कोठारी, वालचंद रामचंद :  (१३ सप्टेंबर १८९२ — १० फेब्रुवारी १९७४). संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय नेते, प्रतिभाशाली विचारवंत, प्रसिद्ध साहित्यिक आणि समाजहितैषी पत्रकार. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील बावी (तालुका माढा) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आबाचंद व आईचे नाव जमुनाबाई. त्यांना चार बहिणी व दोन भाऊ होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पंढरपूर येथे झाले. तेथील व्हिक्टोरिया ज्युबिली हायस्कूलमधून १९०८ मध्ये ते मट्रिकची परीक्षा पास झाले. १९०९ मध्ये त्यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामधून व पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर ते मुंबई विद्यापीठाची बी. ए. परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. याच काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण व मनोभूमिका तयार झाली. सरकार दरबारी नोकरी करावयाची नाही हे त्यांनी ठरविल्याने ते पत्रकारितेकडे वळले. १९१५ मध्ये ते कुंटुंबासह पुण्यात राहावयास आले. त्यांच्या पत्नीचे नाव आवलबाई. या दांपत्यास पुष्पा, वासंती आणि सरोज या तीन मुली.

पुण्यामध्ये आल्यावर महात्मा जोतिबा फुले यांची सत्यशोधक चळवळ व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची डिस्प्रेड क्लासेस मिशन या चळवळींचा प्रभाव त्यांच्यावर पडला. १९११ मध्ये छ. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात पुनर्जीवित झालेल्या सत्यशोधक चळवळीतील सुरुवातीच्या नेत्यांपैकी कोठारी हे एक होते. १९१६ ला निपाणीच्या सत्यशोधक परिषदेत ‘डेक्कन रयत संघाची’ स्थापना झाली. वऱ्हाड, खानदेश प्रांतांत अनेक सभा घेऊन चळवळीचा प्रचार करण्यासाठी कोठारींनी पुण्यातून कार्य केले. मे १९१८ मध्ये त्यांनी पंढरपूरमध्ये विठोबा मंदिरासमोर अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. डॉ. हेराल्ड मॅन यांच्या अध्यक्षतेखाली शिवराम जानबा कांबळे यांच्या सहकार्याने अस्पृश्य समाजात शैक्षणिक कार्य करण्यासाठी ‘डिस्प्रेड क्लास कमिटीची’ पुणे येथे स्थापना केली (१६ एप्रिल १९२१). तसेच बावी येथे आपल्या वाड्यात पहिल्या अस्पृश्य वसतिगृहाची सुरुवात केली. पुढे त्यांनी पुणे जैन बोर्डिंगचे सन्मान्य सचिव म्हणून कार्य केले (१९१९-२५).

‘प्रांताचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती असावा व विद्येत मागासलेल्या वर्गांना स्वतंत्र मतदारसंघातून प्रतिनिधित्व मिळावे’ यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या विषयावर भारतसेवक या मासिकातून त्यांनी अनेक लेख लिहिले. अस्पृश्य वर्गात त्यांच्या हक्काची जाणीव निर्माण करून त्यांना जागृत व संघटित करण्यासाठी सत्यशोधक मतांचा पुरस्कार करणारे जागरूक हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. १९१९ च्या कायद्याने स्वतंत्र मतदारसंघ नाकारले गेले, तेव्हा ब्राम्हणेतरांनी सरकारवर अवलंबून राहू नये असे मत त्यांनी डेक्कन रयत (१९१८-१९२०) या इंग्रजी वृत्तपत्रातून मांडले.

सरकारविरोधी धोरण घेण्याचे कोठारींचे मत ब्राम्हणेतर पक्षातील नेतृत्वाला मान्य नव्हते. त्यामुळे कोठारी न. चिं. केळकरांच्या ‘स्वराज्य पक्षात’ सामील झाले. १९२३ च्या निवडणुकीत ते सोलापूरमधून स्वराज्य पक्षातर्फे कायदेमंडळात निवडून गेले. १९२५ साली अर्थविषयक समितीवर त्यांची निवड झाली. सरकारी अधिकारपदे स्वीकारण्यावरून मोतीलाल नेहरू आणि न. चिं. केळकर यांच्यातील मतभेदाने ते केळकरांबरोबर पक्षातून बाहेर पडले (१९२६) आणि बॅ. जयकर, बापूजी अणे, दादासाहेब खापर्डे, मुंजे यांच्यासोबत प्रतिसहकार पक्षात कार्यरत राहिले. पुढे १९३३ मध्ये बॅ. रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या लोकशाही स्वराज्य पक्षात ते सामील झाले. या पक्षातर्फे १९३७ च्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून ते पराभूत झाले. १९३८ मध्ये प्रभात या वृत्तपत्राची मालकी घेतल्यावर त्याला लोकप्रियता मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच पुणे शहर व जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी ‘पुणे पत्रकार संघाची’ स्थापना केली (१९४०).

