वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात (पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील मंगरूळ तालुक्यात)  स्थित तऱ्हाळे गावात सप्टेंबर १९३९ मध्ये एका शेताजवळून वाहणाऱ्या नाल्याशेजारी जमिनीमध्ये गाडलेले एक मृद-भांडे सापडले. या मृदभांड्यात जवळपास १६०० सातवाहनकालीन नाण्यांचा संचय प्राप्त झाला. तत्कालीन ट्रेजर ट्रॉव्ह ॲक्ट अंतर्गत त्या काळातील प्रांतिक सरकारने सदर निधी ताब्यात घेतला व मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, नागपूर यांच्याकडे पाठविला.

विदर्भामध्ये सापडलेला सातवाहनकालीन नाण्यांचा हा दुसरा महत्त्वाचा नाणेसंचय आहे.  यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सापडलेला चांदा नाणेनिधी म्हणून प्रसिद्ध असलेला नाणेसंचय आढळून आला. तऱ्हाळे नाणेसंचयाचे संशोधन व प्रकाशन सर्वप्रथम वा. वि. मिराशी यांनी केले.

नाणेसंचयाचे वर्णन : नाणेसंचयातील १६०० नाण्यांपैकी १५२५ नाणी पूर्ण आकाराची तर, ७५ नाण्यांचे तुकडे आढळून आले. सर्व नाणी केवळ सातवाहन नृपतींची होती. परदेशी राजवंशाचे (उदा., रोमन) एकही नाणे नव्हते, हे या नाणेसंचयाचे वैशिष्ट्य. प्राप्त नाणी पोटीन या मिश्र धातूची (तांबे व शिसे या धातूंचे मिश्रण) होती.  तथापि निरनिराळ्या नाण्यांमध्ये तांबे व शिसे यांचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे आढळून आले. काही नाणी शिसे या धातुप्रमाणे काळी तर काही तांब्याप्रमाणे तांबड्या चकचकीत रंगाची असल्याचे दिसून आले.

नाण्यांचे वर्णन : संचयातील सर्व नाणी एकाच प्रकारची व गोलाकार आहेत. त्यांच्या दर्शनी भागावर सोंड उंचावलेला हत्ती व गोलाकार कडेवर व ब्राह्मी लिपीत व  प्राकृत भाषेत राजाचे नाव सांगणारा लेख तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह आहे. उज्जैन चिन्हाच्या चार बाजूंवरील मोठ्या वर्तुळांमध्ये एक लहान वर्तुळ (वर्तुळात वर्तुळ) आहे. काही वर्तुळांच्या वरच्या बाजूला चंद्रकोर आहे.

कर्ण सातकर्णी या राजाची नाणी वगळता उर्वरित नाण्यांवर दर्शनी भागावरील हत्तीचे तोंड उजवीकडे आहे. कर्ण सातकर्णीच्या नाण्यांवर मात्र हत्तीचे तोंड डावीकडे आहे, असे निरीक्षण मिराशींनी नोंदविले आहे. काही नाण्यांची चकती (planchet) लेखाच्या ठशापेक्षा लहान असल्यामुळे बऱ्याच नाण्यांवर लेख अपूर्णावस्थेत आहेत. नाणी वजनाने हलकी असून वजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य आढळते. प्राप्त नाण्यांचे नृपतीनिहाय वर्णन पुढीलप्रमाणे :

गौतमीपुत्र सातकर्णी : नाण्यांची संख्या –  ५७३. निधीतील सर्वाधिक नाणी या नृपतीची आढळतात. नाण्यांवर सिरि सातकणिस  किंवा  सिरि  सातकणि  हे लेख आढळतात. नाण्यांचे वजन – ३१- ६० ग्रेन्स दरम्यान.

वाशिष्ठिपुत्र पुळुमावी : नाण्यांची संख्या – १७४. नाण्यांवर रञो सिरि पुळुमाविस  अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ४५  ग्रेन्स दरम्यान.

