दिल्लीचा मोगल बादशाह औरंगजेब (१६१८—१७०७) याने दक्षिणेत मराठ्यांविरुद्ध केलेली मोहीम. औरंगजेबाला मराठ्यांच्या वाढत्या सत्तेला छ. शिवाजी महाराजांच्या हयातीत आळा घालता आला नाही. त्याच्या अकबराखेरीज सर्व मुलांनी, नातवांनी व सरदारांनी दक्षिणेत मुख्यतः मराठी राज्यावर १६८२ मध्ये आक्रमण सुरू केले. औरंगजेब स्वतः जातीने महाराष्ट्रात मराठेशाही बुडवण्यासाठी ठाण मांडून बसला. छ. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोगलांना शक्य तेवढा विरोध करून मराठी राज्याचे रक्षण केले. औरंगजेबाने १६८९ मध्ये छ. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली (११ मार्च १६८९). त्यानंतर छ. राजाराम, महाराणी ताराबाई यांनी मोगलांविरुद्ध टक्कर दिली. अखेर हैराण झालेल्या औरंगजेबाने मराठ्यांची ताकद असणारे गिरिदुर्ग आणि प्रदेश ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली (१६९९-१७०५).

औरंगजेबाने ब्रह्मपुरी येथील आपल्या छावणीतून या मोहिमेला सुरुवात केली. मसूरपासून तीन कोसांवर असलेल्या मराठ्यांचा वसंतगड या किल्ल्यावर हल्ला करण्यात आला. तोफखाना प्रमुख मीर आतिश तरबियतखानाने मोगली तोफा किल्ल्यासमोर आणून तटावर मारा सुरू केला. चार दिवसांतच वसंतगड मोगलांच्या ताब्यात गेला (२५ नोव्हेंबर १६९९). किल्ल्याचे नाव  ‘किली दे फतेह’ अर्थात यशाची किल्ली असे ठेवण्यात आले.

वसंतगड घेऊन औरंगजेब सातारा किल्ला जिंकण्यास निघाला. सातारा किल्ला ही मराठ्यांची राजधानीची जागा होती. हा वेढा तब्बल साडेचार महिने चालला. तरबियतखान याने टेहळणी केली, तोफा मोर्च्यांवर चढवल्या. किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू झाला. राजधानी असल्याने त्यावर शिबंदी, रसद इ. सामग्री भरपूर होती. बादशहाने निर्धाराने वेढा चालू ठेवला. १३ एप्रिल १७०० रोजी मोगलानी सुरुंग उडवला व तटाची भिंत कोसळली, किल्ल्याच्या आतील अनेक लोक कामी  आले. यानंतर परशुरामपंतांनी रहुल्लाखान व शहजादा आज्जम यांच्या मध्यस्थीने तहाची बोलणी केली. २१ एप्रिल १७०० रोजी सातारा किल्ला मोगलांच्या हाती आला. किल्ल्याचे नाव आजमतारा ठेवण्यात आले.

पुढे औरंगजेब सज्जनगड घेण्यासाठी साताऱ्याहून युद्धसामग्रीसह परळीला आला. ३० एप्रिल १७०० रोजी औरंगजेबाने किल्ल्यासमोरील मैदानात छावणी केली. रहुल्लाखानाने मोर्चे लावले व तोफा चढवल्या, किल्ल्यावर भडीमार सुरू केला. किल्ल्यावरून जोरदार प्रतिकार करण्यात आला. परंतु अजिंक्यतारा मोगलांना मिळाल्याने रसदेची आशा मावळली होती. नुकताच पर्जन्यकाळ सुरू झाला होता. रसदेच्या वाटा बंद झाल्या होत्या. त्यामुळे धान्य व सामग्री संपत आल्याने अखेर ९ जून १७०० रोजी किल्लेदाराने किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला. सज्जनगडाचे नाव नवरसतारा ठेवण्यात आले.

