बोस, आशिष : (१२ जुलै १९३० ते ७ एप्रिल २०१४) आशिष बोस यांचा जन्म कोल्हापूरात झाला. त्यांचे वडील अबिनाशचंद्र बोस राजाराम महाराजांच्या काळात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कोल्हापूरला कार्यरत होते. बोस हे आयुष्याची पहिली १५ वर्षे कोल्हापूरला राहिले. मात्र नंतर त्यांचे संपूर्ण वास्तव्य दिल्लीत गेले. बोस यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएच्.डी. केली. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व्ही.के.आर.व्ही. राव हे त्यांचे मार्गदर्शक होते.

बोस यांनी वेळोवेळी देशभर फिरून लोकसंख्यावाढीवर संशोधन केले. त्यासाठी त्यांनी लोकसंख्याशास्त्र तसेच मानवंशशास्त्र (Anthropology) यातील विविध तंत्रे आणि विश्लेषण पद्धती वापरल्या. सांख्यिकी आणि गणिती विश्लेषणातून लोकसंख्याशास्त्राला बळकटी देण्याचे योगदान त्यांनी केले.

भारतातील जनगणनांतून मिळालेल्या आकडेवारींचे सांख्यिकी विश्लेषण करुन लोकसंख्येत पुढे, परंतु विकासात मागे, अशी बिमारू राज्ये म्हणजेच बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही परिभाषा बोस यांनी प्रथम मांडली. ही चार राज्ये विकासाच्या विविध मानकांवर वर्षानुवर्षे मागासलेली आहेत. यामागची त्यांची भूमिका होती की या राज्यांसाठी नियोजन करताना वेगळे निकष आणि धोरणे वापरली जावीत आणि तेथील शिक्षणाचा दर्जा, आरोग्य सूचकांक आणि लिंगानुभेद (मुले-मुली) यांच्यात सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जावे.

तसेच साठपेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांची वाढती संख्याही लक्षात घेऊन २१ व्या शतकात त्यांचे प्रश्न बिकट होऊ नये यासाठी शासकीय आणि इतर संस्थांनी विशेष कार्यक्रम लवकरच सुरू करावेत असे बोस यांनी १९९१ च्या लोकसंख्येच्या विश्लेषणावरून मांडले होते. त्यासाठी अधिक सखोल सर्वेक्षण करून अशा लोकांच्या आर्थिक, सामाजिक आणि भावनिक गरजांचा अंदाज घेणे कळीचे ठरेल असे त्यांनी सुचविले होते. महिला सबलीकरण किती आवश्यक आहे याबाबतही त्यांनी सर्वेक्षण आणि विश्लेषण करून दाखवले की पूर्वीपेक्षा आता महिला अधिक अर्थाजन करू लागल्या असल्या, तरी त्यांना समाजात आणि कुटुंबातदेखील अपेक्षित मान आणि अधिकार मिळत नाही.

ते नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या संस्थेमधील लोकसंख्या संशोधन केंद्राचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि मसुरीतील नॅशनल अकॅडेमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन तसेच जगभरातील विविध संस्थांत त्यांनी लोकसंख्याशास्त्रावर अध्यापन केले.

श्री. राजीव गांधीपासून भारताच्या पुढील अनेक पंतप्रधानांचे लोकसंख्या आणि जनगणना या विषयाबाबत बोस यांनी सल्लागार म्हणून काम केले. भारत सरकारने लोकसंख्या आणि विकास धोरण यासंबंधात वेळोवेळी नेमलेल्या आयोगांचे ते सदस्यही होते. भारतातील प्रत्येक जिल्ह्याची जनगणनेतील आकडेवारी आणि प्रत्यक्ष सर्वेक्षण करून लोकसंख्या आणि आरोग्य याबाबतीत सांख्यिकी पद्धतींचा वापर करुन तपशीलवार चित्र उभारण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. आरोग्य हे आर्थिक विकासाचे एक स्वतंत्र क्षेत्र म्हणून भारतीय नियोजन व्यवस्थेत धरले जावे, असा त्यांचा आग्रह राहिला.

संशोधन अभ्यासासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यावर बोस यांचा भर असे आणि त्यासाठी ते उत्साहाने दुर्गम प्रवास करुनही जात असत. तळागाळातील माणसांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून त्याबाबतीत आकडेवारीचे विश्लेषण करुन मार्ग काढण्याचे त्यांचे सतत प्रयत्न होते. शेवटपर्यंत ते कुठल्या न कुठल्या प्रकल्पाच्या कामात व्यग्र होते. लोकसंख्याशास्त्र या आकडेवारीचे प्राबल्य असलेल्या रुक्ष, परंतु अत्यंत महत्त्वाच्या अशा गणिती-सांख्यिकी विषयाच्या शास्त्रीय चौकटीत संशोधन करूनही त्याचे निष्कर्ष प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात बोस यांचा मोठा वाटा आहे.

बोस यांनी २५ हून अधिक पुस्तकांचे लेखन आणि संपादन केले. India’s Urbanization: 1901-2001, Growing Old in India: Voices Reveal, Statistics Speaks, Darkness at Noon: Female Foeticide in India, India’s Billion Plus People: 2001 Census Highlights, Methodology and Media Coverage आणि India’s Quest for Population Stabilisation ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. त्यांचे शोधलेख आणि इतर निबंध इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली, हेल्थ फॉर मिलीयन्स  आणि पॉवर पॉलिटीक्स  या नियतकालिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असत. Head Count: Memoirs of a Demographer हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यात लोकसंख्याशास्त्राचा देशात झालेला विकास यासोबत जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा अनेक नेत्यांसोबत त्यांना आलेले अनुभव दिले आहेत.

संदर्भ : 

समीक्षक : विवेक पाटकर