राष्ट्राची उपलब्ध साधनसामुग्री व लोकसंख्या यांचा मेळ घालून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे जीवनमान प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण म्हणजे लोकसंख्या शिक्षण. वैज्ञानिकांच्या अनुमानानुसार पृथ्वीची निर्मिती सुमारे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झाली असून अस्तित्वाची सुरुवात एकपेशीय जीवाच्या रूपात साधारणत: ३५० कोटी वर्षांपूर्वी झाली असावी. आगीचा शोध लागल्यानंतर मानव समूह एकत्र राहू लागले आणि त्यातून समाजाची संकल्पना जन्माला आली. अठराव्या शतकापर्यंत जगाची लोकसंख्या मर्यादित होती; मात्र औद्योगिक क्रांतीनंतर मानवी जीवनात हळूहळू सुबत्ता आली, सुखसोई वाढल्या, जीवनस्तर उंचावला व आयुष्यमान वाढले. त्यामुळे जगाची लोकसंख्या वाढू लागली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जागतिक लोकसंख्या सुमारे १६० कोटी होती; मात्र आज ती सुमारे ८५० कोटीपेक्षा जास्त आहे (२०२३). एकविसाव्या शतकात लोकसंख्यावाढीच्या विस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे. लोकसंख्यावाढ ही जगातील अनेक देशांची मोठी समस्या बनली असून विकासात अडसर ठरत आहे. परिणामतः लोकसंख्या शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. लोकसंख्या शिक्षण केवळ कुटुंबकल्याणापुरते मर्यादित नसून नव्या पिढीला लोकसंख्येविषयी नवा दृष्टीकोन व जाणीवजागृती निर्माण करणे, तसेच उत्तम जीवनाकडे वाटचाल करणे हे लोकसंख्या शिक्षणाचे ध्येय बनले आहे. लोकसंख्या शिक्षणामध्ये कुटुंबसंस्था, सामाजिक संस्था, समाज, राष्ट्र व जग यांतील लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. जीवनातील प्रत्येक बाबीचे नियोजन हे व्यक्ती व समाज या दोघांनाही उपयुक्त व इष्ट असते. याची भावी पिढीला जाणीव करून देण्याचा प्रेरणात्मक उपक्रम म्हणजेच लोकसंख्या शिक्षण होय. लोकसंख्या शिक्षणात लोकसंख्याशास्त्र (डेमोग्राफी) व लोकसंख्या अभ्यास (पॉपुलेशन स्टडिज) या घटकांचा समावेश होतो.

उद्दिष्टे ꞉ लोकसंख्या शिक्षणाचे उद्दिष्ट्ये पुढील प्रमाणे आहे ꞉

 • जीवनमानावर परिणाम करणारे घटक, त्यांचा परस्पर संबंध व त्यामधील परिवर्तनाची प्रक्रिया यांचे ज्ञान मिळविण्यास विद्यार्थ्यांस मदत करणे.
 • जीवनमान ठरविण्यास जबाबदार असलेल्या घटकांत इष्ट दिशेने परिवर्तन घडवून आणण्यासाठी योग्य क्षमता, जाणीव व कौशल्य विकसित करणे.
 • प्राप्त ज्ञान, जोपासलेली मूल्ये, आत्मसात केलेली कौशल्ये व क्षमता यांच्या आधारे देशाचा भावी नागरिक या नात्याने सर्व समावेषक विचार करून कुटुंबाबाबत योग्य व समाजाच्या दृष्टीने हितकारक निर्णय घेण्यासाठी विद्यार्थ्यांस सक्षम बनविणे.
 • ‘कुटुंब लहान सुख महान’ ही संकल्पना विद्यार्थ्यांस समजावून सांगणे.
 • वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे.
 • स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करणे.
 • लोकसंख्येपेक्षा लोकांच्या गुणवत्तेला महत्त्व देण्याची वृत्ती निर्माण करणे.
 • पर्यावरण व संवर्धनाची जाणीव निर्माण करणे.
 • विकासाच्या नियोजनाचे प्रशिक्षण देणे.
 • शिक्षण व विद्यार्थी यांच्यामध्ये लोकसंख्या समस्यांच्या सद्यस्थितीबाबत योग्य ती जाणीव निर्माण करून शासनाने या समस्या निराकरणार्थ केलेल्या प्रयत्नांची माहिती देणे. यामुळे अतिरिक्त लोकसंख्यावाढीला आळा बसून राष्ट्र विकास होण्यातील अडथळे दूर होतील, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे.