औरंगजेबाने शहजादा बेदरबख्त याला ब्रह्मपुरीहून बोलावून मराठ्यांचे पन्हाळगड व पावनगड हे किल्ले जिंकण्यासाठी पाठवले (२ मार्च १७०१). त्याच्याबरोबर झुल्फिकारखान नुसरतजंग व तरबियतखान होते. मोगलांनी दोन्ही किल्ल्यांना वेढा दिला. अखेर तरबियतखानामार्फत किल्लेदारास ५५,००० द्रव्य देऊन पन्हाळगड व पावनगड मोगलांनी ताब्यात घेतला (२८ मे १७०१). पन्हाळगडाचे नाव नबीशाहदुर्ग, तर पावनगडाचे नाव बानीशाहदुर्ग असे ठेवण्यात आले.

सन १७०१ चा पावसाळा बादशहाने खटावमध्ये काढला. फतेउल्लाखानाने वर्धनगड, नांदगिरी, चंदन, वंदन हे किल्ले जिंकून घेण्यासाठी हल्ले चढवले. वर्धनगड मराठ्यांनी ६ जून १७०१ रोजी मोगलांच्या ताब्यात दिला. त्याचे नाव सादिकगड ठेवण्यात आले. पुढे काही दिवसांतच नांदगिरीचा किल्ला मोगलांनी जिंकला. त्याचे नाव ठेवले नामगीर. यानंतर किल्ले चंदन आणि नंतर किल्ले वंदन यांना वेढा घातला गेला व ६ ऑक्टोबर १७०१ ला मराठे किल्ला सोडून गेले. किल्ले चंदन याचे नाव मिफ्ताह व किल्ले वंदन याचे नाव मफ्तह असे ठेवण्यात आले.

पावसाळा संपताच औरंगजेब विशाळगड घेण्यासाठी निघाला. रहिमतपूर, कऱ्हाड, शिराळा, सातगाव या वाटेने प्रवास करीत तो २६ नोव्हेंबर १७०१ रोजी मलकापुरास आला. फतेउल्लाखानाने गडाच्या पूर्व बाजूचा, मुख्य दरवाजाच्या समोरचा, दरीवरचा डोंगर आपल्या ताब्यात घेतला. दुसऱ्या दिवशी आजूबाजूचे डोंगरही हस्तगत केले गेले. डोंगरांवरून गडावर तोफा/बंदुकांचा मारा करता येणार होता. तेथून भुयारे खणून ती गडाच्या आत नेण्याचे काम मोगलांनी सुरू केले. किल्ल्यावरूनही प्रचंड प्रतिकार होत होता. रात्रंदिवस तोफा, बंदुका यांचा सतत मारा सुरू होता. शेवटी मे १७०२ मध्ये मराठ्यांनी तहाची बोलणी सुरू केली. सर्वजण सशस्त्र किल्ल्याबाहेर जातील, खर्चास रक्कम देण्यात येईल आणि मोगल सैन्याने येथूनच माघारी जावे अशा अटी ठरवून, बादशहाकडून त्या मान्य करवून घेऊन, परशुरामपंतांनी विशाळगड सोडला. खेळणा उर्फ विशाळगडाचे नाव सकरलना असे ठेवण्यात आले. विशाळगड हस्तगत करून मोगल परत फिरले खरे; पण तोवर पावसाळा सुरू झाला होता. वाटेत एक ओढा लागला. तो बादशहाने पार केला; पण बाकीच्या सैनिकांना ओढा पार करताना त्रास झाला. अनेक जण बुडून मेले. अतोनात नुकसान झाले. सर्व सामान ओढ्यात वाहून गेले. यापुढे आलेल्या ओढ्यात खजिना पुराच्या पाण्यात पडला व वाहून गेला. पन्हाळा जवळ येईपर्यंत पावसाचा हा मारा सुरूच होता.