कोठारींनी प्रभातच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीकरिता २५८ अग्रलेख लिहून वैचारिक योगदान दिले (१९५६-६०). मुंबई वेगळी करून ती गुजराती धनिकांच्या ताब्यात देण्याच्या सरकारी धोरणास प्रभातमधून विरोध करण्यासाठी ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सामील झाले. सेनापती बापट, प्रबोधानकार केशव सीताराम ठाकरे, भाई माधवराव बागल, आचार्य अत्रे आणि वा. रा. कोठारी या पाच जणांचा समूह ‘महाराष्ट्र पंचक’ म्हणून प्रसिद्धीस आला. १९५६ ला द्विभाषिक मराठी राज्याचा ठराव होऊन केंद्र व मुंबई राज्यात काँग्रेसचे सरकार आले. ‘मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे’ हे केंद्राला प्रांतिक सरकारने खंबीरपणे सांगावे, यासाठी ते आग्रही होते. त्यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळे काँग्रेस नेतृत्वाची नाराजी त्यांनी ओढवून घेतली. तसेच १९५७ च्या मुंबई राज्य निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे करून ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ने १०० जागा जिंकल्या. बेळगाव – कारवारसह संयुक्त महाराष्ट्र हे त्यांचे ध्येय होते. आपल्या ध्येयनिष्ठ लेखणीने व निर्भयतेने त्यांनी हा प्रश्न सतत जिवंत ठेवून महाराष्ट्रातील जनतेत जागृती निर्माण केली. १९५२ मध्ये डॉ. परुळेकरांच्या ‘नागरी संघटने’ बरोबर, तर १९५५ ते १९६१ या काळात ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ बरोबर पुणे नगरपालिकेच्या राजकारणात प्रभातमधून सहभाग दिला. स्त्री – पुरुष भेदभाव न करता कर्तव्यदक्ष महिलेला नगराध्यक्षपद मिळावे, या मताचे ते होते.

गोवा मुक्ती संग्रामात जागरूक पत्रकार म्हणून सत्याग्रहींच्या बाजूने ते सतत लेखन करीत. आंतरराष्ट्रीय प्रश्न वाटाघाटीने सोडवावयाचे ही नेहरूंची भूमिका व पंचशील तत्त्वांचा आग्रह यांमुळे भारतातील सीमावर्ती नागरिकांवर पाकिस्तानकडून अत्याचार होतात, असा आरोप त्यांनी प्रभातमधून केला.

कोठारी यांच्या वृत्तपत्रीय कारकिर्दीच्या पहिल्या भागामध्ये (१९१५ ते १९३७) सहस्त्रकर (१९१५), जागरूक (१९१७), डेक्कन रयत (१९१८), राष्ट्रमत (१९३३) तर दुसऱ्या भागात (१९३८ ते १९६०) प्रभात (१९३८), पुना डेली न्यूज (१९५०, इंग्रजी), सायंदैनिक प्रभात (१९५६), शलाका, चांदणी यांचा समावेश होतो. यांतील काही वृत्तपत्रे अल्पजीवी ठरली. वयाच्या एकविसाव्या वर्षापासून त्यांनी साहित्यनिर्मितीस सुरुवात केली. गीतारहस्यातील टीकात्मक निबंध (१९१५), गीतारहस्यसार (१९५८), शिवचरित्र (१९५९), जुन्या आठवणी (१९७१), नाट्यविषयक व इतर लेख (१९७३), प्राचीन ग्रीस व प्राचीन रोम (१९७४), फ्रेंच राज्यक्रांती (अप्रकाशित) हे त्यांचे काही उल्लेखनीय ग्रंथ. त्यांच्या स्त्रीविषयक लिखाणामध्ये सुरस ग्रंथमालेमध्ये प्रकाशित झालेल्या भाषांतरित कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांनी जी. डब्ल्यू. एम. रेनॉल्डस्च्या लव्हज ऑफ हेरम या इंग्लंडमध्ये लोकप्रिय असलेल्या कादंबरीचे गोषातील सुंदर स्त्रिया (१९१३) या नावाने मराठीत भाषांतरित केले. निशाचराचा प्रेमविलास, १९१५ (रॉबर्ट मेकॉयर), पतिपत्नी प्रेम, १९१४ (रवींद्रनाथ टागोरांची चोखेर बाली), इंदिरा (स्वलिखित, १९१४) या त्यांच्या कादंबऱ्या घटनाप्रधान असून त्यांमध्ये बालविवाह व जरठ-बाला विवाह यांचा निषेध तसेच प्रौढविवाह, विधवाविवाह व स्त्रीशिक्षण यांचा पुरस्कार करणाऱ्या आहेत. लॉ ऑफ कॉन्ट्रक्ट, लॉ ऑफ प्रापर्टी, लॉ ऑफ एव्हिडेंस  (१९३१) ही त्यांच्या प्रगल्भतेची साक्ष देणारी पुस्तके कायदेविषयक प्रसिद्ध आहेत.

पुणे येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • केळकर, न. चिं. केळकर समग्र वाङ्मय, खंड – ५, पुणे, १९३८.
  • मंगुडकर, मा. प. महाराष्ट्रातील ब्राम्हणेत्तर चळवळ : काही विचार, पुणे,१९७३.
  • शहा, वष्ट, राशिनकर संपा., प्रभातकार : वा. रा. कोठारी विचार व कार्य, पुणे,१९९३.

समीक्षक : अरुणचंद्र पाठक