कोणत्याही राष्ट्राची लोकसंख्या ही त्या राष्ट्राची संपत्ती समजली जाते. म्हणून देशाच्या प्रगतीचा विचार करताना त्या देशात काम करणाऱ्या नागरिकांची संख्या पाहिली जाते. अर्थातच, ती संख्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या आवाक्यात असावी. भारतासारख्या अनेक विकसनशील देशांची वाढती लोकसंख्या ही मोठी समस्या आहे. मर्यादित नैसर्गिक साधनसामुग्रीचा विचार करता लोकसंख्येची वाढ चिंतनीय ठरते. लोकसंख्येतील परिवर्तन, साधनसंपत्ती, आर्थिक व औद्योगिक प्रगतीचा संबंध, लोकसंख्या व पर्यावरण, लोकसंख्या व जीवनमान, लोकसंख्या व सामाजिक सांस्कृतिक स्थितीचा संबंध, लोकसंख्या व राष्ट्रीय विकास, लोकसंख्याविषयी गतिमानता व रचना ही लोकसंख्या शिक्षणाची व्याप्ती आहे.

लोकसंख्या वाढीची कारणे ꞉ इसवी सन १६५० पासून जागतिक लोकसंख्याबाबत अभ्यास सुरू झाल्याचे दिसते. त्यानुसार इ. स. सुमारे १९३५ पर्यंत लोकसंख्या वाढीचा वेग कमी होता; मात्र त्यानंतर लोकसंख्या वाढू लागली. याची कारण पुढील प्रमाणे ꞉

 • वैद्यकीय सुविधा ꞉ इ. स. १९३५ मध्ये वैद्यकीय क्षेत्रात संशोधन होऊन प्रगती होऊ लागली. त्यामुळे विविध आजारांवर औषधनिर्मिती होऊन रोगी व्यक्तींवर उपचार होऊ लागले. परिणामी ते जगू लागले आणि लोकसंख्या वाढू लागली.
 • जन्मदर ꞉ पूर्वी नवजात बालक व माता यांच्या सुदृढ आरोग्यासाठी कोणत्याही लसी उपलब्ध नव्हत्या. त्याअभावी अनेक बालके जन्मताच मृत्यूमुखी पडायचे; मात्र नंतर वैद्यकीय क्षेत्रात क्रांती होऊन विविध लसी, औषधांचा शोध लागला आणि बालकांना व मातांना लसी मिळू लागल्या. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊन लोकसंख्या वाढू लागली.
 • हरितक्रांती ꞉ हरितक्रांतीमुळे अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन लोकांना पुरेसे अन्न मिळू लागल्याने त्यांची उपासमारी कमी झाली. परिणामता मृत्यूदर कमी होऊन लोकसंख्या वाढू लागली.
 • मुलगी-मुलगा भेद ꞉ खानदानीला वारस हवा, या मानसिकतेमुळे जोपर्यंत मुलगा होत नाही, तोपर्यंत संतती होऊ दिले जात. या भेदामुळेसुद्धा लोकसंख्या वाढीस हातभार लागला आहे.
 • गर्भनिरोधक साधनांचा वापर ꞉ खेड्यांतील अनेक अशिक्षित लोकांना गर्भनिरोधक साधनांची माहिती नसते. त्यामुळे त्या साधनांच्या वापराअभावी लोकसंख्या वाढते.
 • अंधश्रद्धा ꞉ मुलं ही देवाची किंवा अल्लाहची देणगी आहे या भ्रमामुळे, रूढी-परंपरांमुळे अनेक लोक कुटुंबनियोजन करीत नाहीत आणि लोकसंख्या वाढते.

जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्या त्याच्या इष्टतम स्तरापेक्षा अधिक वाढते, तेव्हा ती गंभीर समस्या बनते. भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनला आहे. यामुळे देशात अनेक सुविधांचा अभाव, अन्नधान्य तुटवडा, पाणी टंचाई इत्यादींमुळे महागाई वाढत आहे आणि कुपोषणाच्या समस्याही निर्माण होत आहेत. शिवाय महामारीच्या वेळी जनतेला आरोग्य व वैद्यकीय सुविधा, स्वच्छता सुविधा इत्यादी पुरविताना शासनाला अडचण निर्माण होते. यूरोपियन किंवा अमेरिकन देश त्यांच्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवितात; कारण भारताच्या तुलनेत त्यांची लोकसंख्या खूप कमी आहे. स्वीडन, डेन्मार्क या देशांतील नागरिक जगात सर्वांत आनंदी मानले जातात; कारण या देशांची लोकसंख्या अनुक्रम सुमारे १,०६,१२,०८६ आणि सुमारे ५९,१०,९१३ एवढीच आहे. लोकसंख्यावाढीवर नियंत्रण आणण्यासाठी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून ओळखला जातो.

