विंकलर, विल्हेल्म : ( २९ जून १८८४ – ३ सप्टेंबर १९८४ )

विंकलर यांची कारकीर्द म्हणजे दोन मुख्य क्षेत्रातील कार्याचा संयोग आहे. शैक्षणिक संख्याशास्त्रज्ञ आणि ऑस्ट्रियन सरकारचे कार्यक्रम निदेशक अशी पदे त्यांनी भूषवली आहेत. त्यांचा जन्म प्राग मध्ये झाला. आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना वयाच्या तेराव्या वर्षापासूनच काम करावे लागले. त्यांनी कार्ल फ्रेडरिक (Karl Friedrich) युनिव्हर्सिटीत (आता चार्ल्स युनिव्हर्सिटी) प्राग येथे कायद्याचे शिक्षण घेतले. काही काळ वकिली केल्यावर ते ऑस्ट्रियन लष्करात एक वर्ष होते. तेथून परतल्यावर १९०९ मध्ये ते बोहेमियन स्टेट स्टॅटिस्टिकल ब्युरोमध्ये काम करू लागले. त्यांनी संख्याशास्त्राचे औपचारिक शिक्षण घेतले नव्हते, तरी त्यांनी गणित आणि संख्याशास्त्र शिकण्यास आरंभ केला आणि टेक्निशे हॉक्शुल ऑफ प्राग (Technishe Hochshule of Prague) येथे ते प्रगत गणित शिकले. गणिती संख्याशास्त्राच्या पद्धतींचा सामाजिक आणि अर्थशास्त्र विषयात उपयोजन या कामात विंकलर यांना रस निर्माण झाला.

पहिल्या महायुद्धात ते ऑस्ट्रियन लष्करात सामील झाले. १९१५ च्या नोव्हेंबर मध्ये जबर जखमी होण्यापूर्वी त्यांना दोन शौर्यपदके मिळाली. प्रागमध्ये सहा महिने उपचार घेत असतांना त्यांची भेट जुन्या शिक्षकांशी झाली. त्यांनी त्यांना व्हिएन्नामधील मिनिस्ट्री ऑफ वॉरच्या एका कमिटीत काम करण्यास उद्युक्त केले. युद्ध संपल्यावर त्यांच्यातील गुण हेरून विंकलरना लष्करी घडामोडींचे राज्य सचिव (Secretary of State for Military Affairs) नियुक्त करण्यात आले. ते व्हर्साय  शांतता परिषदेला (Versailles Peace Conference) ऑस्ट्रियाचे प्रतिनिधी होते. १९२१ पासून त्यांच्या दोन भिन्न कारकीर्दी सुरू झाल्या. एक म्हणजे ऑस्ट्रियन केंद्रीय संख्याशास्त्र कार्यालयात त्यांची नियुक्ती झाली आणि दुसरी म्हणजे १९२१ पासून ते युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्ना येथे सहप्राध्यापक झाले. त्यांच्या या दोन्ही कारकीर्दी समांतर सुरू होत्या. प्रागमधील जर्मन आणि झेक लोकांमधील तणावाचा त्यांना अनुभव होता म्हणूनच विंकलरना अल्पसंख्यकांच्या समस्यांबाबतच्या संख्याशास्त्रीय अभ्यासात रस निर्माण झाला. सहप्राध्यापक असतांनाच त्यांनी अल्पसंख्यांक जनसंख्येच्या अभ्यासासाठी इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑफ एथ्निक मायनॉरिटीज ही संस्था स्थापन केली. ही संस्था प्रागतिक आणि प्रभावी निबंधांचे प्रकाशन करीत असे. त्यामुळे सरकारी नोकरीत असलेले त्यांचे काही सहकारी दुखावले जात. मात्र या प्रकाशनांमुळे पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या नव्या राज्यांतील अल्पसंख्यकांचे प्रश्न सोडवण्याची राजकीय धडपड सुरू झाली.

विंकलर १९२५ मध्ये जनसंख्या संख्याशास्त्र विभागाचे निदेशक झाले. औपचारिक शिक्षण घेतले नसूनही ते इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे सभासद म्हणून निवडून आले. त्यांनी आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्रज्ञांशी निकट संबंध प्रस्थापित केले. सामाजिकशास्त्रासाठी संख्याशास्त्रीय सिद्धांत वापरण्याचे विंकलर यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले. तेथे त्यांनी उपयोजित आणि अचूक गणिती सूत्रीकरणाला प्रोत्साहन दिले.

नाझींनी १९३८ मध्ये ऑस्ट्रियाचा काही भाग खालसा केल्यावर राजकीय दबावामुळे त्यांना दोन्ही पदे सोडावी लागली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात परिस्थिती बिकट असूनही त्यांनी Basic Course in Demography हे पुस्तक लिहिले. ते १९५६ मध्ये प्रकाशित झाले. युद्ध संपल्यावर त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्नाने पूर्णकालिक प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. स्कूल ऑफ लॉ ॲन्ड स्टेट क्राफ्टचे ते मुख्य होते. प्रभावशाली पदे धारण करीत असूनही आणि वाढते आंतरराष्ट्रीय महत्त्व असूनही त्यांना अनेक वर्षे विद्यापीठातील स्वतंत्र अशा संख्याशास्त्र विभागाचे समर्थन करावे लागले.

वयाच्या ७१ व्या वर्षी निवृत्त झाल्यावरही ते संख्याशास्त्राच्या विकासासाठी झटत राहिले. ते इंटरनॅशनल युनियन फॉर द सायंटिफिक स्टडी ऑफ पॉप्युलेशन (IUSSP) चे उपाध्यक्ष होते. १९५९ मध्ये विंकलरनी व्हिएन्ना येथे इंटरनॅशनल पॉप्युलेशन काँग्रेसचे आयोजन केले. तसेच १९७३ मध्ये व्हिएन्नामधील इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या परिषदेमागे त्यांची प्रेरणा होती. विंकलर ऑस्ट्रियन स्टॅटिस्टिकल जर्नलचे संस्थापक होते. १९४८ मध्ये त्याचा प्रथम अंक प्रकाशित झाला. ते मेट्रिका या जर्नलचे सहसंपादकही होते. त्यांनी ऑस्ट्रियन स्टॅटिस्टिकल सोसायटीची स्थापना केली. संख्याशास्त्रासाठी त्यांनी एक उपयुक्त अभ्यासक्रम सुरू केला. त्यामुळे १९५० आणि १९६० च्या दशकांत जर्मन आणि ऑस्ट्रियन संख्याशास्त्रज्ञांची एक नवी पिढी तयार झाली.

वयाची शंभरी पूर्ण केलेल्या विंकलर यांनी २० पुस्तके आणि २०० हून अधिक निबंध लिहिले. हे सर्व लिखाण सैद्धांतिक आणि उपयोजित संख्याशास्त्राच्या विस्तृतक्षेत्रावर आधारित होते. त्यांना अनेक ऑस्ट्रियन आणि आंतरराष्ट्रीय मानसन्मान प्राप्त झाले. युनिव्हर्सिटी ऑफ म्यूनिक आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्नाने त्यांना मानद पदवी प्रदान केली. संख्याशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या प्रागतिक शैक्षणिक धोरणांमुळे जर्मनभाषक संख्याशास्त्राच्या विकासाला दिशा आणि गती मिळाली.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर