लठ्ठे, आण्णासाहेब बाबाजी : (९ डिसेंबर १८७८ — १६ मे १९५०). कोल्हापूर संस्थानचे दिवाण व मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री. त्यांचा जन्म बाबाजी नरहर लठ्ठे व आदुबाई लठ्ठे या दांपत्यापोटी कुरुंदवाड येथे झाला. त्यांना पाच मुले व दोन मुली होत्या. आण्णासाहेबांचे चौथीपर्यंतचे शिक्षण कुरुंदवाड येथे झाले. १८९६ मध्ये ते सांगली हायस्कूलमधून मॅट्रिक पास झाले.  त्यानंतर राजाराम कॉलेज, कोल्हापूर व डेक्कन कॉलेज, पुणे येथून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठातून इंग्रजी व अर्थशास्त्र या विषयांतील एम. ए. (१९०५)  व पुण्याच्या लॉ कॉलेजमधून एल. एल. बी. ही पदवी (१९१६) त्यांनी पूर्ण केली.

आण्णासाहेब लठ्ठे छ. शाहूंच्या वसतिगृह चळवळीमुळे कोल्हापूरकडे आकर्षित झाले. १८९९ ला स्थापन झालेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. ‘क्वीन व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग’ व ‘दिगंबर जैन बोर्डिंग’ यांच्या स्थापनेत त्यांनी छ. शाहूंना मदत केली (१९०१; १९०२). जैन समाजातील धार्मिक रूढी, परंपरा व वाईट चालीरीतींना विरोध करून महिला परिषद, स्त्रीशिक्षण विभाग आणि जैन श्राविकाश्रम यांच्या माध्यमातून स्त्रियांना शिक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छ. शाहूंची वसतिगृह चळवळ जैन वसतिगृहांच्या माध्यमांतून महाराष्ट्र व कर्नाटकात पसरवली. कोल्हापूर संस्थानात ॲक्टीग सिटी मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांनी काम केले (१९१०-११). १९०८ ला दलितांच्या शिक्षणप्रसारासाठी ‘मिस क्लार्क होस्टेल’ ची स्थापना झाली, त्यावेळी ‘सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ डिस्प्रेड क्लास’ या दलितांसाठी काम करणाऱ्या संस्थेची स्थापना केली. शिक्षणाधिकारी असताना (१९११-१४) परंपरागत शिक्षकपद्धतीद्वारे शिक्षकांना वतने देवून त्यांच्यावर बहुजन समाजाच्या शिक्षणाची जबाबदारी सोपवली. अशिक्षित पाटलांना गावच्या कारभारासाठी शहाणे करण्यासाठी ‘पाटलांची शाळा’ हा अभिनव प्रयोग सुरू केला (१९११). वैदिक शाळा, शेतकी शाळा, वसतिगृह चळवळ, मुलामुलींना शिष्यवृत्ती व फीमाफी, शाळातपासणी पद्धती या लठ्ठेंनी सुरू केलेल्या योजना. सत्यशोधकीय तत्त्वज्ञान शिक्षणाच्या माध्यमातून समाजात रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केला. १९१४ ला कोल्हापुरात किंग एडवर्ड यांच्या पुतळ्यास डांबर फासण्याच्या प्रकरणानंतर मात्र ते बेळगावात राहून वकिलीचा व्यवसाय करू लागले.

कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात व ठिकठिकाणी सत्यशोधकीय परिषदा भरविण्यात लठ्ठेंचा पुढाकार होता. मद्रास प्रांतात ‘जस्टीस पार्टी’ चे मुखपत्र म्हणून जस्टीस या वृत्तपत्राप्रमाणे मुंबई प्रांतात ब्राम्हणेतर समाजाचे डेक्कन रयत हे वृत्तपत्र ब्राम्हणेतरांची मते ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळावीत म्हणून ते इंग्रजीत चालवीत (१९१८-२०). हा ब्राम्हणेतर पत्रकारितेचा उगम होता. १९२० मध्ये हुबळी येथे त्यांनी राजकीय व सामाजिक परिषदेचे आयोजन केले. सत्यशोधक समाजाचे परिवर्तन झाल्यावर १९२० च्या मध्यवर्ती कायदेमंडळाच्या निवडणुकीत ते बेळगाव जिल्हा ब्राम्हणेतर पक्षातर्फे मध्यवर्ती कायदेमंडळात निवडून गेले. तेथे त्यांनी आपली मते आग्रहाने मांडली. केंद्रीय कायदेमंडळात त्यांनी ‘जोशी वतन बिल’ मांडले (१९२१); परंतु ते नामंजूर झाले. हेच बिल पुढे १९२६ साली रावसाहेब बोले यांनी मुंबई कायदेमंडळामध्ये मान्य करून घेतले.

