ग्लेन मर्कट

ग्लेन मर्कट हे ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट व २००२ चे प्रीझ्कर आर्किटेक्चर पुरस्काराचे विजेते आहेत. ते एक आधुनिकतावादी, एक निसर्गवादी, एक पर्यावरणवादी, मानवतावादी, अर्थशास्त्रज्ञ आणि पर्यावरणशास्त्रज्ञ आहेत व या सर्व विशिष्ट गुणांचा समावेश, आर्किटेक्ट म्हणून, ते आपल्या प्रकल्पांमध्ये करतात. त्यामुळे ते एकटेच, बिना कर्मचारी काम करतात व केवळ निवडक, ऑस्ट्रेलिया मधलेच प्रकल्प पत्करतात.

सिम्पसन-ली हाऊस (१९६२), व्हेरूंगा, शॉर्ट हाऊस, केम्पसी (१९८०), मॅग्नी हाऊस (१९८४), आर्थर आणि इवॅान बॉयड एज्युकेशन सेंटर, वेस्ट केम्बेवार (१९९९), वॉल्श हाऊस, कांगारू व्हॅली (२००५),ऑस्ट्रेलियन इस्लामिक सेंटर, मेलबर्न, (२०१६), डोनाल्डसन हाऊस, सिडनी, (२०१७) ही मर्कट यांचे काही प्रसिद्ध प्रकल्प

सिम्पसन-ली हाऊस

ग्लेन मार्कस मर्कट यांचा जन्म २५ जुलै १९३६ रोजी लंडन येथे झाला. त्यांचे पालक मूळचे ऑस्ट्रेलियन होते. ग्लेनच्या वडिलांनी ‘जीवनाच्या कुरूपते’ पासून पळण्यासाठी लौकर घर सोडले व वेगवेगळी कामे करु लागले. प्रथम विश्वयुद्ध संपल्यानंतर न्यू गिनियाला ऑस्ट्रेलियन मँडेट प्रदेश घोषित केले गेले होते व ग्लेनच्या वडिलांची रवानगी तिथे करण्यात आली. त्यांनी तिथे सुतारकाम,  लाकूड कापण्याच्या कारखान्यात नोकरी, नौका बनविणे, सोन्याच्या खनिज साठ्यांचा शोध घेणे ई. बरेच उद्योग केले. सोन्याच्या खनिज साठ्यांचा शोध घेण्यात त्यांना काही काळानंतर यश मिळाले. मर्कटने आपल्या आयुष्याची पहिली पाच वर्षे पापुआ न्यू गिनीत घालवली. तिथेच मर्कटची प्रथम, स्थानिक, साध्या, आर्किटेक्चर भाषेशी ओळख झाली व त्यांच्यामध्ये साध्या, आदिम आर्किटेक्चरप्रती कौतुक विकसित झाले. ग्लेनवर त्यांच्या वडिलांनी बांधलेल्या न्यू गिनियातील घराचा खूप प्रभाव आहे. हलक्या वजनाचे, पत्र्याचे छत असलेले व पावसाचे पाणी, सरीसृप तसेच धोकादायक स्थानिक लोकांकडून संरक्षणासाठी घर जमीनीपासून वर उचलले होते. दुसऱ्या महायुद्धात, येणार्‍या जपानी सैन्याचा भितीने, १९४१ मध्ये त्यांचे कुटुंब पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतले व सिडनी येथे स्थाइक झाले.

ग्लेनच्या वडिलांना आर्किटेक्चरमध्ये रस होता. आर्किटेक्चरल फोरम नावाचे मासिक ते अमेरिकेवरुन मागवत व त्यांतील आर्किटेक्ट्स व डिझाइन बद्दल ग्लेनशी चर्चा करीत. ग्लेनची सुद्धा आर्किटेक्चर मधील रुची वाढू लागली.

न्यू साउथ वेल्स विद्यापीठातून ग्लेन यांनी आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले व १९६१ मध्ये पदवीधर झाले. त्यांच्या जीवनावर विविध प्रकारचे प्रभाव असल्याचे मर्कट म्हणतात. सर्वात मोठा प्रभाव त्यांच्या वडिलांचा होता ज्यांच्याकडून त्यांना निसर्गाचे सौंदर्य आणि गुण याबद्दल शिकायला मिळाले. पापुआ न्यू गिनी, तिथली आदिवासी संस्कृती, फिलिप जॉनसन, मीस व्हॅन डर रोहे, अल्वार अल्टो, फ्रॉइड, थोरो या सगळ्यांचाच त्यांच्यावर प्रभाव झाला आहे.

