डास हा एक परोपजीवी कीटक असून मानवी आरोग्याच्या दृष्टीने हा कीटक खूपच उपद्रवी आहे. त्यामुळे त्यांचे निर्मूलन करणे गरजेचे ठरते. यासाठी डासांच्या वास्तव्याच्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकांची पावडर टाकणे, त्यांचे द्रवरूप फवारे मारणे अशा पारंपारिक पद्धतींचा अवलंब केला जातो. परंतु, या सर्व पद्धती आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहेत. डासांच्या एडीस (Aedes), ॲनॉफिलिस (Anopheles) व क्युलेक्स (Culex) अशा विविध प्रजाती असून त्यांच्यामुळे मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यू यासारख्या जीवघेण्या तसेच इतर किरकोळ रोगांचा प्रसार होतो. जगात दरवर्षी डेंग्यू, मलेरिया इत्यादी रोगांच्या प्रादुर्भावामुळे हजारो लोक मृत्यू पावतात. त्यामुळेच डास निर्मूलन, त्यांपासून होणारे विविध रोग व उपाय यांवर जगभर मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे.

डास निर्मूलनासाठी अब्जांश कणांचा वापर : डबकी, सांडपाणी, कचरा कुंड्या, व्यवस्थित देखभाल होत नसलेले तलाव, तळी अशा ठिकाणी डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. घाण पाणी हे डासांचे प्रमुख उगम-स्थान. अंडी, अळी, कोश आणि सर्वात शेवटी डास या त्यांच्या जीवनक्रमातील चार प्रमुख अवस्था आहेत. विशेष म्हणजे या सर्व अवस्था पाण्यातच पूर्ण होतात. त्यामुळे पाण्यातच त्यांचा नायनाट करणे हा सर्वांत परिणामकारक उपाय समजला जातो. साहजिकच डासनाशक पदार्थ हे पाण्यात दीर्घकाळ टिकणारे असले पाहिजेत. पारंपारिक डासनाशक पदार्थ जास्त दिवस टिकत नाहीत. कीटकनाशकांमध्ये अब्जांश कणांचा वापर केल्यास ती अधिक काळ टिकतात असे संशोधनातून आढळून आले आहे. म्हणूनच डास निर्मूलनासाठी अब्जांश पदार्थांचा वापर केला जातो. अळी व कोश ह्या डासांच्या प्राथमिक अवस्थेत त्यांना मारण्यासाठी सिलिका, सोने, चांदी, कॅडमिअम, जस्त इत्यादी पदार्थांच्या अब्जांश कणांचा वापर केला जातो.

डासांच्या निर्मूलनासाठी ते अळी अवस्थेत असतानाच त्यांच्या पाण्याद्वारे अन्न घेण्याच्या प्रक्रियेला लक्ष्य केले जाते. त्यासाठी तलाव, डबकी, सांडपाणी अशा ठिकाणी पाण्यात अब्जांश पदार्थ सोडतात. त्यांच्या अळ्या मारण्याच्या क्षमतेवर पाण्यातील इतर घटकांचा परिणाम होऊ नये याची आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक असते. म्हणूनच बहुवारिक कुप्या, अलजीनेट (Algenate) सारखे बहुवारिक खडे अशा स्वरूपात ते पाण्यात सोडतात. डास निर्मूलनासाठी जलस्पर्शी (Hydrophilic), तेल-स्पर्शी (Lipophilic), जल-अस्पर्शी (Hydrophobic) अशा प्रकारची इतर अब्जांश धातुनाशके देखील पाण्यात सोडतात. पाण्यामध्ये सोडलेले अब्जांश कण डासांच्या अळ्यांना नष्ट करतात.

पारंपरिक रासायनिक कीटकनाशकांमध्ये चांदी व सोन्याचे अब्जांश पदार्थ मिसळल्यास त्यांची डास नष्ट करण्याची क्षमता खूपच वाढते. तसेच ती दीर्घ काळ टिकते. डासांच्या अळ्यांमध्ये त्यांच्या पोषणास आवश्यक असे अमायलेज (Amylase), लायपेज (Lipase), प्रोटीयेज (Protease) असे विविध प्रकारचे विकर (Enzymes) असतात. धातूंचे अब्जांश पदार्थ जेव्हा डासांच्या अळ्यांच्या संपर्कात येतात तेव्हा ते विकरांचे कार्य बंद पाडतात. त्यामुळे डासांच्या प्राथमिक अवस्थेतच त्यांचा नायनाट केला जातो.

जैविक स्वरूपातील कीटकनाशक : बॅसिलस थुरीनजिंसीस (Bacillus thuringiensis) या नावाचा जिवाणू जागतिक आरोग्य संघटनेने (WHO – World Health Organization) ‘जैविक कीटक नाशक’ म्हणून प्रमाणित केला आहे. चांदी व सोने यांचे अब्जांश कण असलेल्या घटकांबरोबर या जिवाणूंची जोपासना केल्यास त्यांची डासांच्या अळ्या मारण्याची क्षमता दुपटीने वाढल्याचे सिद्ध झाले आहे. डासांच्या चावण्यापासून रोखणारी विविध प्रकारची मलमे, लोशन, पावडर यांच्यात अब्जांश पदार्थांचा वापर आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. चेहरा किंवा शरीराच्या इतर भागांवर लावलेले मलम सम प्रमाणात पसरावे म्हणून सामान्यत: चांदी व सोन्याच्या अब्जांश पदार्थांचा वापर होतो.

डासांचे निर्मूलन करण्यासाठी तसेच त्यांच्यापासून होणाऱ्या विविध अपायांपासून बचाव करण्यासाठी अब्जांश पदार्थांचा वापर खूपच उपयुक्त ठरत असल्याने त्यांचा वापर जगभर सातत्त्याने वाढत आहे.

  • Salunkhe R., Patil S., Patil C. et al.  (2011). Larvicidal potential of silver nanoparticles ….…… , Parasitolology Research. 109(3):823.
  • Suryawanshi R., Patil C., Borase H. ……… & Patil S., (2015).  In vitro antiparasitic activity of microbial…..  Parasitology International, 64(5):353.

                  समीक्षक : वसंत वाघ