लठ्ठेंनी छ. राजाराम महाराजांच्या कालखंडात कोल्हापूर संस्थानाचे दिवाण म्हणून काम केले (१९२६-३१). छ. शाहू महाराज व छ. लक्ष्मीबाई राणीसाहेब यांचे पुतळे बसविले. कोल्हापूर सहकारी बँकेची निर्मिती केली. ब्रिटिश हिंदुस्थानातील ‘बॉम्बे नगरपालिका कायदा’ (१९२५) दुरुस्त्यांसाह तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा (१९२६ ) त्यांनी लागू केला. पहिल्या गोलमेज परिषदेसाठी संस्थानिकांचे सल्लागार म्हणून ते लंडनला गेले (१९३०-३१).

१९३६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९३७ मध्ये मुंबई प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकीत ते बेळगावमधून निवडून आले. १९३७ मध्ये काँग्रेस मंत्रीमंडळामध्ये ते अर्थमंत्री होते. ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी पतपुरवठा करणाऱ्या व मालाची खरेदी–विक्री करणाऱ्या पतसंस्था काढून त्यांच्यामार्फत ग्रामीण विकास साधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने काँग्रेस मंत्रीमंडळाने राजीनामा दिला. त्यामुळे ते पुन्हा बेळगावमध्ये वकिली करू लागले.

१९४० नंतर छ. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर कोल्हापूर संस्थानातील वारसा प्रकरणात लठ्ठेंनी लक्ष घालून देवासच्या विक्रमसिंह पवारांना छ. शहाजी म्हणून दत्तक घेण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. १९३७ पासून कोल्हापूरात प्रजापरिषद चळवळ सुरू झाली होती. संस्थानातील प्रजापरिषदेच्या राजकारणात माधवराव बागल व रत्नाप्पा कुंभार यांच्यात मतभेद होते. वल्लभभाई पटेलांनी भारतातील सर्व संस्थानांचे विलीनीकरण करण्याचे ठरविले होते व त्यांना रत्नाप्पा कुंभार सारख्या नेत्यांचे सहकार्य होते. माधवराव बागलांचा गट विलिनीकरणाचा विरोध करत होता. त्यांच्या बाजूने लठ्ठे व छ. शहाजी होते. त्यांनी मध्य भारतातील संस्थानिकांशी चर्चा सुरू ठेवली होती. म. गांधींच्या हत्येनंतर कोल्हापूर संस्थानातील जाळपोळीला सुरुवात झाली. या दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या कोयाजी आयोगाने मंत्रीमंडळास दोषी ठरविले. मार्च १९४८ ला वल्लभभाई पटेल व व्ही. पी. मेनन यांनी कोल्हापूरला भेट दिली. वल्लभभाई पटेल यांनी कॅ. नंजाप्पा यांना कोल्हापूर संस्थानचे प्रशासक म्हणून नियुक्त केले. कॅ. नंजाप्पानी लठ्ठेंना कोल्हापूर सोडण्यास भाग पाडले (१९४८). त्यानंतर ते बेळगावातील स्थानिक राजकारणात गुंतून राहिले. पुढे कोल्हापूर संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले (१९४९).

लठ्ठे यांचे इंग्रजी, मराठी, कन्नड भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. जैन धर्माचा परिचय (१९०५), हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याचा उदय (१९१४), मेमरिज ऑफ हिज हायनेस छ. शाहू महाराज ऑफ कोल्हापूर खंड १ व २ (१९२४), छ. शाहू महाराजांच्या आठवणी (१९२५), भारतीय संस्थानांचे प्रश्न (इंग्रजी-१९२९; मराठी-१९४५), जगाची संघटित राज्यघटना (१९३१), माझ्या विलायतेच्या आठवणी (१९३४) हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ होत.

त्यांना ब्रिटिश सरकारने ‘रावबहादूर’ (१९२४), छ. राजाराम महाराजांनी ‘दिवाणबहादूर’ (१९३०) व छ. शहाजीराजांच्या राज्यरोहणादिवशी त्यांनी केलेल्या कोल्हापूर दरबारच्या सेवेनिमित्त ‘करवीररत्न’ (१९४७) हे किताब देण्यात आले.

बेळगाव येथे हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • फडके, य. दि. आण्णासाहेब लठ्ठे, पुणे, १९८९.
  • मद्वाण्णा , य. दा. स्व. आण्णासाहेब लठ्ठे : जीवन व कार्य, सांगली, १९७९.

समीक्षक : अरुणचंद्र पाठक