलित झाली. होन हे नाणे काही ठिकाणीच चलनात राहिले. हे बदल १७१४ पासूनच झालेले दिसतात. मराठ्यांनी आपली चलनव्यवस्था बदलण्यामागे मोगलांसोबतच्या, तसेच सातारा-कोल्हापूर या मराठ्यांच्या दोन शाखांमधल्या संघर्षाची पार्श्वभूमी आहे.

फर्रुख सियरच्या नावे पाडलेला सातारा येथील रुपया, जुलूस वर्ष ३.

पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी दिल्लीच्या मोगल बादशाहकडून छ. शाहू महाराजांचे चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क मान्य करणारी सनद आणल्यावर सातारा शाखेचे सामर्थ्य वाढले (१७१८). तुलनेने कोल्हापूर शाखेचे सामर्थ्य मात्र कमी होत गेले. छ. शाहू महाराजांना मिळालेल्या सनदेमुळे दख्खनमध्ये निजामाच्या अधिकारक्षेत्रातही हस्तक्षेपाचा अधिकार त्यांना मिळाल्याने निजामाशीही युद्धे सुरू झाली. कोल्हापूरकर छ. संभाजी महाराजांनी निजामाशी संधान बांधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १७२५ मध्ये छ. शाहू महाराजांनी संभाजी महाराजांशी तह केला, परंतु त्यालाही यश आले नाही. पुढे थोरल्या बाजीराव पेशव्यांनी १७२८ मध्ये पालखेड येथे निजामाचा पराभव केला, तसेच छ. शाहू आणि कोल्हापूर छ. संभाजी यांच्यामध्ये अनेकदा चकमकी घडल्यानंतर अखेर वाटाघाटी होऊन वारणेचा तह झाला (१७३१) आणि सातारा व कोल्हापूर शाखांमधील वैर संपुष्टात आले.

फर्रुख सियरच्या नावे पाडलेला पन्हाळा येथील रुपया, हिजरी वर्ष ११३०.

एकूणच १७०८ ते १७२१ पर्यंतचा कालखंड मराठेशाहीच्या दृष्टीने बऱ्याच धामधुमीचा होता. सातारा व कोल्हापूर या मराठेशाहीच्या दोन्ही शाखांनी मोगलांकडून स्वत:च्या शाखेस मान्यता मिळावी, यासाठी बरेच प्रयत्न केले. त्या वेळी प्रत्यक्ष व्यवहारात वर्चस्व दिसण्याइतपत मोगल बलशाली नव्हते आणि मोगलांना झुगारण्याइतके मराठेही समर्थ नव्हते. औरंगजेबाच्या मरणोत्तर दख्खनमधील राजकीय परिस्थितीत कोणताही एक पक्ष निर्विवादपणे वरचढ ठरेल, अशी शक्यता नसल्यामुळे मोगल आणि मराठे दोघांनाही एकमेकांशी जुळवून घेणे भाग होते. याचीच परिणती म्हणजे मोगलांचे वर्चस्व तात्त्विकदृष्ट्या मान्य करून मोगल बादशाहच्या नावाने नाणी पाडणे होय. मोगल बादशाह फर्रुख सियर (कारकिर्द १७१३-१७१९) याच्या काळात मराठ्यांच्या अंमलाखालील प्रदेशात मोगलांच्या नावे पाडलेली नाणी हीच मराठ्यांनी नव्या व्यवस्थेत पाडलेली सर्वांत जुनी नाणी होत. ही नाणी त्यांवर नमूद केलेल्या नावांनुसार पाहता सातारा, पन्हाळा, कोल्हापूर, मालवण, कागल, भुदरगड आणि लोकापूर या ठिकाणी पाडली गेलेली आहेत. एका सोन्याच्या मोहरेचा अपवाद वगळता बाकी सर्व चांदीचे रुपये आहेत.

फर्रुख सियरच्या नावे पाडलेला कोल्हापूर येथील रुपया, जुलूस वर्ष ३.

सातारा येथे पाडलेल्या नाण्यावर बादशाह फर्रूख सियरचे नाव आणि जुलूस अर्थात राज्यारोहणाचे वर्ष ३ (१७१५-१६) आणि टाकसाळीचे नाव ‘किला साताराʼ असे नमूद आहे. छ. शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखालील प्रदेशात पाडलेला हा आजवरील सर्वांत जुना ज्ञात रुपया आहे.

पन्हाळा येथे या काळात पाडलेली कित्येक नाणी ज्ञात असून, त्यांवरील टाकसाळीचे नाव हे ‘किला परनालाʼ, ‘परनालाʼ, ‘किला नबीशाह दुर्ग उर्फ परनालाʼ अशा तीन प्रकारे येते. किला नबीशाह हे औरंगजेबाने दिलेले नाव असून, मराठ्यांच्या इतर नाण्यांप्रमाणेच येथेही औरंगजेबाने बदललेली नावे आणि मूळ नाव अशी दोन्ही नावे दिसून येतात. या प्रकारच्या बहुतांश नाण्यांवरचे जुलूस वर्ष स्पष्टपणे दिसत नसून, हिजरी वर्ष मात्र नमूद आहे. उदा., ११३०, ११३२. त्यावरून १७१७ अर्थात जुलूस वर्ष ५ हे लक्षात येते. एका नाण्यावर जुलूस वर्ष ५ हे अर्धवट दिसून येते.

