सरीसृप वर्गातील स्क्वॅमाटा गणातील पायथॉनिडी (Pythonidae) कुलात अजगराचा समावेश होतो. हा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प (साप) आहे. तो मुख्यत्वेकरून आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया येथील उष्ण प्रदेशांत आढळतो. अजगरांच्या सुमारे ४० प्रजाती आहेत. गवताळ प्रदेश, घनदाट जंगले, खडकाळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश, दलदलीयुक्त प्रदेश, नदी-तलाव यांसारखे पाण्याचे प्रवाह असलेल्या जागा अशा विविध अधिवासात अजगर आढळतात. तसेच काही अजगर वृक्षवासी देखील असतात; उदा., मोरेलिया व्हिरिडिस (Morelia viridis) ही मूळची न्यू गिनी येथील जाती सामान्यपणे वृक्षांवर आढळते.
अजगरांच्या विविध प्रजातींनुसार आकार व रंग यांमध्ये विविधता आढळते. अजगरांमध्ये तपकिरी, काळपट, मातकट, हिरवा, पिवळा अशा विविध रंगांच्या फिकट ते गडद छटा आढळतात. याच्या अनेक जातींमध्ये फिकट रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद रंगाचे ठिपके, पट्टे किंवा रेषा असतात, तर काही जातींमध्ये शरीरावर ठिपके किंवा रेषा आढळत नाहीत. याच्या शरीरावर असंख्य लहान खवले असतात; परंतु, अधर (खालच्या) बाजूच्या मध्य रेषेवरील खवले इतर खवल्यांपेक्षा मोठे व आखूड असतात. शेपटी आखूड असते. श्रोणी (कमरेच्या आत असलेली हाडे व त्यांनी वेढलेली पोकळी) आणि मागचे पाय यांचे अवशेष गुदद्वाराच्या दोन्ही बाजूंना आढळतात. अजगराच्या बहुतेक जातींमध्ये ओठांवरील खवल्यांवर खळगा असतो. याचा उपयोग रात्रीच्या अंधारात असताना उष्ण रक्ताचे भक्ष शोधण्यासाठी होतो. यामुळे अजगराला तापमानातील फरक ओळखता येतो. डोळ्यांचा रंग पिवळा असून बाहुल्या उभ्या असतात. मादी नरापेक्षा मोठी असते.
अजगर बोजड व सुस्त असला तरी शिकार पकडताना तो अधिक वेगवान व आक्रमक होतो. भक्ष्य आटोक्यात येताच त्याच्या अंगावर झेप घेऊन त्याच्या अंगाभोवती विळखे घालून तो त्याला घट्ट आवळतो. भक्ष्याच्या फुप्फुसावर आणि हृदयावर दाब पडल्यामुळे ते गुदमरून मरते. अजगराच्या दोन्ही जबड्यांवर मागे वळलेले अणकुचीदार दात असतात. जबड्याचा एकदा डावा भाग, तर एकदा उजवा भाग आळीपाळीने पुढे सरकवत अजगर भक्ष्य गिळंकृत करतो. अजगर बिनविषारी असला तरी त्याने अनेक दातांनी चावा घेतल्यामुळे जखमेत विषबाधा होते. भक्ष्य गिळताना अजगर त्याच्या तोंडाकडील बाजूकडून सुरुवात करतो. अजगराच्या पोटात भक्ष्याची हाडेसुद्धा पचविली जातात. अजगराने हरिणासारख्या मोठ्या प्राण्याची शिकार केली तर तो पुढील सहा महिन्यांपर्यंत पुन्हा शिकार करत नाही. भक्ष्य गिळल्यानंतर त्याचे पचन करण्यासाठी अजगर उबदार जागा शोधून विश्रांती घेतात किंवा उंच झाडावरील फांदीला वेटोळे घालून बसतात. भक्ष्याच्या आकारानुसार त्याचा विश्रांती काळ कमी किंवा जास्त असतो. अजगर स्वत:च्या आकारानुसार उंदीर, पक्षी, लहान सरीसृप प्राणी (उदा., सरडे) तसेच माकड, डुक्कर, काळवीट, हरिण यांसारखे मोठे सस्तन प्राणी देखील खातात. ऑस्ट्रेलियातील अजगर सुसरींवरदेखील उपजीविका करतात.
