गुत्तीचे घोरपडे घराणे व त्यांची नाणी : दक्षिण भारतातील कर्नाटकमधील गुत्ती येथील मराठा सत्ताधीश घोरपडे घराण्याने पाडलेली नाणी. भोसले घराण्याचा उदय होण्याआधी दख्खनमधील काही बलशाली घराण्यांत घोरपडे घराण्याचा समावेश होता. बहमनी व आदिलशाही काळापासून या घराण्याकडे अनेक जहागिरी होत्या. इ. स. १७ व्या शतकाच्या सुरुवातीस घोरपडे घराण्यातील चोलराजाचे दोन पुत्र, वल्लभसिंग आणि पिलाजी यांपासून घराण्याच्या दोन शाखा तयार झाल्या. १६३७ मध्ये इब्राहिम आदिलशहाने मुधोळ येथील पिलाजीच्या शाखेस मान्यता दिली व कर्नाटकातील जहागिरी वल्लभसिंगचा पुत्र म्हाळोजी याला दिल्या. म्हाळोजीने पुढे उत्तर कर्नाटकातील गजेंद्रगड येथे आपले मुख्य ठाणे केले. पिलाजीपुत्र बाजी घोरपडे व म्हाळोजी घोरपडे यांच्यातील वितुष्टात शाहजीराजांनी म्हाळोजीची बाजू घेतली. बदल्यात म्हाळोजीही भोसल्यांशी नेहमीच एकनिष्ठ राहिले. १६८९ मध्ये छ. संभाजी महाराजांना मोगल सरदार मुकर्रबखान पकडून नेत असताना झालेल्या लढाईत ते मरण पावले.

म्हाळोजींना संताजी, बहिर्जी आणि मालोजी हे तीन पुत्र. पुढे तिघेही सरदार झाले. छ. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर छ. राजाराम महाराजांनी दक्षिण भारतात जिंजीच्या किल्ल्यावर आश्रय घेतला व तेथून मोगलांविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला. यात त्यांना या तीनही घोरपडे बंधूंची मदत झाली. त्यांच्या पराक्रमामुळे छ. राजाराम महाराजांनी संताजींना सेनापती मामलकत मदार, बहिर्जींना हिंदुराव आणि मालोजींना अमिरुल उमरा या पदव्या दिल्या. मात्र पुढे लवकरच अंतर्गत झगड्यांमुळे संताजींना साताऱ्याजवळ म्हसवड येथे मारण्यात आले (१६९७). छ. राजाराम महाराज जिंजीहून परत येत असताना अशाच प्रकारे मालोजींनाही मारण्यात आले. यानंतर बहिर्जींनी गजेंद्रगडच्या जहागिरीवर ताबा मिळवला व दक्षिणेत गुत्तीचा किल्ला काबीज केला आणि वाकिणखेड्याच्या बेडर सत्ताधीशांसोबत संगनमत करून मोगलांशी संघर्ष चालू ठेवला. त्यांचे नातू मुरारराव यांच्या काळात घोरपडे घराण्याच्या या शाखेचे केंद्र गुत्ती बनले. बहिर्जींना त्यांच्या हयातीत पंधरा लाखांचा सरंजाम होता. बहिर्जींचे पुत्र व वारसदार सिधोजीराव यांनी १७१४ साली गर्मेलीच्या पाळेगारांकडून सोंडूर व आसपासचा प्रदेश काबीज केला. १७१६ साली कोल्हापूरच्या छत्रपतींनी त्यांच्या सरंजामाला मान्यता दिली.