फर्रुख सियरच्या नावे पाडलेला मालवण येथील रुपया, जुलूस वर्ष २.

कोल्हापूर येथील नाण्यांवर टाकसाळीचे नाव ‘कोलापूर सरकार रायबागʼ असे येते. यावरून ही नाणी कोल्हापूरऐवजी रायबाग येथे पाडली असावीत, असा काही संशोधकांचा तर्क होता. मात्र, छ. शाहू महाराजांना चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क प्रदान करणाऱ्या मोगल सनदेत रायबाग हे दक्षिणेतील एका प्रशासकीय विभागाचे केंद्र असून, त्याला ‘सरकार रायबागʼ असे नाव दिलेले आहे. यात कोल्हापूर जिल्हा व सातारा जिल्ह्यातील कराडपर्यंतचा प्रदेश समाविष्ट असल्याचेही नमूद आहे. त्यामुळे ही नाणी रायबागऐवजी कोल्हापूरलाच पाडली असावीत, हे सिद्ध होते. यांतील सर्वांत जुने नाणे जुलूस वर्ष २ चे असून, जुलूस ३, ४ आणि ६ या वर्षांचीही नाणी ज्ञात आहेत.

मालवण येथे पाडलेल्या नाण्यांवर टाकसाळीचे नाव ‘बंदर मालवणʼ असे नमूद असून, उपलब्ध सर्वच नाण्यांवर फर्रुख सियरचे जुलूस वर्ष २ आहे. स्वराज्यसंस्थापक छ. शिवाजी महाराजांच्या काळापासून मालवण व जवळचा जलदुर्ग सिंधुदुर्ग यांचे महत्त्व वादातीत होते. पुढेही अखेरपर्यंत हा भूभाग आणि सोबतच आरमाराचा एक भाग कोल्हापूरकर छत्रपतींकडे राहिला. त्याच्या सागरी महत्त्वामुळे बंदर असा उल्लेख येणे क्रमप्राप्त आहे.

फर्रुख सियरच्या नावे पाडलेली भुदरगड येथील मोहोर, हिजरी वर्ष ११२९.

कागल येथे पाडलेल्या नाण्यांवर जुलूस वर्ष नमूद नाही. टाकसाळीचे नाव ‘कागलʼ असे येते. भुदरगड येथील नाण्यांवर अस्पष्टपणे जुलूस वर्ष २ आणि हिजरी वर्ष ११२९ हे आकडे नमूद असून, टांकसाळीचे नाव ‘भूदरगहʼ असे नमूद आहे. येथील टाकसाळीतल्या रुपयासोबतच मोहोरही ज्ञात आहे. लोकापूर येथे पाडलेल्या नाण्यांवर टांकसाळीचे नाव ‘लोकापूरʼ असे नमूद असून, मोडी लिपीतील ‘लʼ आणि ‘कʼ यांमधील साधर्म्यामुळे नाण्याचा ठसा कोरणाऱ्याची गफलत झाली असेल, असा तर्क शैलेंद्र भांडारे यांनी परिस्थितीजन्य पुरावे व कागदपत्रांच्या आधारे मांडला आहे. यांवरही जुलूस वर्ष २ अस्पष्टपणे दिसते.

वरील वर्णनांवरून दिसून येते की, फर्रुख सियरच्या राज्यारोहण वर्ष २ पासून, अर्थात १७१४ पासून ही नाणी पाडण्यास सुरुवात झाली. साताऱ्याचा अपवाद वगळता बाकी सर्व नाणी कोल्हापूरकर छत्रपतींच्या अंमलाखालील प्रदेशात पाडलेली आहेत. १७१४ साली कोल्हापूरमध्ये रक्तशून्य क्रांती होऊन संभाजी महाराज छत्रपती झाले, त्याचीच पार्श्वभूमी यामागे आहे हे उघड आहे. यानंतर मुहम्मदशाहच्या (कार. १७१९-१७४८) कारकिर्दीतही वरील काही टाकसाळींतील नाणी दिसतात. सुरुवातीच्या काळात (१७१४-२०) सातारकर छत्रपतींच्या तुलनेत कोल्हापूरकर छत्रपतींनी मोगलांच्या नावे पाडलेली नाणी तुलनेने जास्त आहेत. याची मुख्य कारणे म्हणजे अनेक सरदारांनी कोल्हापूर सोडून सातारकरांचा पक्ष धरणे, शिवाय मोगलांसोबतच्या वाटाघाटी फसणे ही होत. यामुळे अशी नाणी पाडून मोगलांचा पाठिंबा मिळवण्याची धडपड यामागे दिसून येते. १७३० नंतर कोल्हापूरकरांनी मोगली छापाची नाणी पाडणे सुरूच ठेवले असले, तरी अनेक टांकसाळी बंद झाल्याचे दिसते.

संदर्भ :

  • Bhandare, Shailendra, ‘Reclaiming ‘Royalty’: The earliest Maratha coinage in the name of a Mughal emperorʼ, Journal of the oriental numismatic society, Vol. 200, pp.41-52, UK, 2009.
  • चित्रसौजन्य : https://www.zeno.ru/

                                                                                                                                                                                     समीक्षक : सचिन जोशी