अजगराच्या विणीचा कालावधी हा विविध जातींनुसार वेगवेगळा असतो. मादी एकावेळी पांढऱ्या रंगाची ८−१०० अंडी घालते आणि अंड्यांभोवती वेटोळे घालून ती उबविते व त्यांचे रक्षण करते. अंड्यांचा उबवण कालावधी ५०−७० दिवसांचा असतो. अंडी उबविण्याच्या काळात मादीच्या शरीराचे तापमान २०−४० से.ने वाढते. पिलांची लांबी जन्मत:सुमारे ६० सेंमी. असते.
भारतीय अजगर (Indian python) : हा अजगर भारतीय उपखंड तसेच आग्नेय आशियातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळतो. याला इंडियन रॉक पायथॉन (Indian rock python) किंवा एशियन रॉक पायथॉन (Asian rock python) असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव पायथॉन मोलुरस (Python molurus) असून अजगरांची पायथॉन ही एक मोठी प्रजाती आहे. याचा रंगमातकट किंवा फिकट पिवळसर असून त्यावर गडद तपकिरी रंगाचे साधारण वेडेवाकडे चौकोनी आकाराचे ठिपके असतात. सामान्यपणे याची लांबी सु. ३ मी.पर्यंत असते; परंतु, सु. ६-७ मी. लांब असलेले भारतीय अजगर आढळले आहेत. डोक्यावर दोन्ही बाजूंनी निघणाऱ्या फिकट पिवळसर रंगाच्या जाड रेषा नाकावर एकत्र येतात. बाणाच्या टोकाप्रमाणे याचा आकार दिसतो. हे अजगर सहसा पाण्याच्या ठिकाणी आढळून येतात. त्यांना उत्तम पोहता येते. २०१०–२०२० या दशकामध्ये अधिशोषण, अधिवास नष्ट होणे आणि अपुरे संवर्धन यांमुळे भारतीय अजगरांची संख्या सु. ३०% इतकी कमी झाल्याची आढळून आली. त्यामुळे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) या संस्थेने नजीकच्या काळात ही जाती धोक्यात येऊ शकते (Near threatened), असे जाहीर केले आहे. याचे आयुर्मान सु. ३० वर्षे असते.
बर्मीज् अजगर (Burmese python) : ही जाती मूळची दक्षिण-पूर्व आशियातील असून हिचे शास्त्रीय नाव पायथॉन बायव्हिटॅटस (Python bivittatus) असे आहे. याची लांबी साधारणपणे ३–५ मी. असते. याचा रंग फिकट पिवळसर असून त्यावर गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात. या ठिपक्यांच्या आकारात विविधता आढळते. डोक्यावरील बाजू गडद रंगाची असून डोक्यावरून फिकट रंगाच्या दोन रेषा डोळ्यांमधून नाकावर एकत्र येतात. याचा आकार ठळकपणे इंग्रजी V अक्षरासारखा दिसतो. तसेच तोंडाच्या दोन्ही कोपऱ्यापासून निघणाऱ्या फिकट रंगाच्या रेषा डोळ्यांपर्यंत येऊन पोहोचतात. शरीरावरील खवले गुळगुळीत असतात. आययूसीएन (IUCN) या संस्थेने ही जाती धोक्यातील जाती म्हणून घोषित केले आहे. २००९ पर्यंत बर्मीज् अजगर हे भारतीय अजगराची उपजाती म्हणून ओळखले जात होते. परंतु, सध्या ती एक स्वतंत्र जाती म्हणून ओळखली जाते. बर्मीज् अजगरांचा आयु:काल सु. २० वर्षे असतो. दक्षिण-पूर्व आशियात आढळणारी अल्बिनो बर्मीज् पायथॉन (पायथॉन मोलुरस बायव्हिटॅटस) ही पिवळ्या रंगाची जाती दिसायला खूप सुंदर असते.
फ्लोरिडा येथील बर्मीज् अजगर हे आक्रमक प्रजाती म्हणून ओळखले जातात. उच्च प्रजनन क्षमता, जलद लैंगिक विकास यांमुळे तेथील बर्मीज् अजगरांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे फ्लोरिडा येथील स्थानिक प्रजातींकरिता तसेच पर्यावरणीय परिसंस्थेकरिता ही जाती धोकादायक ठरली आहे. २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या आनुवंशिकी अभ्यासावरून फ्लोरिडातील बर्मीज् अजगर हे भारतीय अजगर व बर्मीज् अजगर यांची संकरित जाती आहे.