पदवी मिळवल्यानंतर ग्लेनने यूरोपचा दौरा केला. इथे पहिल्यांदा त्यांची अल्वार अल्टोच्या कामाशी ओळख झाली. ते १९६४ मध्ये सिडनीला परतले व अ‍ॅन्डर, मॉर्टलॉक, मरे आणि वूली यांच्या कार्यालयात काम करू लागले. पाच वर्षे या कार्यालयात काम केल्यानंतर १९७० मध्ये त्यांनी स्वत:ची प्रॅक्टिस स्थापित केली.

ऑस्ट्रेलियन इस्लामिक सेंटर, मेलबर्न.

त्यांची छोटी, परंतु अनुकरणीय प्रॅक्टिस विशिष्ट ऑस्ट्रेलियन स्वभाववृत्ती व पर्यावरण संवेदनशील डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. त्यांची वास्तुकला काळाच्या ओघात स्थिर राहिली आहे. ते मुख्यत: निवासी ईमारतींची निर्मिती करतात. त्यांच्या ईमारती आधुनिकता, संवेदनशीलता, स्थानिक कारागिरी, स्वदेशी रचना आणि निसर्गाचा आदर यांचे सुसंवादी मिश्रण असतात. त्या स्वभाववृत्तीने असामान्य असतात तरीही कुतूहलपूर्वक परिचित वाटतात. ‘माझी प्रॅक्टिस ऑस्ट्रेलिया व ऑस्ट्रेलियन लोकांच्या माझ्या ज्ञानावर आधारित आहे. मी इतर ठिकाणांसाठी डिझाइन करू शकतो, परंतु माझ्या स्वत: च्या संस्कृतीत काम करणे हे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे’ असे ते सांगतात.

त्यांची कामे शाश्वत/ सस्टेनेबल श्रेणीत, अत्यंत किफायतशीर आणि बहुआयामी असतात. मर्कट साठी शाश्वत आर्किटेक्चर त्यांच्या बांधकामाच्या साहित्याच्या निवडीतून (स्थानिक साहित्य) व स्थानिक हवामानाला प्रतिसाद देणारे डिझाइन यातून उत्पन्न होते. प्रचलित शाश्वत आर्किटेक्चर बद्दल ते म्हणतात की ‘अनेकदा ते शाश्वत नसते किंवा आर्किटेक्चरच नसते.’

व्याख्याता व प्राध्यापक म्हणून जवळजवळ प्रत्येक खंडातील वास्तुकलेच्या शाळांना मर्कट यांनी भेट दिली आहे. ‘शिकवणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी आर्किटेक्चर प्रॅक्टिस चा अनुभव व अध्यापन एकत्र करतो. जेव्हा मी जगाच्या इतर भागात शिकवितो, तेव्हा मी हस्तांतरणीय असे तत्त्वे शिकवितो. संस्कृती हस्तांतरणीय असू शकत नाही परंतु तत्त्वे आहेत.’ असे मर्कट म्हणतात.

त्यांना १९९२ मध्ये रॉयल ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे आर.ए.आय गोल्ड मेडल, १९९२ मधील अल्वार अ‍ॅल्टो पदक, १९९६ मध्ये ऑफिसर ऑफ दि ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचा  १९९८ मध्ये अध्यापनासाठी रिचर्ड न्यूट्रा पुरस्कार, १९९९ मध्ये रॉयल डॅनिश अकादमी ऑफ आर्किटेक्टचा ‘ग्रीन पिन’ पुरस्कार, २००१ मध्ये आर्किटेक्चर साठी थॉमस जेफरसन पदक, २००२ मध्ये प्रीझ्कर आर्किटेक्चर पुरस्कार, २००३ मध्ये केनेथ एफ. ब्राउन एशिया पॅसिफिक कल्चर आणि आर्किटेक्चर अवॉर्ड या पुरस्कारांनी गौरविले गेले आहे.

मर्कट म्हणतात ‘आर्किटेक्चरची कोणतीही कामे जी डिझाइन केली गेली आहेत, आर्किटेक्चरचे कोणतेही कार्य ज्यामध्ये अस्तित्त्वात येण्याची क्षमता आहे किंवा अस्तित्वात आहेत, त्याचा शोध लागला आहे. ते तयार केले गेले नाही. आपली भूमिका शोध घेणाऱ्याची आहे, निर्मात्याची नव्हे.’

संदर्भ :

समीक्षक : श्रीपाद भालेराव