पुढे औरंगजेब मोगल सैन्यासह बहादूरगडाहून निघाला (३ डिसेंबर १७०२) आणि कोंडाणा उर्फ किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचला (२७ डिसेंबर १७०२). तरबियातखानाच्या नेतृत्वाखाली तोफखान्याच्या लोकांनी तट, बुरुज यांवर मारा करून मराठ्यांना मागे रेटले. सेनापती धनाजी जाधव व बाळाजी विश्वनाथ भट यांनी सिंहगडाच्या बचावासाठी प्रयत्न केले. शेवटी किल्लेदारास ५०,००० द्रव्य देऊन सिंहगड मोगलांनी ताब्यात घेतला (८ एप्रिल १७०३). किल्ल्याचे नाव बक्षिंदाबक्ष ठेवण्यात आले. त्यानंतर लगेचच पुरंदर हस्तगत करून औरंगजेबाने त्याचे नाव ठेवले अजमगड. १० नोव्हेंबर १७०३ रोजी औरंगजेब मोगल सैन्यासह पुण्याहून राजगड जिंकण्यासाठी निघाला. २ डिसेंबर १७०३ रोजी हमीदुद्दीनखान बहादूर व तरबियतखान यांच्या नेतृत्वाखाली मोगल सैन्यास किल्ला जिंकण्याचा हुकूम सुटला. शेवटी रहुल्लाखानाच्या मध्यस्थीने बादशहाने मराठ्यांशी वाटाघाटी केल्या व १६ फेब्रुवारी १७०४ रोजी राजगड मोगलांच्या ताब्यात गेला. किल्ल्याचे नाव नबीशाहगड असे ठेवण्यात आले. राजगड घेताच मोगल लगेच तोरण्याकडे वळले व २३ फेब्रुवारी १७०४ रोजी त्यांनी तोरण्याजवळ छावणी केली. मोगलांनी तोरण्यास वेढा घालायला सुरुवात केली. तरबियतखान किल्ल्याच्या दरवाजासमोर मोर्चेबांधणी करत होता. महंमद अमीन खानबहादूर याने किल्ल्याबाहेर पडणाऱ्या वाटा रोखून धरल्या. १० मार्च १७०४ च्या रात्री २०–२५ सैनिक दोराच्या साहाय्याने तटावर चढून किल्ल्यात दाखल झाले व त्यांनी लढाईस सुरुवात केली. तोरणा किल्ला मोगलांनी लढून जिंकला. तोरणा किल्ल्याचे नाव फुतूहुलगैब (दैवीविजय) असे ठेवण्यात आले. पुढे मार्च-एप्रिल १७०४ मध्ये लोहगड जिंकूनघेतला.

या किल्ले मोहिमेत औरंगजेबाने १७०० ते १७०४ या चार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील लहान-मोठे असे १५ किल्ले ताब्यात घेतले. त्यांपैकी फक्त तोरणा किल्ला त्यांनी लढून घेतला. बाकीचे मोठ्या रकमा देऊन कबजात आणले. महत्त्वाची गोष्ट अशी की, ते सर्व किल्ले औरंगजेबाची पाठ वळताच मराठ्यांनी फिरून पुन्हा एकदा जिंकून घेतले. मोगल खचले, आपल्याला मराठ्यांविरुद्ध आपला देवच वाचवू शकेल, अशी काहीशी त्यांची समजूत झाली. त्यांना नुसता किल्ला अथवा मुलूख जिंकून काहीही फळ मिळत नव्हते. जिंकलेल्या मुलखावर मोगल जम बसवू शकत नव्हते. मराठ्यांनी मोगलांचा पूर्णपणे कणा मोडला. मराठ्यांविरुद्ध २५ वर्षे लढून औरंगजेब हैराण झाला. त्याचे मराठ्यांविरुद्धचे युद्धच अखेर त्याच्या नाशास कारणीभूत झाले.

संदर्भ :

  • गर्गे, स. मा. करवीर रियासत, कोल्हापूर, २०१७.
  • पगडी, सेतुमाधवराव, अहकामे आलमगिरी, मुंबई, १९९३.
  • पगडी, सेतुमाधवराव, बहु असोत सुंदर, मुंबई, १९९३.
  • पगडी, सेतुमाधवराव, श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ, मुंबई, २०००.
  • पवार, आप्पासाहेब, ताराबाईकालीन कागदपत्रे खंड १, कोल्हापूर, २०१२.
  • सरदेसाई, गोविंद सखाराम, मराठी रियासत खंड २ (उग्रप्रकृती संभाजी, स्थिरबुद्धी राजाराम), मुंबई, २०१७.

                                                                                                                                                                                      समीक्षक : विद्याचरण पुरंदरे