रेटिक्युलेटेड अजगर (Reticulated python) : अजगराची ही जाती मूळची दक्षिण व दक्षिण-पूर्व आशियातील असून हिचे शास्त्रीय नाव मलायोपायथॉन रेटिक्युलेटस (Malayopython reticulatus) आहे. हा जगातील सर्वांत मोठा अजगर आहे. उत्तर-पूर्व भारत, अंदमान-निकोबार बेटे, बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, इंडो-ऑस्ट्रेलियन द्विपसमूह (जावा, सुमात्रा इ.), फिलिपीन्स येथे त्याचा आढळ आहे. याची लांबी सु. १० मी. असते. याच्या शरीरावरील खवले मऊ व चकचकीत असतात. त्यामुळे हालचाल करताना याचे शरीर जाळीदार दिसते. यावरूनच याला रेटिक्युलेटस (Reticulate; जाळीदार) हे नाव पडले असावे. प्रदेशनिहाय याच्या रंगामध्ये विविधता आढळते. याला उत्तम पोहता येते. प्रौढ मादी एकावेळी १५−८० अंडी घालते. अंड्यांचा उबवण काल सु. ९० दिवसांचा असतो. याचे आयुर्मान सु. ३० वर्षांचे असते.
बोआ साप (Boa constrictor) हे दिसायला अजगरांसारखेच असतात. त्यामुळे अनेकदा बोआ साप व अजगर यांमध्ये फारकत करणे कठिण असते. असे असले तरी काही बाबतीत बोआ साप हे अजगरांपेक्षा वेगळे असतात. उदा., अजगर अंडी घालतात, तर बोआ साप पिलांना जन्म देतात. अजगराच्या डोक्यामध्ये बोआपेक्षा एक हाड अधिक असते. तसेच बोआपेक्षा अजगरामध्ये दातांची संख्या अधिक असते.
पायथॉन रेजियस (Python regius) ही जाती ३−६ फूट (सु. २ मी.) लांब असून दिसायला अतिशय सुंदर असते. धोका वाटल्यास किंवा घाबरलेल्या स्थितीत तो स्वत:भोवती वेटोळे करून घेतो, त्यावेळी त्याचा आकार चेंडूप्रमाणे दिसतो. त्यामुळे त्याला बॉल पायथॉन (Ball python) असेही म्हणतात. पाळीव प्राणी म्हणून हा सर्वांत लोकप्रिय अजगर आहे. याचा आयु:काल १५−२० वर्षांचा असतो.
आफ्रिकेतील पायथॉन सेबी (Python sebae) ही जाती ३−५ मी. लांब असून हा आफ्रिकेतील सर्वांत मोठा अजगर आहे. तसेच ऑस्ट्रेलियातील लिॲसिस मॅक्लोटी (Liasis mackloti) आणि लिॲसिस फसकस (Liasis fuscus) या जातींची लांबी सु. २ मी. असते. मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे पाणअजगर अँनॅकाँडा म्हणून ओळखले जातात. हे अजगर पिलांना जन्म देतात.
कातडी कमावण्यासाठी तसेच काही ठिकाणी विशेषेकरून आदिवासी भागांमध्ये खाण्यासाठी अजगरांची शिकार केली जाते, तर काही देशांमध्ये पाळीव प्राणी म्हणून अजगर लोकप्रिय आहेत. भारतात अजगर पाळणे, मारणे, तस्करी करणे तसेच त्याचे कातडे जवळ बाळगणे यांवर कायद्याने बंदी घातली आहे.
पहा : बोआ (प्रथमावृत्ती नोंद), साप (प्रथमावृत्ती नोंद).
संदर्भ :
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6157680/
- https://kids.britannica.com/students/article/Indian-python/311798
- https://animaldiversity.org/accounts/Python_molurus/
- https://www.floridamuseum.ufl.edu/florida-snake-id/snake/burmese-python/
- https://www.britannica.com/animal/reticulated-python
समीक्षक : मोहन मद्वाण्णा