लोकसंख्या वाढीवर उपाय ꞉ लोकसंख्यावाढीचे संकट देशाच्या विकासाच्या दृष्टीने अडचणीची बाब आहे. त्यासाठी खंबीर पावले उचलली गेली पाहिजे. लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्याचा धडा महाराष्ट्रानेच देशाला घालून दिला आहे. इ. स. १९५२ पासून लोकसंख्या वाढीस नियंत्रण घालण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय स्तरावर या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आणि आजही ते राबविले जात आहे.

 • शिक्षण ꞉ लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी शिक्षणामधून जागृती करणे गरजेचे आहे. लोकसंख्यावाढीमुळे भविष्यात मानवाला कोणते दुष्परिणाम भोगावे लागतील, याचे शिक्षण शाळांतून व महाविद्यालयांतून देणे गरजेचे आहे. त्यापूर्वी शिक्षणशास्त्र महाविद्यालयांतून शिक्षकांना लोकसंख्येबाबत शिक्षण मिळावे.
 • गर्भनिरोधक साधनांचा वापर ꞉ कुटुंब मर्यादित ठेवण्यासाठी गर्भनिरोधक साधनांचा वापर करणे आवश्यक आहे.
 • वैद्यकांचा सल्ला ꞉ आज अनेक सुशिक्षित लोक गर्भनिरोधक साधनांचा उपयोग करतात; मात्र त्यांच्यात या साधनांबाबत गैरसमज असल्याचे दिसते. त्यामुळे असलेले गैरसमज, विवाहपूर्व समुपदेशन, वैद्यकांचा सल्ला व मार्गदर्शन मिळविल्याने त्याचा फायदा लोकसंख्या नियंत्रणासाठी होऊ शकतो.
 • विविध कार्यक्रम ꞉ लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात शासन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करीत आहे. त्याअनुषंगाने पुरुष नसबंधी, महिलांची एक किंवा दोन बाळंतपणानंतर लगेच संततीनियंत्रणाबाबत शस्त्रक्रिया, यांसोबतच मुलामुलींच्या विवाहाची कायद्याने वयोमर्यादा ठरविणे, दूरदर्शन व आकाशवाणीसारख्या प्रसारमाध्यमांद्वारे लोकसंख्येची आद्ययावत माहिती देणे इत्यादी लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी उपाय करीत आहे. तसेच काही स्वंयसेवी संस्थांसुद्धा लोकसंख्या नियंत्रणासाठी कार्यरत आहेत. लोकसंख्या नियंत्रणामुळे समाजाचा गुणात्मक विकास होतो.

भारतातील वाढत्या लोकसंख्येचे तोटे पाहता, वाढती लोकसंख्या ही प्रचंड बेरोजगारीला कारणीभूत ठरत आहे. गावांकडे रोजगाराच्या संधी नसल्याने तेथील लोकांचे शहरांकडे स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढत असून अनधिकृत झोपडपट्ट्या तयार होत आहेत. इमारती, रस्ते बांधण्यासाठी डोंगर, झाडे कापली जात असून यामुळे पर्यावरणाची समस्या भेडसावत आहे. तसेच गरिबी, महागाई, बेरोजगारी, असमानता, पाणीटंचाई, लुटमार, दरोडे, चोऱ्या इत्यादी दुष्परिणाम दिसून येत आहे. असे असले, तरी भारतातील ५०% पेक्षा जास्त जनता वय वर्षे ३५ पेक्षा कमी असल्याने भारताला तरुण देश म्हणून संबोधले जाते. देश चालविण्यासाठी तरुण कामगार, नोकरवर्ग, प्रशासन अधिकारी गरजेचे असतात आणि ते भारताकडे आहे. त्यामुळे देशाचा विकास होण्यास आणि देशाच्या संरक्षणास मदत होते.

संदर्भ ꞉ पाटील, विनोद, लोकसंख्या शिक्षण आणि प्रौढ शिक्षण, नाशिक, २००९.

समीक्षक ꞉ के. एम. भांडारकर