इ. स. १७३० मध्ये सिधोजीरावांचे पुत्र आणि वारसदार मुरारराव कारभार पाहू लागले. काही काळातच त्यांना म्हैसूर आणि हैदराबादहून दरवर्षी सात लाख रुपये खंडणीखातर मिळत असत. अर्काटच्या नबाबाशी संबंधित इंग्रज-फ्रेंच युद्धातही त्यांनी भाग घेतला होता व १७४१-४५ मध्ये त्रिचन्नापल्ली (तिरुचिरापल्ली) येथील प्रदेशही त्यांच्या अंमलाखाली होता. १७५० नंतर कर्नाटकात त्यांनी अनेक स्वाऱ्या केल्या व अनेक स्थानिक सत्ताधीशांना पराभूत केले. कर्नाटकवरील स्वामित्वाकरिता हैदरअलीची त्यांना कडवी स्पर्धा होती. पुढे प्रसंगोपात पेशव्यांशीही त्यांचा संघर्ष झाला. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे कर्नाटकाकडे दुर्लक्ष झाले व त्यातच हैदरने गुत्तीवर मोठ्या सैन्यानिशी हल्ला केला (१७७५). चार महिने मुराररावांनी कडवी झुंज दिली; मात्र किल्ल्यातील रसद, दारुगोळा इ. संपल्यानंतर त्यांना शरणागती पतकरावी लागली. श्रीरंगपट्टणच्या किल्ल्यात हैदरने मुराररावांना कैद करून ठेवले. तेथेच १७७८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. गुत्तीचा ताबा त्यानंतर हैदरकडे गेला व दुसऱ्या आंग्ल-मैसूर युद्धानंतर टिपूने ब्रिटिशांकडे गुत्तीचा किल्ला सुपुर्द केला. तो ठेवून त्यांनी सोंडूरला घोरपड्यांचा वंश पुन्हा चालवला. ते संस्थान १९४८ पर्यंत होते. त्यानंतर भारतात विलीन झाले.

गुत्ती येथे शाह आलम बहादुर याच्या नावे पाडलेला चांदीचा रुपया.

गुत्तीच्या घोरपड्यांनी अनेक प्रकारची नाणी पाडली. त्यांमध्ये प्रामुख्याने दक्षिण भारतीय प्रकारातील होन, फनम इ. नाण्यांचा भरणा आहे. मोगल बादशहांच्या नावे पाडलेले रुपयेही ज्ञात आहेत. गुत्ती, कोडिकोंडा, कोलार, मुलबागल, सोंडूर आणि वेंकटगिरी या ठिकाणी पाडलेली नाणी ज्ञात आहेत.

गुत्ती येथे पाडलेल्या नाण्यांमध्ये रुपये, होन आणि फनम या तीनही प्रकारांतील नाणी आहेत. शाह आलम बहादुर याच्या नावे पाडलेला, जुलूस अर्थात राज्यारोहण वर्ष २ (इ. स.१७०९-१०) असलेला एक रुपया यात उल्लेखनीय असून त्यावर ‘झर्ब गूतीʼ अर्थात टांकसाळीचे नाव गुत्ती असे स्पष्ट नमूद आहे. घोरपडे घराण्याकडे गुत्तीचा किल्ला स्पष्टपणे असलेल्या काळात पाडलेले हे पहिले ज्ञात नाणे असून, सिधोजीराव घोरपड्यांनी राज्यारूढ झाल्यावर हे नाणे पाडले असावे, हे त्या वर्षावरून लक्षात येते. त्यानंतर फर्रुखसियर, मुहम्मदशाह, दुसरा आलमगीर यांच्या नावची गुत्तीची नाणीही ज्ञात आहेत. मात्र फर्रुखसियरनंतरच्या बादशहांच्या नावाची ज्ञात नाणी ही बहुतांशी सोन्याची असून दाक्षिणात्य प्रकारातील, अर्थात होन आणि फनम या प्रकारातील आहेत. फर्रुखसियरच्या नावे पाडलेला होन ज्ञात असून, त्यावर टाकसाळीच्या गुत्ती या नावासह त्याचे जुलूस वर्ष ५ आणि हिजरी वर्ष ११२८ असे नमूद आहे. त्यावरून, हे नाणे १७१६ साली पाडले असावे, हे उघड आहे. मुहम्मदशाहच्या नावे पाडलेला होनही ज्ञात आहे. त्याच्या नावे पाडलेला सोन्याचा फनम आणि आलमगीर दुसरा याच्या नावे पाडलेला प्रताप अर्थात अर्धा होनही ज्ञात आहे. त्याखेरीज मुराररावांनी स्वत:च्या नावे पाडलेला एक फनमही गुत्तीहूनच पाडलेला असावा, असा संशोधकांचा तर्क आहे.

वेंकटगिरी येथे पाडलेले तांब्याचे नाणे.