चौथा सातकर्णी : नाण्यांची संख्या – ३५. नाण्यांवर सिव सिरी सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : २६ – ३८ ग्रेन्स दरम्यान.

शिवश्री पुळुमावी : नाण्यांची संख्या – ३२. नाण्यांवररञो सिव सिरि पुळुमाविस अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३७ – ५० ग्रेन्स दरम्यान.

स्कंद सातकर्णी :  नाण्यांची संख्या – २३. नाण्यांवर (रञो) सिरि खद सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ५० – ५२ ग्रेन्स दरम्यान.

यज्ञ सातकर्णी : नाण्यांची संख्या २४८. नाण्यांवर रञो सिरि यञ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३१ – ४५ ग्रेन्स दरम्यान.

विजय सातकर्णी : नाण्यांची संख्या : ४. नाण्यांवर (सिरि) विजय सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ५० ग्रेन्स दरम्यान.

कुंभ सातकर्णी : नाण्यांची संख्या : ५६. नाण्यांवर  (रञो) सिरि कुभ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : सरासरी ३० ग्रेन्स.

कर्ण सातकर्णी : नाण्यांची संख्या – ७. नाण्यांवर  सिरि कण सातकणिस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ३० – ३६ ग्रेन्स दरम्यान.

शक सातकर्णी : नाण्यांची संख्या –  ४. नाण्यांवर सिरि सक किंवा सकस सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ३४ – ३७ ग्रेन्स दरम्यान.

श्री पुळुहामवी : नाण्यांची संख्या – ४. नाण्यांवर (रञो सिरि) पुळुहामविस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ४० – ५१ ग्रेन्स दरम्यान.

याशिवाय ज्या नाण्यांवरचे लेख वाचता येत नाहीत, अशा नाण्यांची संख्या ३६५ एवढी आहे.

नाणेसंचयाचे महत्त्व :  चांदा नाणेनिधी प्रमाणेच नंतरच्या काळात सापडलेला  तऱ्हाळे नाणेसंचय सातवाहनांच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा स्रोत ठरतो. आतापर्यंत सापडलेल्या सातवाहनकालीन नाणेसंचयामध्ये हा नाणेसंचय मोठा आहे. उत्तर सातवाहन काळातील सातवाहन नृपती व त्यांचा कालक्रम ठरविण्यासाठी या नाणेसंचयाची मदत होते. हत्ती व उज्जैन छापाची नाणी विदर्भात चलनात होती, हे या संचयामुळे सिद्ध होते. पुराणात वर्णन केलेल्या अनेक सातवाहन राजांची नाणी प्रथमच या नाणेसंचयाद्वारे प्राप्त झाली.  तसेच पुराणात उल्लेख नसलेल्या काही राजांची नाणीदेखील या संचयामुळे प्रकाशात आली. सातवाहन राजवंशाच्या अगदी शेवटच्या काळात सातवाहनांची सत्ता विदर्भापुरती मर्यादित असल्याचे पुरावे या नाणेनिधीमुळे प्राप्त झाले.

संकेतशब्द : तऱ्हाळे, वाशिम, अकोला, सातवाहन, वा. वि. मिराशी, चांदा,  गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठिपुत्र पुळुमावी,  सातकर्णी चौथा, शिवश्री पुळुमावी,  स्कंद सातकर्णी,  यज्ञ सातकर्णी, विजय सातकर्णी, कुंभ सातकर्णी,  कर्ण सातकर्णी, शक सातकर्णी,  पुळुहामवी, विदर्भ

संदर्भ :

  • Mirashi, V. V. ‘Studies in Indology’, Vol. 3, (Ancient Indian Coins), Vidarbha Samshodhan Mandal, pp.34-48, Nagpur, 1962.
  • Sarma, I. K. Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980.
  • Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
  • Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade – Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008.
  • पाठक, अरुणचंद्र संपा., महाराष्ट्र प्राचीन काळ (खंड :१), दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            समीक्षक : पद्माकर प्रभुणे