देसाई, सदाशिव शंकर : (२५ जुलै १९१७ – ३१ मे १९९६). विख्यात साहित्यिक, पत्रकार आणि  इतिहास संशोधक. स. शं. देसाई या नावाने परिचित. त्यांचा जन्म गोवा राज्यातील बाळ्ळी-पाळोळे, काणकोण येथे झाला. प्राथमिक शिक्षण बाळ्ळी, पाळोळे व काणकोण येथे मराठी माध्यमातून झाले. पुढील शिक्षण लिसेंव (पोर्तुगीज शिक्षण) मडगांव, पणजी येथे झाले. पोर्तुगीज शिक्षण अनारोग्यामुळे अर्ध्यावरच सोडावे लागले, मात्र लिसेंवचे शिक्षण घेत असताना पत्रकार दत्तात्रय व्यंकटेश पै यांच्याशी त्यांचा संपर्क आल्याने आपणही पत्रकारितेच्या क्षेत्रात उतरावे असे त्यांना वाटू लागले. बालपणापासून त्यांना वाचनाची आवड असल्याने मराठी, पोर्तुगीज, फ्रेंच व इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व असल्याने यातील साहित्याचे भरपूर वाचन केले.

देसाई पत्रकार होण्यासाठी पुण्यामध्ये आले (१९४४). नवा काळ  या वर्तमानपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर लोकशक्ती, समाचार, प्रभात, संयुक्त महाराष्ट्र  इ. दैनिकांत त्यांनी उपसंपादक म्हणून काम केले. पत्रकार म्हणून ते १५ वर्षे या क्षेत्रात होते. स्तंभलेखन व टीकालेखन हा त्यांच्या पत्रकारितेचा आवडीचा विषय होता. नवभारत, सुषमा, किर्लोस्कर, मनोहर, युगवाणी, यशवंत, दूधसागर  यांसारख्या नियतकालिके आणि मासिकांतून त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले. देसाई यांचा पंडित महादेवशास्त्री जोशी यांच्याशी संपर्क आला (१९५७) आणि ते भारतीय संस्कृती कोशमंडळात सामील झाले. संशोधन सहायक म्हणून १९६४ पर्यंत त्यांनी कार्य केले. भारतीय संस्कृती कोशमंडळात काम करीत असले तरी त्यांचे लेखन मात्र चालू होते. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या काळात त्यांची इतिहास विभागात संशोधन सहयोगी म्हणून नियुक्ती झाली (१९६४). तेथून १९७४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

देसाई यांनी इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद केला, तसेच साहित्यावर समीक्षात्मक लेखन केले. कला मासिकात त्यांची पहिली कथा ‘आयुष्याचा वसंत’ प्रसिद्ध झाली. इभ्रत  कादंबरीमुळे त्यांचा साहित्यक्षेत्रात नावलौकिक झाला (१९५२). पुढे या कादंबरीवर आधारित कुलदैवत  हा चित्रपट निघाला. त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : टॉलस्टॉयच्या स्मृती (१९४९), मानवी इतिहासातील महान क्षण (१९५६), मी (१९५७), आहुती (१९५९), अब्बास अली (१९६१), दुसरे महायुद्ध (१९६१), रणांगणावर अर्थात स्टॉलिनग्राडची लढाई (१९६२), सर विन्स्टन चर्चिल (१९६२), विजय कमान, शेवटचा सेनापती (चरित्र-बापू गोखले-१९६३), कोंदणातील हिरे (१९६७), सिलबंद गाडी (१९६८), चंबळेच्या पलिकडे (१९६८), महापर्व (१९७२), कथा एका साम्राज्य संस्थापकाची (१९८२), अखेरची लढाई (१९८२), स्मृतिगंध (आत्मचरित्र १९८८) आणि डॉ. जिबलो गांवकर षष्ट्यब्दीपूर्ती गौरवग्रंथ (संपा.) (१९९०) इत्यादी. ऐतिहासिक कादंबऱ्यांमुळे देसाई यांना प्रसिद्धी मिळाली. चंबळेच्या पलीकडे, महापर्व आणि अखेरची लढाई या कादंबरी मालिकेतून त्यांनी मराठेशाहीच्या उत्थान-पतनाचा कालखंड अत्यंत प्रभावी रीत्या उभा केलेला आहे. ‘ग्रीक संस्कृतीचे क्रांतिकार्य’, ‘कादंबरीचे भवितव्य’, ‘इंग्रजी कविता: कालची व आजची’ या प्रदीर्घ स्वरूपाच्या लेखांतून देसाई यांचा वाङ्‌मयीन व्यासंग दिसून येतो.

देसाई यांनी पेशवेकालीन पत्रव्यवहाराचे केलेले संकलन आणि पोर्तुगीज इतिहासाच्या साधनांचे मराठीत केलेले भाषांतर हे बहुमोल केले. डॉ. पांडुरंग स. पिसुर्लेकर व डॉ. आंतॉनियु बेर्नाद द ब्रागांस पेरैरा यांनी संपादित केलेल्या मराठ्यांच्या इतिहासासंबंधीच्या पोर्तुगीज दस्तऐवजांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. यांमध्ये मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १ (१९६८), मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २ (१९७४), शिवशाही पोर्तुगीज कागदपत्रे (१९७७), करवीरचे छत्रपती आणि पोर्तुगीज (१९७८), पोर्तुगीज-मराठा संबंध (१९८९) इत्यादी ग्रंथ महत्त्वाचे आहेत. अप्पासाहेब पवार यांनी संपादित केलेल्या ताराबाईकालीन कागदपत्रे, जिजाबाईकालीन कागदपत्रे  या ग्रंथांसाठी पोर्तुगीज कागदपत्रांचे अनुवादन करण्याचे मौलिक सहकार्य देसाई यांनी केले. केंद्र सरकारच्या प्रसिद्धीखात्याने गोवा, दमण, दीव आणि दादरा नगर हवेली  या प्रदेशाची माहिती देणारे छोटेसे पुस्तक त्यांच्याकडून लिहून घेतले. देसाई यांच्या लेखनकार्याची दखल घेऊन त्यांची हूज हू ऑफ हिस्टोरियन इन इंडिया  मध्ये एक इतिहासकार म्हणून नोंद झाली. मराठी अकादमीने त्यांना मानद सदस्यत्व बहाल करून त्यांचा गौरव केला. १९८७ मधील गोमंतक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९८२ पासून ते महारथी  या नियतकालिकाचे संपादक म्हणून अनेक वर्षे काम करत राहिले.

पाळोळे (गोवा) येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • कोलवाळकर, रमेश. संपा., लोकभूमी (स. शं. देसाई स्मृती विशेषांक), वर्ष २८ वे, अंक १८, पणजी, २०१४.
  • देसाई, स. शं. स्मृतीगंध, प्रकाशक दिलीप गवळी, कोल्हापूर, १९८८.

                                                                                                                                                                                      समीक्षक : अवनीश पाटील