इ. स. १७५२ मध्ये मुराररावांनी बाबप्पा नायडूकडून कोडिकोंडा ताब्यात घेतले. तेथील नाणी ही विविध फनम प्रकारांतील आहेत. या नाण्यांवर सर्पाचे आरेखन दिसून येते. दक्षिण भारतात सर्पदैवताची पूजा रूढ असून, कार्तिकेय देवाशी त्याचा संबंध आहे. त्यालाच सुब्बराय असेही नाव असून, घोरपड्यांनी सोंडूर येथे त्याचे एक देऊळ बांधल्याचे ज्ञात आहे. त्यामुळे त्यांच्या तेथील नाण्यांवर सर्पाचे आरेखन असणे स्वाभाविक आहे. या नाण्यांवर एका बाजूस देवनागरी लिपीत ‘श्रीʼ, ‘श्री नाʼ किंवा ‘श्री षण्मुखʼ असे शब्द असून दुसऱ्या बाजूस सर्पप्रतिमा आहे. याखेरीज कोलार आणि मुलबागल येथूनही फनम प्रकारातील नाणी पाडली असावीत, असा संशोधकांचा तर्क आहे. विशेषत: मुहम्मद शाहच्या नावे कोलार येथून पाडलेला फनम ज्ञात आहे. या शिवाय सोंडूर येथे शाह आलम दुसरा याच्या नावे पाडलेला अर्धा होनही ज्ञात आहे. यावर दोन्ही बाजूस फार्सी भाषेतील मजकूर असून, ‘झर्ब सोन्दूरʼ अर्थात टाकसाळीचे नाव सोंडूर असे नमूद आहे. शाह आलमचे नाव शाह अली गौहर असे नमूद आहे. हे राज्यारूढ होण्याआधीचे नाव असून, फक्त मराठे सत्ताधीशच हे नाव नाण्यांवर वापरीत असत. कालानुक्रम पाहता हे नाणे मुराररावांनी पाडले असावे.

या शिवाय वेंकटगिरी येथूनही घोरपड्यांनी नाणी पाडली होती. हे त्यांच्या प्रदेशातील दक्षिणतम ज्ञात टाकसाळीचे शहर असून १७५७ मध्ये मराठ्यांचा याच्याशी प्रथम संपर्क आला. विसाजी कृष्ण बिनीवाले या पेशव्यांच्या सरदाराने तेथील पाळेगाराकडून साडेतीन लाख रुपये खंडणी म्हणून घेतले व त्या सोबतच नेल्लोर, काळहस्ती, सर्वपल्ली, सिधवट या आसपासच्या ठिकाणांहूनही खंडणी गोळा केली. या काळाच्या आसपासच मुराररावांच्या ताब्यात वेंकटगिरी आले असावे, हे उघड आहे. एका समकालीन साधनातील नोंदीनुसार घोरपड्यांना वेंकटगिरीहून दरवर्षी चाळीस हजार रुपये उत्पन्न मिळत असे. येथे पाडलेल्या नाण्यांवर एका ‘किले वेंकटगिरीʼ असे स्थलनाम स्पष्टपणे नमूद असून दुसऱ्या बाजूस फणीधर नागाची सुबक आकृती असते. ही नाणी सोने व तांबे या दोन धातूंमध्ये ज्ञात असून फनम व कासू या प्रकारांमधील आहेत.

एकूणच ही नाणी उल्लेखनीय आहेत. छत्रपतींचा अपवाद वगळता शासकांची नावे मराठ्यांच्या नाण्यांवर अपवादानेच आढळतात. तसेच मोगली प्रकारातील पैसे, रुपये व मोहोरा वगळता स्थानिक प्रकारातील नाण्यांवर टाकसाळीचे नाव घोरपड्यांच्या नाण्यांचा अपवाद वगळता बहुतांशी आढळत नाही. वेंकटगिरीतील नाणी त्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. शिवाय घोरपड्यांप्रमाणे शिवपूर्वकालीन मराठे घराण्याने बदलत्या परिस्थितीप्रमाणे चलनाशी जुळवून घेतल्याचीही थोडीच उदाहरणे पाहावयास मिळतात.

संदर्भ :

  • Bhandare, S. U. ‘History and Coinage of the Ghorpade Chiefs of Gootyʼ, Numismatic Digest, Vol. 17, pp.179-196, Mumbai, India, 1993.
  • Maheshwari, K. K. & Wiggins, Kenneth W. Maratha Mints and Coinage, IIRNS, India, 1989.
  • गर्गे, स. मा. हिंदुराव घोरपडे घराण्याचा दक्षिणेतील इतिहास, दास्ताने रामचंद्र आणि कं., पुणे, १९८३.
  • छायाचित्र सौजन्य : १.  https://www.zeno.ru/ २. डॉ. श्रीनाथ कुलकर्णी, चंद्रपूर.

समीक्षक : सचिन जोशी