देसाई, दाजीबा बळवंतराव : (१५ सप्टेंबर १९२५ – १९ मार्च १९८५).  शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यातील एक ज्येष्ठ नेते, विचारवंत आणि पत्रकार. भाई दाजीबा देसाई या नावानेही ते परिचित. त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील माडीगुंजी येथे झाला. आईचे नाव यमुनाबाई व वडिलांचे नाव बळवंतराव. देसाई यांचे मूळ घराणे गोव्यातील. त्यांनी आपले चौथीपर्यंतचे शिक्षण आजोळी, तर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण उचगाव जि. बेळगाव येथील जी. ए. हायस्कूल व मराठा मंडळ हायस्कूलमधून पूर्ण केले. उचगाव हे तत्कालीन कुरुंदवाड संस्थानात येत होते. मराठा मंडळाच्या हायस्कूलमधून ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. बेळगावमध्ये लिंगराज कॉलेजमध्ये उच्च शिक्षण सुरू असताना त्यांनी १९४२ च्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांच्या नावाचे अटक अधिपत्र (वॉरंट) निघाल्याने ते कोल्हापूरमध्ये आले. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९४९ मध्ये त्यांनी बी. ए. ची पदवी पूर्ण केली. पुढे त्यांनी बेळगाव येथील राजा लखमगौंडा कॉलेजमधून कायद्याची पदवी संपादन केली (१९५४). १८ जून १९५२ रोजी शे.का.प.चे नेते व्ही. एस. पाटील यांच्या लीला ह्या कन्येशी त्यांचा विवाह झाला.

देसाई हे विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक व स्वातंत्र्यचळवळीमध्ये सक्रीय होते. १९४४ मध्ये त्यांनी उचगाव येथे रात्रशाळा व प्रौढ शिक्षण वर्ग सुरू केले. या काळात त्यांनी कुरुंदवाड संस्थान थोरले (सीनियर स्टेट) येथे रयत सभेची संघटना उभारून सचिव (सेक्रेटरी) म्हणून काम पाहिले. १९४४ मध्ये त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोल्हापूरमधील दक्षिणी संस्थान विलीनीकरण चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला (१९४५-१९४७). पुढे ते काँग्रेसमधून बाहेर पडून शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत सक्रिय सहभागी झाले (१९४८). शे.का.प.च्या स्थापनेनंतर मौजे कोवाड ता. चंदगड येथे शेतकरी परिषद संपन्न झाली, यात त्यांनी ‘कसेल त्याची जमीन’ ही मागणी प्रकर्षाने मांडली. १९५४ ते भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस झाले. या काळात मुंबई सरकारने ‘कसेल त्याची जमीन’ या योजने अंतर्गत कुळ कायदा दुरुस्ती विधेयक आणले. हे विधेयक संस्थानिक व जमीनदारांसाठी असून यामध्ये कुळांच्या हक्कांचे संरक्षण नाही यावरून त्यांनी या विधेयकाला विरोध दर्शविला. ‘जमीन कोणाची? कसणार्‍याची? की ती विकत घेणार्‍याची?’ या आशयाचे पुस्तक लिहून त्यांनी कुळांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी लढा सुरू केला. याबरोबरच शेतकर्‍यांच्या शेतमालास किफायतशीर हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी विविध लेख लिहिले. जनसत्ता, राष्ट्रवीर, संग्राम आदी नियतकालिकांतून त्यांनी विपुल लेखन केले.

देसाई यांनी १९५५ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती व महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या स्थापनेत पुढाकार घेतला. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सहभागी झाल्यामुळे मुंबई सरकारने जानेवारी १९५६ त्यांना स्थानबद्ध केले. पुढे त्यांनी अनेक महिने भूमिगत कार्य केले. ९ जून १९५६ रोजी त्यांना अटक करून हिंडलगा तुरुंगात टाकले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, मात्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमा-लढा सुटला नाही. बेळगाव, कारवारचा प्रश्न अधांतरीच राहिला. देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याबरोबर गोवामुक्ती आंदोलनातही सहभाग घेतला. १९६७ मध्ये कर्नाटक सरकारने सीमा भागातील १५० गावांमधून सारा वसूल सुरू केला, तेव्हा या विरोधात त्यांनी लढा सुरू केला. तसेच सीमा भागातील मराठी भाषिक मुलांसाठी ‘दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळा’ची स्थापना केली. बेळगाव येथे मराठी माध्यमाचे ज्योती कॉलेज स्थापन केले. पुढे त्यांची शेतकरी कामगार पक्षाकडून राज्यसभेवर निवड झाली (१९६०-६६). तसेच १९७७ मधील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ते कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले.

बेळगाव येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • पाटील, एन. डी.; पाटील, राजाभाऊ, संपा. भाई दाजीबा देसाई विचारधन, खंड १, भाई दाजीबा देसाई प्रतिष्ठान, बेळगाव, २०१०.
  • पाटील, एन. डी.,  संपा., भाई दाजीबा देसाई स्मृतिगंध, भाई दाजीबा देसाई समारोह समिती, बेळगाव, २०१०.

समीक्षक : अरुण भोसले